नवीन लेखन...

आता उरले लुटण्यापुरते

पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली. थोड्याशा नाराजीनेच वराह राजे स्वर्गात यायला तयार झाले. शेवटी स्वर्गसुखाची अभिलाषा ते तरी कसे टाळू शकत होते? नारद त्या वराहाला घेऊन स्वर्गात दाखल झाले. स्वर्गच तो! तिथे कशाची कमतरता? अमृताचे झरे, मदमस्त मदनिकांचा नृत्यविलास, कल्पवृक्षाने डवरलेले अनुपमेय सृष्टिसौंदर्य! नारदाने कौतुकमिश्रित उत्सुकतेने त्या वराहाला विचारले, ‘कसा वाटला स्वर्ग?’ चेहऱ्यावरची रेषही न हलू देता वराह उद्गारले, ‘हा कसला स्वर्ग? इथे तर मला लोळायला एकही गटार नाही, चाखायला थोडीसुद्धा घाण नाही, कसलाच आनंद नाही. तुमचा स्वर्ग तुम्हालाच लखलाभ. मला परत पृथ्वीवर घेऊन चला. तिथल्या गटारात लोळण्यात आणि घाणीत तोंड खुपसण्यातच माझे खरे स्वर्गसुख आहे’. त्या वराहाचे उत्तर ऐकून नारदांनी कपाळावर हात मारून घेतला.

आपल्या महान लोकशाहीच्या महान सपुतांची, म्हणजेच आपल्या जनप्रतिनिधींची अवस्था यापेक्षा वेगळी आहे काय? त्या वराहाने आपल्या निसर्गदत्त वृत्तीचेच प्रदर्शन केले. परंतु आपले राजकारणी मात्र मानवी जीवनाच्या गौरवास्पद आदर्शांचा त्याग करून त्या वराहासारखी घाणीत लोळण्याची वृत्ती बाळगतात आणि त्यातच आपली इतिश्री मानतात. त्यांचे स्वर्गसुख त्यातच आहे. अर्थात सर्वच जनप्रतिनिधी तसे असतील किंवा आहेत असे नाही. काही सन्माननीय अपवाद असतीलही परंतु अपवादाने नियमच सिद्ध होत असतात. ‘लुटणे’ या एकमेव धर्माचे पालन करणारी जनप्रतिनिधींची वृत्ती या महान देशाच्या अस्तित्वालाच नख लावायला निघाली आहे. त्यांचा स्वर्गही वेगळा आणि सुखही वेगळेच! अगदी संगनमताने लुटमार सुरू आहे. रानटी कुत्रे गटागटाने पाठलाग करून आपल्या भक्ष्याला जेरीस आणून जसे त्याचा फडशा पाडतात तसे हे आपले राजकारणी!कोणते क्षेत्र असे सुटले आहे की, ज्यात राजकारण्यांनी घाण केली नाही? शिक्षण, सहकार, खेळ, कृषी, उद्योग एवढेच नव्हे तर समाजसेवा आणि अध्यात्मासारखे क्षेत्रसुद्धा राजकारण्यांच्या बाजारी अस्तित्वाने गटारं झाली आहेत.

नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल झाला. या विस्तारासाठी कारणे कोणतीही सांगितली जावोत, खरे कारण सत्तेच्या लुटीतील साठमारी हेच आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. एखाद्या उद्योगधंद्यात अथवा संस्थेमध्ये पदाधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची संख्या वाढविली जात असेल तर त्याचा सरळ संबंध त्या उद्योगधंद्याच्या अथवा संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्ताराशी, उत्पादन वाढीशी असतो. मंत्रिमंडळ विस्ताराला मात्र हा नियम लागू नाही.

मंत्रिमंडळ विस्तार हा नेहमीच असंतुष्ट आत्म्यांना संतुष्ट करण्यासाठी होत असतो आणि हे आत्मे असंतुष्ट का असतात? कारण सोपं आहे. आपले जातीबांधव दोन्ही हातांनी यथेच्छ लूट करत असताना ह्यांच्या पोटात दुखणार नाही तर काय? मग अशा असंतुष्ट आत्म्यांचे उपद्रवमूल्य कमी करण्यासाठी त्यांनाही लुटीची संधी दिली जाते आणि त्याला गडस नाव दिल्या जाते मंत्रिमंडळ विस्ताराचे. केवळ अपरिहार्य कारणाने ज्यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्या जात नाही, त्यांची वर्णी विविध महामंडळावर लावली जाते. सरकारी अनुदानावर चालणारी ही महामंडळे अशा भुताखेतांना पोसण्यासाठी निर्माण केली

आहेत अन्यथा वर्षानुवर्षे तोट्यात चालणारी ही महामंडळे सुरूच ठेवण्याचे कारण काय? दरोडेखोरांची गर्दी दिवसदिवस वाढतच

चालली असल्याने मंत्रिपरिषद, महामंडळेदेखील अपुरी पडत आहेत. अशावेळी सत्तेच्या विलासी उपभोगात व्यत्यय येऊ नये म्हणून

शक्य होईल त्या पद्धतीने अशा सत्तापिपासूंना संतुष्ट केले जात आहे. मग त्यासाठी नवीन साखर कारखान्यांना, सूतगिरण्यांना

विनासायास परवानगी दिली जाते. आधीच अस्तित्वात असलेले साखर कारखाने, सूतगिरण्या जर्जर होऊन बंद पडत असताना,

नवीन कारखान्यांना परवानगी कशासाठी? असा प्रश्न विचारत असाल तर तुम्ही मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहात. भरपूर पीक

