नवीन लेखन...

आयुष्याच्या एका वळणावर …

आयुष्याच्या एका वळणावर … – लेखक – निलेश बामणे


एका बागेमध्ये एक साठीचा पुरुष ( प्रणय ) जॉगिंग करत असतो, जॉगींग करता करता घामाघुम झालेला तो घाम पुसण्यासाठी बागेतील एका बाकावर बसतो बाकावर बसल्यावर समोरून जॉगिंग करत जाणार्‍या सुंदर तरूणीकडे तो एक टक पाहात असतो इतक्यात त्याच्याच वयाचे दोन पुरुष त्याच्या दिशेने त्याच्याकडे पाहात जॉगिंग  करत येत असतात ते त्याच्या जवळ येताच आपला वेग कमी करतात आणि त्याच्या मागे हळूच येऊन उभे राहतात आणि त्यातील…

एक ( महेश )  : पिकल्या पानाचा !

दुसरा  ( विजय ) : देट की ओ हिरवा !

ह्या ओळी ते गुणगुणताच प्रणय भानावर येतो… आणि मागे वळून पाहात….

प्रणय : अरे महेश – विजय तुम्ही कधी आलात ?

महेश : जेव्हा ! तू त्या तरूणीला पाहात तुझे डोळे शेकवत होतास तेंव्हा !

विजय : हे काय ? प्रणय ! तुला शोभते का हे असे करणे ह्या वयात ?

प्रणय : ह्या वयात म्हणजे ? तुम्ही स्वत:ला म्हातारे वगैरे समजत असाल पण मी अजून स्वत:ला म्हातारा वगैरे समजत नाही, तसेही  घोडा आणि पुरुष कधीही म्हातारे होत नसतात. आता मी तिच्या शारीरिक सौंदर्याकडे न पाहणे हा तिच्या सौंदर्याचा अपमान नसता का ठरला ?

महेश : तू इतकाच स्त्रियांच्या सौंदर्याचा चाहता होतास तर मग लग्न का केले नाहीस ? सतत स्त्रियांपासून आयुष्यभर दूर का पळत राहिलास ?

विजय : प्रणय ! अजूनही वेळ गेलेली नाही !  तू आता ही लग्न करू शकतोस ! तू जितका फिट आहेस ते पाहता कोणीही चाळीशीची स्त्री सुद्धा तुझ्याशी लग्न करायला तयार होईल ? तशीही सद्या साठीत लग्न करण्याची नवीन फॅशन आलेलीच आहे.

प्रणय : मला जर लग्नच करायचे असते तर मी वीशीतच केले नसते का ? तेंव्हा माझ्या मागे मुलींची रांग लागलेली होती.

महेश : रांग तर आजही आहे फक्त ती रांग आता वयस्कर स्त्रियांची आहे इतकाच काय तो फरक आहे.

विजय : तुझ्याकडे काम करायला सध्या जी बाई येते ! ती ही दिसायला काही कमी नाही,  त्यात बिचारी विधवाही आहे.

प्रणय: तुम्हाला काही ! लाज- लज्जा आहे की नाही ? अरे तुम्ही आता आजोबा झालेले आहात याचे तरी भान असूदया !

महेश : आजोबा ! ते आम्ही फक्त जगासाठी झालेलो आहोत ! पण नातवंडांचे सुख काही आमच्या नशिबात नाही…

विजय : हो ! आम्ही फक्त नावापुरते आजी- आजोबा झालेलो आहोत, नातवंडांचे सुख काही आमच्या वाट्याला कधी येईल असे वाटत नाही .

महेश : नातवंडांचे तर लांब मला तर मुलांचेही सुख मिळालेले नाही… मुले लहान असताना त्यांच्या सुखासाठी काबाड कष्ट करीत राहिलो, कधी स्वत: कोणतीच मौज मजा केली नाही की बायकोला करून दिली, मुल जरा मोठी झाली , शिकायला परदेशात गेली, तेथेच लग्न करून स्थायिक झाली. आम्ही नातवंडे पाहिली ती ही फक्त मोबाईलवर ! त्यात तुमची वहिणीही मला अकाली सोडून  गेली, आता जगतोय एकाकी जीवन जगायचे म्हणून  ! त्यातही तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून तरी जगणे जरा सोप्पे झालेले आहे नाहीतर जगणे अधीकच  अवघड झाले असते.

प्रणय  : मग ! तू मुलांकडे परदेशात का राहायला जात नाही ? तिथे निदान गोर्‍या गोर्‍या सुंदर स्त्रियातरी पाहता येतील.

