नवीन लेखन...

आत्महत्त्या…

विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पेपर समोरच्या टेबलावर ठेऊन पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाजात रमेश उभा असतो त्याला आत घेताच…

रमेश : घरी कोणीच नाही वाटतं ?

विजय : नाही ! तू बस मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो…

रमेश : नाही ! नको ! मी आताच चहा घेतला आहे…

विजय: सह्ज आला होतास की काही काम होते ?

रमेश समोरच्या सोफ्यावर बसत… तुला उमा बद्दल काही कळले की नाही ?

विजय : उमा बद्दल तिचे काय झाले ?

रमेश : दोन दिवसापूर्वी ती गेली ?

विजय : काय ? अशी कशी गेली ?? काही दिवसापूर्वीच आपल्या इमारतीत तिच्या कोणा ओळखीच्या माणसांना भेटायाला आली होती तेव्हा आमच्यात छान संवाद झाला होता. तेंव्हा तर ती चांगली ठणठणीत होती. असे अचानक तिला काय झाले ? मला फोन तरी करायचा ?

रमेश : तू गावी होतास ना ! तुला फोन करत होतो पण लागला नाही. तुला फोन लागूनही तसा काही उपयोग नव्हताच .

विजय : तू गेला होतास ना तिच्या अंत्यसंस्काराला ?

रमेश : हो ! मी गेलो होतो पण ते सारे मला पाहावत नव्हते. ती अविवाहीत तरूण मुलगी असल्यामूळे तिला अंत्यसंस्कारापूर्वी अगदी नवीन नवरीसारखे नटविले होते, तिचे लग्नही लावले. मी जड मनाने अक्षताही टाकल्या. हे सारे करताना माझ्या डोळ्यातून अक्षरश: गंगा – जमुना वाहात होत्या.

विजय : नक्की काय झाले होते ? आजारी होती का ? काही मोठा आजार झाला होता का तिला ?  मला सविस्तर सांग जरा…

रमेश : तिच्या घरचे म्हणत होते की तिने रस्त्यावरील गाडीवरचे काहीबाई अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे तिला विषबाधा झाली आणि त्यामुळेच तिची तब्बेत बिघडून तिचा मृत्यू झाला.

विजय : हे कसे शक्य आहे ? मला नाही वाटत की नुसत्या अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असेल. इतकीही ती लेची- पेची नव्हती. नक्कीच काहीतरी दुसरे कारण असणार ? तिचे कोणासोबत प्रेमप्रकरण वगैरे सुरु होते का ?

रमेश : त्या बद्दल मला तरी काही माहीत नाही… पण मी माहिती काढल्यावर मला बाहेरून असे कळले आहे की ती उंदीर मारण्याचे विष प्यायलेली होती…कित्येक तास तिने ते कोणाला कळूच दिले नाही त्यामुळेच ते तिच्या शरीरात चांगलेच भिनले, त्यामुळेच कदाचित डॉक्टरांनाही तिला वाचविणे अशक्य झाले.

विजय  : म्हणजे उमाने आत्महत्या केली आहे… तिच्यासारख्या दिलखुलास मुलीने आत्महत्या करणे तसे थोडे पचायला जडच आहे. सध्याच्या स्वार्थी जगातही कोणाचे कोणाला पडलेले नसताही लोक आत्महत्या करतात हे जरा विचित्रच वाटते, आज सगळ्यांना माहित आहे हे जग कोणासाठीही कधीही थांबत नाही, आता तिने आत्महत्या केली तिच्या घरच्यांना प्रचंड दु:ख झाले असेल पण तरीही ते किती दिवस रडतील फार फार महिनाभर त्यानंतर तरी ते अपल्या जगण्यात रमायला सुरुवात करतीलच ! तिच्या आत्महत्या करण्याने तिने कोणता प्रश्न तर नक्कीच सोडविला नसेल उलट तिची आत्महत्या तिच्या घरच्यांसाठी  नवीन प्रश्न निर्माण करून गेली आहे. ज्या घरातील व्यक्तीने आत्महत्या केली आहे अशा घरात सांत्वनाला जाणेही फारच विचित्र वाटते कारण त्यांच्या मनात सतत हाच विचार सुरु असतो की समोरच्यांच्या प्रश्नाला काय उत्तरे द्यायची. खरे कारण सांगता येत नाही आणि खोटे बोलणे अवघड होऊन बसते.