काढूनही इथला शेतकरी गरीब कसा? हा प्रश्न तुम्हाला अस्वस्थ करीत असेल तर तुम्हाला इथल्या अर्थशास्त्राचे नियमच माहीत

नसावेत. प्रामाणिकपणे काम करून पोट भरता येते, यावर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही लवकरच भिकेला लागाल. हे विचार

माझे नाहीत; आपल्या नेत्यांनी, आपण ज्यांना भरघोस मतांनी निवडून दिले त्या जनप्रतिनिधींनी निर्माण केलेल्या आदर्श

तत्त्वज्ञानाचे हे सार आहे. त्यांच्या आदर्शानुसार समाजात केवळ दोनच वर्गाचे लोक राहतात. एक लुटणारे आणि दुसरे लुटल्या

जाणारे. सत्तेत असलेले, आणि सत्तेत नसलेले जनप्रतिनिधी तसेच अक्राळविक्राळ पसरलेली नोकरशाही या सगळ्यांचा मिळून

एक सर्वव्यापी ‘लुटारू महासंघ’ निर्माण झाला आहे. या महासंघाचे कार्यक्षेत्र अमर्यादित आहे. त्यांच्या वर्चस्वाला शह देणे

सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे आणि म्हणूनच दिवसाढवळ्या घरावर दरोडा पडत असताना कुठेच ओरड होताना दिसत नाही.

आता तर हळूहळू या लुटमारीला राजमान्यता, समाजमान्यता मिळू लागली आहे. पूर्वी ‘भ्रष्टाचार’ हा बातमीचा विषय असायचा.

अशी बातमी वर्तमानपत्रात छापून आली की, खळबळ माजायची. बातमीची वरिष्ठ पातळीवर दखल घेतल्या जायची. अशाच एका

प्रकरणी तत्कालीन संरक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता; परंतु ही गोष्ट जेव्हा शासनयंत्रणेची संवेदनशीलता जागृत होती

तेव्हाची आहे. आज तर शासनात सारे कोडगे लोकं गोळा झाले आहेत. मंत्रिमंडळात क्रमांक दोनच्या समजल्या जाणाऱ्या

प्रतिष्ठेच्या पदावरील मंत्र्याने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या माध्यमातून करोडो रूपये कमावल्याची बातमी आता ‘बातमी’ ठरू

शकत नाही. शीर्षस्थ नेत्यांचा हा राजमंत्र मग खालच्या

पातळीवरील छुटपूट नेत्यांनी जपला तर नवल कसले? बरं, ह राजकारणी

नेतेमंडळी केवळ लुटारूच नाही तर पाषाणहृदयी खुनीसुद्धा आहे. निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे नव्हे तर

हत्येचे पातक यांच्या माथ्यावर आहे. करोडोचा मलिदा खाऊ घालतात म्हणून धीरूभाई अंबानींच्या भेटीसाठी झाडून सारे

नेतेमंडळी दवाखान्यात हजर होतात आणि आमचा गरीब शेतकरी पाय घासत रस्त्यावर मरतो तरी त्याच्याकडे पाहायलादेखील

कोणाला वेळ नाही. एखाद्या बाजारबसवीने नावापुरता कुंकवाचा टिळा लावून गावभर शेण खात फिरावे तसेच या जनप्रतिनिधींचे

झाले आहे. या लोकांनी कुंकवाचा टिळा तर जनकल्याणाच्या नावे लावला आहे परंतु वृत्ती आणि कृती मात्र शेण खाण्याची ठेवली.दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या नेत्यांनी, जनप्रतिनिधींनी केवळ लुटणे हेच एकमेव ‘लक्ष्य’ ठेवले. स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणारा

महाराष्ट्रही त्यात मागे नाही. सत्ता टिकवणे आणि सत्तेच्या माध्यमातून लुटमार अव्याहतपणे चालू ठेवणे या किमान समान

कार्यक्रमासाठीच आपली आघाडी झाली असल्याचे या सत्ताधाऱ्यांनी स्पष्ट केले आहे आणि सत्ता टिकविण्यासाठी किंवा सत्ता

बळकाविण्यासाठी हे सफेदपोश जनप्रतिनिधी कोणत्या स्तराला जाऊ शकतात याचे बीभत्स दर्शन नुकतेच महाराष्ट्रात घडले.एकंदरीत, जनसामान्यांच्या प्रश्नांना सरकार पातळीवर वाचा फोडण्यासाठी ज्यांना आम्ही प्रतिनिधी म्हणून निवडले त्यांनी आपली

तुंबडी भरताना या जनसामान्यांनाच नागवे केले आहे. जनतेची स्मृती ही फार अल्प असते असे म्हणतात. मात्र काही घटना ह्या मन:पटलावर कोरल्या जातात. ह्या अशा कोरलेल्या

घटनांचे स्मरण ठेऊन जनता जर घराबाहेर निघून लोकशाहीने दिलेल्या मतदानाचा योग्य हक्क बजावत असेल तरच काही

आशेचा किरण आहे. अन्यथा अंध:कारच!

— प्रकाश पोहरे

Avatar
About प्रकाश पोहरे 436 Articles
श्री. प्रकाश पोहरे हे विदर्भातील “देशोन्नती” या लोकप्रिय दैनिकाचे मालक तसेच मुख्य संपादक आहेत. त्यांचे “प्रहार” या सदराअंतर्गत संपादकीय लेख फार लोकप्रिय आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..