महेश : मला या वयात नेत्रसुख नको ! माझी मुले तेथे  त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत, त्याच्यांकडे जाऊन त्यांच्या आयुष्याची बसलेले घडी आपण कशाला उगाच विस्कटायची !‍ तशीही माझी लुडबुड त्यांना त्यांच्या आयुष्यात नकोच  असेल…

विजय : हे बाकी महेश तू अगदी बरोबर बोललास ! तुझी मुले तर परदेशात आहेत पण माझा मुलगा तर ह्याच शहरात काही मिनिटाच्या अंतरावर राहतो तरीही त्याची आम्हाला त्याच्या घरी एक दिवसही राहायला बोलवायची इच्छा होत नाही. आम्ही स्वत: तेथे राहायला जाणे हा ही निर्लज्यपणा ठरेल. प्रणय ! मला पूर्वी वाटायचे की तू लग्न न करून आयुष्यात फार मोठी चूक केलीस पण आता मला तसे नाही वाटत कारण आता तुझ्या आणि आमच्या आयुष्यात फार फरक राहिलेले नाही. उलट तू तुझ्या आयुष्यात स्वत:ला खूप वेळ देऊ शकलास ज्यामुळे तू समाजासाठी भरीव कार्य करू शकलास, ज्यामुळे आज समजात तुझे नाव आहे, तुला मान- सन्मान आहे , तुझी स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख आहे, आम्ही काय केले आमचे आयुष्य आमच्या मुलांना ओळख मिळावी म्हणून खर्ची घातली पण त्याचा तरी काय उपयोग झाला ? आज ते आमची ओळख जगापासून लपविण्यासाठी धडपडत असतात.  त्यांना आई- वडिल म्हणून आमची ओळख जगाला करून द्यायला लाज वाटते. तू बघ ! तू आजही तुझ्या टोपण नावात तुझा वडीलांचे आदयाक्षर अभिमानाने मिरवतोस ! ते ही तुझ्या वडीलांचा तुझ्या विचारांना विरोध असतानाही.

महेश : विजय बरोबर बोलतोय ! आम्ही ही आमच्या आयुष्याला एक वेगळा अर्थ देऊ शकलो असतो जर आम्ही फक्त मुलांचे भविष्य घडविण्यात गुंतून पडलो नसतो… आम्ही त्यांचे भविष्य तर प्रकाशमय केले पण त्यांनी मात्र आमच्या भविष्यात फक्त आणि फक्त अंधारच पेरलेला आहे. पूर्वी मला वृद्धाश्रमात राहणार्‍या लोकांबद्दल वाईट वाटायचे पण आता नाही वाटत कारण मलाही कधी – कधी वाटते आपणही एखाद्या वृद्धाश्रमात राहिलो असतो तर बरे झाले असते निदान चार माणसे सोबतीला तरी असती, त्यांच्या सोबत खायला उटणारा दिवस सहज निघून गेला असता.

विजय : महेश … तू बरोबर बोलतो आहेस… माझ्यासोबत निदान तुमची वहिनी तरी आहे… वेळ घालवायला…

प्रणय : महेश … मग ! तू दुसरे लग्न का करीत नाहीस ?

महेश : केलेही असते पण मला माझ्या बायकोच्या आठवणी नाही पुसाव्याश्या वाटत… तू राहतोस ना एकटा तसा मी ही राहीण… जास्तच असह्य झाले तर एखादे वृद्धाश्रमच गाठेण….

प्रणय : माझी गोष्ट तुमच्यापेक्षा जरा वेगळी आहे,  हा एकटेपणा माझ्यावर कोणी लादलेला नाही,  मी तो स्विकारलेला आहे कारण मला तो आवडतो ! पण मला जेव्हा तो एकटेपणा नको असतो तेंव्हा मी माणसांच्या गराडयातही असतो. मला कोणी माझ्यापासून दूर गेल्याचे दु:ख नाही कारण कोणी जवळ असण्यात मी कधीच सुख मानत नाही. माझ्या कुटुंबात बायको-मुलं  सोडून इतर सर्व नाती आहेत त्या नात्यांना मी मिळेल तसा वेळ देत असतो.  वास्तवात आज तसे पाहता तुमच्याकडे तसे काही कमी नाही… स्वत:ची दोन दोन घरे आहेत एका घरात तुम्ही राहता , एक घर तुमचे भाड्याने दिलेले आहे ज्याच्या भाड्यातून तुमचा  उदर्निर्वाह उत्तम चालतो आहे … तुमची मुले- नातवंडे तुम्हाला वेळ देत नाहीत त्यामुळे तुमच्याकडे भरपूर वेळ आहे त्या वेळेकडे एक संधी म्हणून पहा.. ! तुम्ही वृद्धाश्रमात राहायला जाऊ नका ! पण त्या वृद्धाश्रमात जे लोक राहतात त्यांची दु:ख – सुखे तर जाणून घेऊ शकता त्याना फक्त आर्थिकच नाही तर मानसिक मदत तर करूच शकता.

