१९९२ साली “ज्ञानेश्वरी “( भावार्थदीपिका) लेखनाला ७०० वर्षे पूर्ण झाली, पण त्यावेळचे काही सोहोळे लक्षात नाहीत.
१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला.
लहानपणी पहाटे एदलाबादच्या विठ्ठल मंदिरातील काकडा आरतीच्या वेळी पणजोबांच्या खड्या आवाजातील ऐकलेला माउलींचा गजर पुन्हा भेटला आणि जवळच असलेल्या धाकट्या चित्कलेच्या (मुक्ताई) समाधी मंदिरातील प्रखर जयघोष आठवत राहिला.
उरलेल्या दोन्ही कुलकर्णी पुत्रांच्या गांवी (त्यंबकेश्वर आणि सासवड) जाण्याची संधी त्यानंतर मिळाली पण या दोन्ही भेटींची मुळं १९९६ सालात रुजली होती.
सांगलीला कॅम्पस सिलेक्शन साठी गेलो असता एका स्थानिक बँकेने या चारही भावंडांच्या समाध्यांचे काढलेले एक असाधारण कॅलेंडर बघण्यात आले. हावरटपणे मी त्याची एक प्रत मागून घेतली आणि घरी आल्यावर लॅमिनेट करून घरात ठेवली. आज ती प्रत थोडी थकली आहे,पण या चारही दैदिप्यमान भावंडांचे स्मरण आणि कर्तृत्व चिरस्थायी आहे.
प्रा. शंकर वैद्य,लता दिदी आणि भावगंधर्व हृदयनाथ यांचे निरूपणाचे कार्यक्रम यानिमित्ताने झाले. वरकरणी गंभीर आणि दरारा निर्माण करणारे व्यक्तिमत्व असलेले वैद्य, आवाजातील अंगीभूत जरब विसरून या मंगेशकर भावंडांना माऊली पुन्हा एकदा भेटवत होते. दोघेही उत्तुंग मंगेशकर माऊली चरणी लीन होऊन तो गोषवारा अंगीकारत होते आणि अधून-मधून स्वरांमधून साकारत होते.
नुकतीच माउलींच्या आयुष्यावर पुन्हा एक मालिका सुरु झाली आहे,तिची टॅगलाईन ” समाधीची ७२५ वर्षे ” अशी काहीशी वाचून मनात आलं – झाली इतक्यात या आठवणींना आणि जगलेल्या क्षणांना २५ वर्षे – पाव शतक?
दरम्यान अनेकदा आळंदीला जाणे झाले. त्यामानाने इतर तिघा भावंडांच्या समाधीस्थळी जाणे अभावानेच घडले.
१९९६ साली ठरविलं होतं – ज्ञानेश्वरीचे लेखन झाले त्यास्थळी जायचे. तेवढं अजूनही जमलं नाहीए.
आठवणींचे निर्माल्य व्हायच्या आत जावं म्हणतोय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply