नवीन लेखन...

आश्वासक साहित्याची नोंद

अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हा हेरंब कुलकर्णी यांचा कवितासंग्रह हाती आला. यातील अनेक कविता सोशल मीडियावर गाजलेल्या आहेत.फेसबुक वॉल वर या कविता वाचता क्षणीच यातील प्रखर सामाजिक संदर्भ साक्षात उभा राहतो.सामाजिक ,शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय भाग घेत असताना अस्वस्थ क्षणांच्या नोंदी हेरंब ने अचूक नोंदवल्या आहेत. कष्टकरी जनतेच्या प्रश्नांचा अभ्यासपूर्ण मागोवा घेताना काही कविता नोंद केल्या आहेत.

हेरंब एक शिक्षक,सामाजिक कार्यकर्ता नात्याने प्रसिध्द आहे परंतु त्याचा मूळ पिंड कवीचा. त्याच्या कविता राजकीय सामाजिक व्यंगावर झणझणीत भाष्य करणाऱ्या मुक्तछंदातील मुक्त फटके आहेत. आदिवासी, दलित, झोपडपट्टी शेतमजूर ,अन्यायग्रस्त घोषित भटका समाज हा त्याच्या अभ्यासाचा विषय झाला. शिक्षक असल्यामुळे तो गोरगरीब दलित आदिवासी समाजाच्या अस्वस्थ नोंदी आपल्या वहीत नोंद करीत गेला.तळागाळातील समाज व्यवस्था व सत्तेतील राज्यसत्ता यातील समतोल अतिशय विषम आहे. साने गुरुजी यांच्या कार्याने भारावलेला शिक्षक हेरंब काही काळ कवितेपासून दूर गेला होता परंतु गरीब पीडित समाजाच्या झोपडी बांधावर पालावर तो नेहमीच पोहोचत होता.

प्रसिद्ध विचारवंत लेखक रावसाहेब कसबे यांनी या संग्रहा वर आपले निरीक्षण नोंदवताना मत व्यक्त केले आहे की

” हेरंब कुलकर्णी यांची लेखक व कार्यकर्ता म्हणून प्रागतिक धडपड ही बंडखोर, विद्रोही आणि सामाजिक न्यायासाठी लढणारी आहे. ‘अस्वस्थ क्षणांच्या नोंदी’ हा त्यांचा कवितासंग्रह अन्याय, सामाजिक विषमता, भ्रष्टाचार, राजकीय तत्त्वशून्यता, दांभिकता याविषयी पराकोटीचा संताप व्यक्त करणारा आहे. ..”

या कविता संग्रहा बद्दल नर्मदा आंदोलनाच्या सुप्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर यांनी प्रस्तावना दिली आहे.आपली प्रतिक्रिया देताना त्यांनी उल्लेख केला आहे की

“अनेक वर्षांपासून मी अनुभवते आहे हेरंब कुलकर्णीच्या मनातला दर्द ! त्यांची एकेका घडामोडीवरची कविता ही मनावर पडलेली छायाच नव्हे तर त्यांची आभाळमायाही प्रकटत असते. एक शिक्षक बालकांच्या भवितव्याबाबत सतत चिंतीत हेरंबभाऊ प्रबोधक बनले आहेत. हेच त्यांच्या कवितेतील गर्द शब्दांकनातून कळू शकते. त्यांची भ्रमंती दारिद्र्याच्या शोधायात्रेतून सुरु झाली..”

या संग्रहातील काही बलस्थाने आहेत.काही सामाजिक विचार आहेत ज्यामुळे हेरंब यांच्या काही नोंदी वाचताना मन अस्वस्थ होते. कवितेचे व्याकरण कदाचित नसेल परंतु सामाजिक व्याकरणाची सशक्त नोंद केली आहे. सामाजिक माध्यमावर व्यक्त होणारी तळमळ, कार्यकर्ता वर्ग क्रियाशील होण्यासाठी या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत.

” तो निघालाय” या कवितेत नायक प्रस्थापित राज्य सत्तेविरुद्ध विरोधात उभा राहून भारत जोडो यात्रेमध्ये खंबीरपणे निघाला आहे. वडील , आज्जीची हत्या झालेल्या प्रदेशात त्याची पायी यात्रा अविश्वसनीय आहे.या कवितेत कवी म्हणतो

” नुसते चालून काय होईल ?
लोकांशी बोलून काय होईल ?
हा दांडी यात्रेपासून
भूदान यात्रेपर्यंत विचारला गेलेला
आणि चंद्रशेखर ते बाबा आमटे यांच्यापर्यंत

खिल्ली उडवणारा

ऐतिहासिक प्रश्न त्यालाही विचारला जाईल….”