रमेश : हो ! मलाही ती असे काही करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. तिचा भाऊ माझा खास मित्र त्यामुळे तिच्यात आणि माझ्यात खास मैत्री ! पण तिच्या भावाने आमच्या मैत्रीवर कधीच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही. त्याचा तिच्यावर प्रचंड जीव होता. तिच्या अशा अचानक जाण्याने तो खूपच खचला आहे. ती तिशीच्या जवळ असतानाही तिला त्याचे लग्न झाल्याखेरीज लग्न करायचे नव्हते. ती फारच हळव्या मनाची होती कोणाचही दु:ख तिला पाहावत नसे.

विजय: सध्याच्या युगात हळव्या मनाचे असणे हिच एक समस्या झालेली आहे  कारण आज कोणालाही कोणाचेही मन दुखविताना काहीच वाटत नाही. मला तर वाटते तिच्या आई – वडिलांनी तिचे लग्न वेळेतच उरकून टाकायला हवे होते कारण तसेही तिने तिच्या आयुष्यात कोणतेही फार मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवलेले नव्हते. ती मुलगी संसारात आणि माणसात रमण्यास योग्य होती. आता काय बिचारीची सारी स्वप्ने स्वप्नेच राहिली. तिच्या जण्याचे कळताच क्षणभर मला प्रचंड वाईट वाटले होते पण तिने आत्महत्या केली हे कळताच मात्र माझ्या वाईट वाटण्याची तिव्रता कमी झाली. का कोणास जाणे कोणी आत्महत्या केली मग ती कोणत्याही कारणाने का असेना मला त्याचे फारसे वाईट वाटत नाही. या जगात कोणत्याही मनुष्याला आत्महत्या करायला लागावी असे कोणतेही कारण अ‍स्तित्वातच नाही… या मताचा मी आहे. मनुष्य प्राणी सोडून इतर प्राणी कोठे आत्महत्या करतात. मनुष्याच्या आत्महत्तेला जर कोणती गोष्ट कारणीभुत असतील तर त्या मानवी समस्या नक्कीच नाहीत  त्याला जर काही जबाबदार असेल तर तो म्हणजे अतिविचारी मानवी मेंदू !

रमेश : तू बरोबर बोलत आहेस एकाच समस्येतून जाणारे दोन व्यक्ती आत्महत्या करीत नाही. हजारो लोकांचा प्रेमभंग  होतो, विश्वासघात होतो, असाध्य आजार होतात, आर्थिक नुकसान होते, संकटे येतात, पण त्या हजारातील फक्त एखादाच आत्महत्या करतो.

विजय : आत्महत्तेचा विचार कोणाच्या मनात एका दिवसात कधीच अचानक येत नाही. प्रत्यक्ष आत्महत्या करण्यापूर्वी कित्येक दिवस अगोदर तो त्याच्या मेंदूत घोळत असतो. असा विचार करणारे लोक कधी – कधी अचानक अती उत्साहीपणेही वागायला लागलेले असतात जे नैसर्गिक नसते. म्हणजे ती तिच्या  घरच्यांना आणि बाहेरच्यांनाही जे ती खूप आनंदात असल्याचे दाखवत होती ते खोटे होते. वास्तवात ती आतल्या आत मानसिक दृष्ट्या पोखरली जात होती. एक मुलगी म्हणून तिच्या घरच्यांनी तिच्या वयाच्या इतर मुलींच्या दृष्टीकोनातून तिचा विचार करायला हवा होता. तिचे लग्न झाले नसतानाही ती तिच्या सर्व मित्र – मैत्रींणींच्या लग्नात उत्साहाने सहभागी होत होती हे खरेतर चांगले लक्षण नव्हते. आज पालक आपल्या मुलींसाठी सर्वगुण संपन्न, निर्व्यसनी, सरकारी नोकरी असणारा, श्रीमंत स्वत:चे घर असणारा आणि कुटुंबापासून विभ्क्त राहाण्यास तयार असणारा त्यासोबतच आपल्या जातीतील मुलगा शोधत असतात. त्यामुळे मुलीची लग्नाची वये उलटून जातात, त्यातल्या त्यात सामान्य घरातील सामान्य मुली लवकर लग्न करून आपल्या सामान्य संसारात रमून सामान्य सुखे उपभोगत सामान्य आयुष्य सुखासमाधानाने जगत राहतात, त्यांच्या मनात आत्महत्तेचे विचार येत नाहीत कारण त्यांच्या डोक्यात सतत फक्त आपले पोट भरण्याचा विचार असतो, बाकीच्या गोष्टींचा विचार करायला त्यांना वेळच मिळत नाही.

