राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी विसाव्या शतकात जीवन जगणाऱ्या माणसाची नाडी ओळखली, प्रगत समाजातील प्रश्न त्यांनी पाहिले आणि विज्ञानाची घोडदौड जाणून घेतली. संत परंपरेचा मूळ धागा न सोडता त्यांनी-‘अध्यात्म और विज्ञान से सब हो सुखी सहयोग समता से यह सृष्टी बने स्वर्गही’ अशी गुरुदेवाला विनम्र प्रार्थना केली. या जगात सत्धर्म- सूर्याचा प्रकाश फैलावून सर्वत्र शांती नांदावी अशी त्यांची इच्छा होती. तुकडोजींचा गुरुदेव म्हणजे एखादी मूर्ती नव्हती. तुकडोजींचा गुरुदेव म्हणजे एखादी व्यक्ती नव्हती तर त्यांचा गुरुदेव म्हणजे एक महान शक्ती होती. ज्या शक्तीने सारे ब्रह्मांड व्यापून टाकले आहे अन् ती शक्ती प्रत्येकाजवळ ओतप्रोत भरलेली आहे ते आपल्या ‘ग्रामगीते’त म्हणतात-
‘ग्रामगीते’त म्हणतात-
‘आपणांचे झाला धराधव ।
उरला भरोनी महिवर ।
अनुरेणुतुनि करिशी संचार ।
विश्वनाटक नटावया ।।
गुरु हाडामासाचा नोहे ।
गुरु नोहे जाति संप्रदाय ।
गुरु शुद्ध ज्ञानतत्त्वचि आहे ।
अनुभवियांचे ।।
गुरू हे ज्ञानतत्त्व आहे, गुरू हे निर्मळ असे आत्मतत्त्व आहे. तुकडोजी महाराज ज्ञानतत्त्वाचे पुजारी होते. ‘हम हो पुजार तत्त्व के, गुरुदेव के आदेश के’ असे ते स्वतःच सांगतात.
गीतेत ज्ञान आणि विज्ञान हे दोन शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी कोण आहे याची अनुभूती आणि विज्ञान म्हणजे साऱ्या सृष्टीचे ज्ञान, कालचक्राचे ज्ञान, काही लोक म्हणतात- ‘विज्ञान जेथे संपते तेथे ज्ञान सुरू होते’ परंतु संतांना हे अभिप्रेत नाही. ज्ञान आणि विज्ञान हे वेगळे नाही. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, एवढेच नव्हे तर ज्ञानाशिवाय विज्ञान अन् विज्ञानाशिवाय ज्ञान असूच शकत नाही. दोन्हीही एकच आहे, साऱ्या सृष्टीचे ज्ञान म्हणजे ईश्वराचे ज्ञान होय. देवाचे अस्तित्व आहे ठायी ठायी, ‘घटघट में भगवान’ असे जे संतमंडळी म्हणतात त्यामागची ती भूमिकाच आहे. तुकडोजी महाराजांनी हे वयाच्या विसाव्या वर्षाच्या आतच ओळखले होते. रामटेकच्या जंगलात योगाची साधना करताना किंवा गोंदोड्याच्या तपोभूमीत तप करीत असताना त्यांना त्या अफाट, अमर्याद शक्तीची जाणीव झाली. म्हणूनच ‘म्हणूनिया मागे फिरलो, द्वारी झोपडीत शिरलो’ असे त्यांनी म्हटले आहे.
-संत तुकडोजी महाराज
Leave a Reply