महेश : प्रणय ! हे बाकी तू बरोबर बोललास ! मी या दिशेने नक्कीच विचार करेन…

विजय : मी वृद्धाश्रमाचे समर्थन नाही करू शकत ते कमी व्हावे अशीच माझी इच्छा आहे पण मी आणि तुमची वहीनी मिळून आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो.

प्रणय : आजची पिढी त्या विंचवाच्या पिल्लांसारखी आहे जी आपल्या अस्तित्वासाठी विंचविणीचे अस्तित्व मिटवून टाकते. त्यामुळे मागच्या पिढीला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी झगडावेच  लागेल.  त्या पिढीलाही दोष देण्यात काही अर्थ नाही… त्या पिढीने आपल्याला भविष्यात एकाकी जीवन जगायचे आहे हे सत्य अगोदरच स्विकारले आहे त्यामुळे ते हल्ली कोणत्याच नात्यात भावनीक रित्या गुंतत नाहीत, अगदी मुलांच्या नात्यातही त्यामुळेच समाजात जशी वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली आहे तशीच मुलांच्या वसतीगृहांचीही संख्या वाढत चाललेली आहे … तुमची मुले लग्न झाल्यावर तुमच्यापासून लांब झाली पण त्यांच्या मुलांना ते लहानपणापासूनच त्यांच्यापासून लांब ठेवता आहेत.  त्यामुळे भविष्यातील पिढीला आई- वडील असे एकत्र कधी वाट्याला येतील की नाही याबद्दल मला शंका वाटते, भविष्यातील हे चित्र मी अगोदरच पाहिल्यामुळे मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला.  लग्न ही वाईट गोष्ट आहे असे माझे अजिबात म्हणने नाही पण त्यात गुंतून पडणे मात्र नक्कीच वाईट आहे.

महेश : तू बरोबर बोलतो आहेस…. माणसाच्या आयुष्यात एकटेपणा हा कधी ना कधी तरी येणारच,  तो स्विकारण्याची मानसिक तयारी प्रत्येक माणसाची असायलाच हवी ! ती नसेल तर माणसाच्या गराड्यात राहण्याची सवय लावून घ्यावी लागेल जशी तू लावून घेतली आहेस… मी यापुढे माझा वेळ लोक हिताच्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतलेला आहे. माझा आनंद आता मलाच शोधावा लागणार आहे.

विजय : याबाबतीत आम्ही दोघेही तुझ्यासोबत राहू… आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ देऊ  !

प्रणय : आज मला तुम्ही माझे मित्र असल्याचा अभिमान वाटतो… ह्या जगात आपले असे काही नसते … आज जे आपले आहे ते काल दुसर्‍या कोणाचे तरी होते. उद्या दुसर्‍या कोणाचे तरी होणार आहे.. मग वाईट कसले वाटून घ्यायचे… एकाकीपणाचा कंटाळा आला तर लोकांच्या गराड्यात हरवून जायचे जसा मी हरवून गेलो आहे…

इतक्यात काही तरूणी त्यांच्या जवळ येतात आणि प्रणयला म्हणतात ,” प्रणय सर,  एक सेल्फी प्लीज ! प्रणय त्या तरूणींसोबत एक सेल्फी काढतो, दुसर्‍या सेल्फीत तो त्याच्या त्या मित्रांनाही घेतो… त्या तिघांना टाटा करत त्या तरुणी निघून गेल्यावर…

महेश : प्रणय ! कोण होत्या ह्या तरूणी ..?

प्रणय : मी लिहिलेल्या एका नाटकात ह्या तरुणींनी काम केले होते…

विजय : कोणते नाटक ?

प्रणय : ते एक सामाजिक नाटक होते… आजची बहुतांश पिढी अविचारी नाही पण स्वार्थी आहे… पण त्यातही अशी काही रत्ने आहेत जी समाज हिताचा विचार करतात… ह्या मुली अनेक वृद्धाश्रमांना वेळ मिळेल तेंव्हा भेट देतात आणि त्या वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत वेळ घालवितात,

महेश : अरे ! पण तू मागचे काही दिवस होतास कोठे ?