रमेश : तू बरोबर बोलतो आहेस रस्त्याच्या कडेला उगड्यावर संसार थाटलेल्या लोकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या कधी वाचनात येत नाहीत.

विजय : त्या येणारही नाहीत… कारण त्यांना फक्त आपले पोट भरण्याची चिंता असते बाकी कोणत्याही संसारीक मोहात ते फार गुंतलेले नसतात. त्यांच्या स्त्रियांना कधी पाहिले आहेस ? एखाद्या सुपर मॉडेललाही लाजवेल अशी त्यांची अंगकाटी असते काही तर दिसायला रेखीव आणि फारच सुंदर असतात पण  तरीही  उगड्यावर त्यांच्या भोक पडलेल्या कापड्यातून डोकवणारे त्यांचे अंग कोणी पाहातही असेल ह्याची त्यांना अजिबात चिंता नसते. रोज काम करायचे संध्याकाळी मस्त मटन शिजवायचे त्यासोबत थोडी दारू ढोसायची आणि जगाची आणि उद्याची चिंता न करता मस्तपैकी ताणून द्यायचे…

रमेश : हो ! कधी – कधी मला ते लोक आपल्यापेक्षाही सुखी वाटतात कारण त्यांना पोटाची सोडली तरी बाकी कशाची फारशी चिंता नसते.

विजय : अगदीच असे नाही त्यांचीही नक्कीच काही स्वप्ने असतील पण शिक्षणाच्या अभावामुळे कदाचित ती फार मोठी नसतात. अज्ञानात सुख असते !  म्हणतात ते काही खोटे नाही. तसे पाहिले तर वास्तवात कोणत्याही मध्यमवर्गीय माणसाइतकेच त्यांचे उत्पन्न असते. तरीही ते अतिसामान्य आयुष्य जगतात. माणसाचा आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य मिळविण्याची अट्टाहासच कधी – कधी त्याला मृत्यूच्या जवळ घेऊन जातो.

रमेश : तुझे तरी काय वेगळे आहे ? तू ही एका ध्येयाने पछाडलेला असल्यामुळेच अजूनही अविवाहीत आहेस ! तुझ्या आयुष्यात इतक्या स्त्रिया येऊनही कोणाच्या प्रेमात गुंतून पडला नाहीस ! तू तुझे ध्येय साध्य केलेस का ? तुझ्या मनात असा आत्महत्तेचा विचार कधी डोकावला नाही ना ?

विजय : मी फक्त एक विचारी माणूस नाही तर अती विचारी माणूस आहे. त्यामुळे या जगातील कोणाच्याच जागण्याला तसा काहीही अर्थ नाही हे सत्य मी जाणतो… पण मला नेहमी वाटते जर परमेश्वराने आपल्याला माणसाचा जन्म दिलेला आहे तर निदान आपण जोपर्यत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यत जगण्यातील मजा लुटण्यासाठी तरी जगले पाहिजे. त्याला पर्याय असू शकत नाही. आत्महत्या करणे म्हणजे जगण्यापासून पळण्यासारखे आहे. तसा ही जो जगण्यापासून पळण्याचा प्रयत्न करू पाहतो तो आत्महत्या करण्यापूर्वीच मेलेला असतो. कोणाच्याही आत्महत्तेने या जगातील कोणताच प्रश्न कधीही सुटलेला नाही आणि भविष्यातही सुटणार नाही.

