१७. उघड्यावर शौच करू नये. हे भारतीय संस्कृती सांगतेय. केवळ शौचच नाही तर स्नान सुद्धा उघड्यावर करू नये, असं आपल्या संस्कृतीमधे सांगितलेलं आहे. जिथे जिथे जंतुसंसर्ग होऊ शकतो अशा ठिकाणी कमीत कमी वेळ असावं, ही दृष्टी यामागे दिसते.
सांगितलेलं आहे एक आणि व्यवहारात केलं जातं दुसरंच हा दोष संस्कृतीचा होत नाही. मल विसर्जन उघड्यावर करणे म्हणजे अनेक रोगांना निमंत्रण देणंच आहे.सार्वजनिक ठिकाणे, जसे रेल्वे रुळ, विहिरी, रस्ते. गटार, नदी पाणवठे, समुद्र, स्मशान, अथवा देवालय याठिकाणी कधीही मल विसर्जन करू नये.
ज्या ठिकाणी बंदिस्त मल विसर्जनाची सोय नसेल अशा ठिकाणी खड्डा करून, त्यात मलविसर्जन झाल्यावर त्यावर पुनः माती टाकावी. मांजराना ते कळतं. पण माणसाना कळत नाही, हे दुर्दैव नाही काय ?
मलामधे असंख्य जंतु असतात, त्यामुळे मल उघड्यावर राहू नये, त्यावर माशा बसून जंतुसंसर्ग इकडेतिकडे परसवत असतात. विशेषतः पोलियो सारखे जंतु मलामधूनच पसरत असतात. हे लक्षात घ्यावे.
‘मल’ या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे पहा.
मनुष्याचे एकुण बारा मल सांगितलेले आहेत. वसा ( मांस किंवा मेद, मांसगत रक्त) शुक्र म्हणजे वीर्य, रुधीर म्हणजे रक्त, मज्जा म्हणजे हाडामधील रस, मूत्र, विष्ठा, कानातील मळ, नखे, नाकातोंडातील कफाचे स्राव, अश्रु, डोळ्यातील मळ, आणि घाम हे बारा प्रकारचे मल सांगितलेले आहेत.
या ठिकाणी जास्त जंतुसंसर्ग होतो. म्हणून या मलापासून आपली शुद्धी करावी. या शुद्धी साठी चांगली माती अथवा रखा आणि पाणी वापरावे असेही सांगितलेले आहे. मल मूत्र विसर्जन झाल्यावर या जागादेखील मऊ माती आणि पाणी लावून धुवाव्यात, असे सांगितलेले आहे. या जागा, ही इंद्रिये धुताना देखील वापरलेले पाणी पुनः अंगावर उडू नये, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.
नित्य कर्मामधे ‘गंडूष’ नावाचा विधी सांगितलेला आहे. तो याच मल शुद्धी साठी. गंडूष म्हणजे चुळा भरणे.
मल मूत्र विसर्जन झाल्यावर केवळ या इंद्रियांना शुद्ध केले म्हणजे पुरत नाही. नाक आणि तोंडाचीही शुद्धी चुळा भरून करावी. कारण मलविसर्जनावेळी नाका तोंडात जंतु जाण्याचीही शक्यता असते. हा संसर्ग होण्याची शक्यता गृहीत धरूनच लघवीला जाऊन आल्यावर चार वेळा, फलाहार झाल्यावर आठ वेळा, मल विसर्जनानंतर बारा वेळा आणि भोजन झाल्यावर सोळा वेळा गुळण्या करून नाकातोंडाची शुद्धी करावी, असे आश्वलायन सूत्रात सांगितले आहे.
तोंड धुवुन झाल्यावर जी चुळ बाहेर टाकायची ती सुद्धा काळजीपूर्वक टाकावी, त्याचे पाणी पुनः अंगावर उडू नये, किंवा इतरांच्या अंगावर पडू नये, इतकी काळजी घेत तोंड जमिनीच्या दिशेत खाली करून डाव्या बाजुला ही चुळ टाकावी.
भारतीय संस्कृती मधला सुसंस्कृतपणा लक्षात यावा, यासाठी मुद्दाम लिहिले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ, सिंधुदुर्ग.
9673938021
Leave a Reply