या साध्या सरळ प्रश्नाने कवितेचे व प्रसंगाचे गांभीर्य कवीने समोर उभे केले आहे. ही कविता 11 भाषेत भाषांतरित झाली आहे.भारत जोडो यात्रेतील राहुल गांधीपर्यंत ही कविता पोहोचली आहे हीच या कवितेची ताकद आहे.

“बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब मला लागत नाही” या कवितेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलन व समाज परिवर्तनातील हिशोब सहजपणे त्यांनी मांडला आहे.

” त्यांना समजेल अशा भाषेत
हा अनेक पदव्या घेतलेला कायदेपंडित
कोणत्या सुगम भाषेत बोलला असेल…?

की ज्या शब्दांनी गावच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे
थेट व्यवस्थेची गचांडी पकडू शकली….

या ओळीत कवीने दलित संघर्षात प्रज्वलित अर्थाचा हिशोब नेमक्या शब्दात त्याने व्यक्त केला आहे.

लोकशाहीचा व्हॅलेंटाईन डे या कवितेत कवीचा मूळ भेदक व्यंग्य भाव मारक भाषेत प्रकटला आहे. व्यंग्य हा हेरंबचा हुकमाचा पत्ता.

” बरे झाले साने गुरुजी तुम्ही आज गुरुजी राहिला नाही” या कवितेतील मर्म अतिशय वेदनादायी आहे. हेरंब व साने गुरुजी शिक्षक कुळातील दोघेजण समाजसेवक त्यामुळे या कवितेत वर्तमान शिक्षण पद्धती, डोनेशन, संस्थाचालक, शिक्षण सम्राट या विषयावर मर्मभेदी टीका आहे.

“महात्मा गांधींचा आता करावा तरी काय ”
या महात्मा गांधी यांच्या विचारांची हत्या अद्याप ते करू शकले नाहीत.गांधी विचार चिरंजीव आहे, ती सार्वकालिक आहे. सत्याचा विरोध किती दिवस टिकणार? गांधी हत्या झाली परंतु गांधी विचाराचा बहर अनेक ऋतूत फुलतच आहे. गांधी नावाचे राजकारण आजही केले जाते त्याबद्दल या कवितेतून खंत व्यक्त केलेली आहे.

शिक्षण क्षेत्रात काम करताना “माझ्या शालाबाह्य लेकरा” कवितेत कवी बाल मजुराच्या दयनीय स्थिती बद्दल केविलवाणा होतो.

शाला बाह्य मुलांच्या व्यथा समजा समोर कवितेच्या माध्यमातून मांडतो.

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या प्रामाणिक निरालस सेवेची स्तुती करताना कवी म्हणतो

” हे सारे कुठून येते…?
कुठल्या मातीचे बनलेले असता तुम्ही…?
गुगल सर्च करूनही याची उत्तरं मिळत नाहीत.

या कविता संग्रहातील शेवटची कविता “कॉमन मॅन ” प्रचंड गाजली होती.ती अनेक काव्य संमेलनात सादर झाली आहे. साहित्य अकादमीच्या “समकालीन भारतीय साहित्य” या पत्रिकेत तिचा हिंदी अनुवाद करण्याचे भाग्य मला लाभले आहे.

सामाजिक,शैक्षणिक कार्य करताना समाजाला दिशा दाखवणाऱ्या त्याच्या या नोंदी अर्थपूर्ण आहेत. त्याच्या मनात दडलेला कवी आज खूप दिवसांनी समोर आला आहे.त्याच्या या साहित्य सृजनाला लाख लाख शुभेच्छा.

+++++

विजय नगरकर
अहमदनगर
9422726400
vpnagarkar@gmail.com

विजय प्रभाकर नगरकर
About विजय प्रभाकर नगरकर 27 Articles
मी बीएसएनएल मधील सेवानिवृत्त राजभाषा अधिकारी आहे. राजभाषा विभागामध्ये कार्यरत होतो. अनुवादित कवितांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..