रमेश : तू अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाहीस ?

विजय : रमेश हे सत्य आहे की आपल्या जगण्याला काही अर्थ नाही असे कधी कधी मलाही वाटून जाते, मलाच काय प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यात हे असे कधी ना कधी वाटून जातेच… त्यात काही नवीन नाही. उमाने आत्महत्या करण्याला एक कारण असू शकते ते म्हणजे लग्न अथवा प्रेमभंग दुसरे कोणते कारण असण्याची शक्यताच नाही हे तुलाही चांगलेच माहीत आहे.

रमेश : हे बाकी तू बरोबर बोललास ! तशी तिच्या घरी काही आर्थिक समस्या नव्हती, तिचे घरचे तिचे लग्न लावून द्यायला कधीही तयार होते, कदाचित तिला लग्नच करायचे नसेल त्यामुळे लग्न करण्याच्या विचाराने तिला मानसिक त्रास होत असेल अथवा तिला ज्याच्यासोबत लग्न करायचे असेल तो लग्नाला तयार नसेल. अथवा तिचे प्रेम दुसर्‍या कोणाचे तरी झाले असेल.

विजय : हे बाकी तू बरोबर बोललास आयुष्यात अपयश पचवता येणे खूप महत्वाचे असते ज्यांना ज्यांना त्यांच्या आयुष्यात अपयश पचवता आले ते पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात खूपच यशस्वी झाले.

रमेश : तुला नाही का अपयशाची भिती वाटत ?

विजय : पुर्वी वाटायची ! आता नाही वाटत !! ज्या दिवशी माणुस त्याच्या आयूष्यातील सर्वात मोठे अपयश पचवतो त्यानंतर कोणत्याही अपयशाचे त्याला काहीही वाटेनासे होते. ते मोठे अपयश जास्तीत जास्त वेळा माणसाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करते त्यामुळे माणसाच्या आयुष्यात जितके यश महत्वाचे आहे तितकेच अपयशही महत्वाचे आहे. सतत यश मिळविणार्‍यांना अपयश पचविणे जड जाते.

रमेश : हे बाकी खरे आहे… सतत सुखासीन आयुष्य जगणारा आपल्या आयुष्यात येणार्‍या संभाव्य दु:खाच्या कल्पनेनेही आत्महत्या करतो.

विजय : त्यामुळेच ज्यांचे आयुष्य अनेक चढउतारांनी आणि सुख-दु:खांनी भरलेले असते ते सहसा आत्महत्या करीत नाहीत.

रमेश: उमाची आत्महत्या ही काहींच्या मते एक सामान्य आत्महत्या असली तरी माझ्या नजरेत मात्र कोणत्याही स्त्रीची  आत्महत्या ही एक समस्या आहे. समाजाने आत्महत्या करणार्‍या प्रत्येक स्त्रीच्या आत्महत्तेच्या कारणांचा डोळसपणे अभ्यास करायला हवा ! ज्या कारणांने स्त्रियांच्या मनात आत्महत्तेचा विचार डोकावतो ती कारणेच दूर करण्यासाठी समाजाने प्रयत्न करायला हवा ! कुटुंबातील स्त्रियांसोबत सर्वच अगदी सर्वच विषयावर मोकळा संवाद व्हायला हवा ! जो आज आपल्या समाजात कदाचित होत नाही.

विजय : तू अगदीच योग्य ते बोललास माझी व्यक्तीश: कोणत्याही स्त्री सोबत अगदी कोणत्याही विषयावर चर्चा करायची तयारी असते. उमा माझ्यापेक्षा वयाने फारच लहान असली तरी आमच्यात उत्तम संवाद व्हायचा पण मागच्या काही वर्षात आमची भेट बर्‍याचदा झाली पण संवाद मात्र झाला नाही तो व्हायला हवा होता तो न झाल्याची खंत मला आयुष्यभर राहील. आत्महत्तेसारखे विचार माणसाच्या मनात येत असताना त्याने आपले मन कोणासमोरतरी मोकळे करण्याची गरज आहेच त्यासोबत आत्महत्तेचा विचार मनात आल्यास कोणी ही आपली आत्महत्या एक दिवस जरी पुढे ढकलली  तरी कदाचित तो त्याच्या आत्महत्तेच्या विचारापासून परावृत्त  होऊ  शकतो कारण माणसाचे आयुष्य बदलायला कधी कधी एक घटना अथवा एक क्षणही पुरेसा होतो.

रमेश : आज माणूस माणसांच्या गराड्यात असूनही एकटा पडलेला आहे कारण एकच संवादाची कमतरता त्यामुळे माणसा माणसातील संवाद वाढायला हवा !

विजय : हो ! व्हॉट्स अ‍ॅपवर सतत मेसेज पाठविणे म्हणजे संवाद नव्हे ! सोशल मिडियावर असलेले आपले हजारो मित्र म्हणजे आपले खरे मित्र नव्हे ! त्यामुळे संवाद हा प्रत्यक्ष  भेटून बोलून होत नसेल तरी तो फोनवर बोलून अथवा व्हिडिओ कॉल करून व्हायला हवा ! प्रत्येकाने असा एक मित्र अथवा मैत्रीण आयुष्यभर सांभळायला हवी ज्याला किंवा जिला आपण आपल्या आयुष्यातील सर्व गुपिते सांगू शकू !

रमेश : विजय ! असा एखादा तुझा मित्र आहे का ?

विजय : हो ! आहे ज्याला माझे अगदी लहानपणापासूनची सर्व  गुपिते जी माझ्या घरच्यांनाही माहीत नाहीत . आम्ही जेंव्हा कधी प्रत्यक्ष भेटतो तेंव्हा आमच्यात  कमीत कमी दोन ते तीन तास तरी संवाद हा होतोच. इतकेच काय माझे लग्न न करण्याचे जे कारण कोणालाच माहीत नाही अगदी माझ्या घरच्यांनाही ते कारणही त्याला माहीत आहे. आत्महत्त्या रोखण्याचा  संवाद हाच एक उत्तम उपाय आहे. त्यामुळे कोणासोबत कोणत्याही विषयावरील  संवाद करणे टाळता कामा नये.

रमेश : माझी आणि उमाची मैत्री खूप घट्ट होती पण आमच्यातील संवाद मात्र कदाचित तितका घट्ट नव्हता, तो असता तर कदाचित ती माझ्याशी तिचे मन मोकळे करू शकली असती.

विजय : मन मोकळे करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे लिखाण… त्यामुळे प्रत्येकाला रोजनिशी लिहिण्याची सवय असणे उत्तम असते. मग ते शब्द फक्त कागदावर उमटणे गरजेचे आहे असे नाही ते संगणकाच्या स्क्रिनवर उमटले तरी काही हरकत नाही पण ते उमटायला हवे ! रोज स्वत:चा स्वत:शी संवाद होणे फार गरजेचे आहे.

रमेश : तू अगदी योग्य ते बोललास ! आता मी निदान रोजच्या रोज माझ्या बायकोसमोर तरी माझे मन मोकळे करत जाईन…

विजय : हेच उत्तम होईल…

( इतक्यात रमेशचा मोबाईल खणखणतो त्याच्या बायकोचा फोन असतो तो उचलतो आणि कानाला लावतो… पलिकडून त्याची बायको त्याच्याशी काहीतरी बोलते आणि त्याचा चेहरा पडतो. त्याचा पडलेला चेहरा पाहून… )

विजय : काय झाले ? अचानक तुझा चेहरा असा का पडला ?

रमेश : आमच्या माजल्यावर भाड्याच्या घरात राहणार्‍या कुटुंबातील 22 वर्षच्या अविवाहीत मुलीने पंख्याला फास लावून काही वेळापूर्वीच आत्महत्या केली…. आज सकाळीच आमची नजरानजर झाली होती… नेहमीसारखी मला पाहताच गोड हसली होती… आता तिच्या आमहत्तेमागे कारण काय असेल…

विजय : नुकताच साजरा झालेला प्रेमाचा दिवस….

©लेखक :- निलेश दत्ताराम बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..