विजय : तुझी वहिणीही तेच विचारत होती…

प्रणय : मी माझ्या गावी गेलो होतो… तेथे आमची बरीच जमिन ओस पडलेली होती जिथे काही फलझाडे लावून त्यांची काळजी घेण्याचे नियोजन करून आलो,  त्यातील काही झाडे जरी मोठी झाली तर पुढच्या पिढीला त्या झाडांची फळे खाता येतील… त्या निमित्ताने तरी पुढची पिढी आपले नाव काढेल.

महेश : कोणती झाडे लावलीस ?

प्रणय : हीच आपली… आंबा, फणस, पेरु, सिताफळ वगैरे…

विजय : एकदा तुझ्या गावी यायला हवे ! कधीपासून तुझ्या गावी येतो येतो म्हणत होतो पण वेळच मिळाला नाही.

महेश : मी पण येणार आहे .

प्रणय : चालेल ! पुढच्याच आठवडयात आपण माझ्या गावी जाऊ या !  खूप मजा करू या ! मी तर म्हणेन आपण प्रत्येक दोन – तीन महिन्यांनी तिकडे जाऊया ! भरपूर झाडे लावू या !

विजय : चला आता गप्पा भरपूर झाल्या …. आपल्या नेहमीच्या टपरीवर जाऊन एक एक कप चहा मारूया !

महेश : चला ! हो ! पण आज रात्री तुम्ही माझ्याकडे जेवायला या ! मी छान काही तरी मागवतो हॉटेलातून…

प्रणय : कशाला ? त्यापेक्षा आपण सर्व मिळून कोणत्यातरी छानश्या हॉटेलातच जेवायला जाऊ ! हॉटेलातील जेवण घरात मागवून जेवणे आणि हॉटेलात जाऊन जेवणे यात खूपच अतंर असते.

महेश : तसे तर तसे ! अपण मित्र जेंव्हा पूर्वी हॉटेलात एकत्र जेवायला जायचो तेंव्हा किती मजा यायची !

विजय : हो ! खूप मजा यायची ! चला आता…. चहा प्यायची आहे ना ?

( ते तिघे एका टपरीवर चहा पित असतात… इतक्यात एका मुलगी फुले विकत त्यांच्या जवळ येते… )

प्रणय : त्या मुलीला, बाळ ! शाळेत जातेस ना ?

मुलगी : हो ! रोज… जाते !

प्रणय : बरं ! मला एक फुलांचा गुच्छ दे !

ते पाहून महेश आणि विजयही त्या मुलीकडून फुलांचे गुच्छ विकत घेऊन तिला पैसे देतात.

प्रणय : ही मुलगी खूप हुशार आहे… तिच्या लक्षात नसेल पण तिच्या शाळेच्या कार्यक्रमात मी तिला भाषण करताना ऐकले आहे. ही मुलगी तुम्हाला कधी ही फुले विकताना दिसली तर तिच्याकडून फुले विकत घेत जा… ती आपल्या देशाचे भविष्य आहे.

ते तिघे टपरीवर एक एक चहा मारतात आणि चहा वाल्याचे पैसे देऊन रस्त्याने जात असताना … समोरून एक पन्नाशीतील स्त्री डोळ्यांना गॉगल लावून येत असते. ती अचानक येऊन प्रणयला धडकते…

ती : सॉरी ! सॉरी !

प्रणय : ही नाटके बस्स झाली  ! मला माहीत आहे तू मला जाणून बुजून धडकलीस ! मी पाहिले होते तुला समोरुन येताना ! मी ओळख करून देतो हे माझे मित्र महेश आणि विजय ! आणि ही माझी मैत्रीण …

ती: नमस्ते ! मी कामिनी , प्रणयची मैत्रीण… अय्या फुले छान आहेत…

प्रणय : मग ! घे ! ही !

कामिनी : आज रात्री आपण कोठेतरी जेवायला जाऊ या का ?

प्रणय : आज नको ! आज रात्री मी ह्यांच्यासोबत जेवायला जाणार आहे…

महेश : त्यात काय ? त्यांनाही घेऊन जाऊया की आपल्या सोबत…

कामिनी : हो ! हो ! मला चालेल… थॅक यू ! भावोजी …

प्रणय : भावोजी काय ?

विजय :  माला चालेल भावोजी म्हटलेलं…

महेश : मलाही चालेल… कामिनी वहिणी…

प्रणय : काय भावोजी ? काय वाहिनी ?? तिच्याकडे लक्ष नका देऊ ! तिला मस्करी करायची सवय आहे.

महेश : पण आम्हाला ती वहीणी म्हणून चालेल.. .

विजय : प्रणय काहीही बोल पण तुमची जोडी छान दिसेल…

कामिनी : हो ! ना ! मागची कित्येक वर्षे तेच मी त्याला समजावून सांगते आहे पण त्याच्या लक्षातच येत नाही…

महेश : किती वर्षापासून तुम्ही ओळखता एकमेकांना ?

कामिनी : चार – पाच वर्षे झाली असतील…

महेश : मग आपली कधी भेट कशी झाली नाही ?

कामिनी : मी गावाला असते ? हल्लीच मुंबईला आली आहे…

विजय : प्रणय  ! म्हणजे गावाला झाडे लावायला ह्याच मदत करतात वाटते तुला… ?

प्रणय : अगदीच तसे नाही पण काही कामात मी तिची मदत घेतो गावाकडे !  ती तिकडच्या  शालेत शिक्षिका आहे ना !

महेश : शिक्षिका ! छान !

विजय : कामिनी ! तुमचा मोबाईल नं द्या ! म्हणजे आम्ही रात्री जेवायला जाताना तुम्हाला फोन करून रस्त्यात पिक- अप करू !

कामिनी : हो ! घ्याना ! ती मोबाईल नं. सांगते ते दोघे सेव्ह करून घेतात आणि तिला मिस कॉलही मारतात. चला भावोजी मी निघते ! बाय !  बाय विजय ! रात्री भेटूया !

विजय : बाय !

महेश : बाय

प्रणय : बाय ! बाय !

कामिनी निघून गेल्यावर …

महेश : ही परी तुला कोठे भेटली ?

प्रणय : काही नाही ! मी गावी एका कवी संमेलनाला गेलो होतो तिकडेच आमची भेट झाली.

विजय : तेंव्हाच झाडे लावा , झाडे वाढवा सुरू झाले वाटतं !

महेश : एक सांगू ! खरंच तुमच्या दोघांची जोडी छान दिसेल ! तीचे लग्न झालेलेच नाही की ती विधवा अथवा घटस्फोटीत आहे ?

प्रणय : फार पुर्वीच तिचा घटस्फोट झालेला आहे ! त्यानंतर तिने दुसर्‍या लग्नाचा कधीच विचार केला नाही , निदान आमची भेट होई पर्यत तरी !

विजय : इतक्या सुंदर आणि हुषार बायकोला घटस्फोट देणारा मुर्खच म्हणायला हवा !

महेश : हो ! पण घट्स्फोटाचे कारण काय होते ?

प्रणय : ती आई होऊ शकत नव्हती… तिचे तिच्या नवर्‍यावर खूप प्रेम होते पण ती मुलांना जन्माला घालू शकत नाही हे कळल्यावर त्यांच्यातील दुरावा वाढत गेला, घरात भांडणे वाढू लागली, शेवटी तिने नवर्‍याला मोकळे करण्याचा निर्णय घेतला, तो मोकळा झाला त्याने आनंदाने दुसरा संसार थाटला, त्याला मुलेही झाली, तो त्याच्या आयुष्यात सुखीही झाला पण कामिनीला मात्र तिच्या आयुष्यात आनंद शोधण्यासाठी सतत झगडावे लागले , आजही झगडावे लागत आहे…

महेश : प्रणय ! तू तिच्याशी लग्न करून तिच्या आयुष्यात नव्याने आनंद पेरू शकतोस…

विजय : हो ! महेश बरोबर बोलतोय !

प्रणय : कामिनी मला मैत्रीण म्हणून ! एक स्त्री म्हणून आवडते पण माझे तिच्यावर प्रेम नाही ! मी तिच्यावर प्रेम नाही करू शकत, माझ्या वाट्याचे प्रेम करून झालेले आहे हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे… आम्ही दोघे एकमेकांना आता लग्न केले तरी काही वर्षे फक्त सोबत करू शकतो ! त्यासाठी लग्न करण्याची आता मला गरज नाही वाटत.

महेश : या जगात तसा कोणाच्याच आयुष्याचा काही भरोसा नाही ! तुझे तिच्यावर प्रेम नसेल पण तिचे तर तुझ्यावर प्रेम आहे ना ? आपण कोणावर प्रेम करतो यापेक्षा आयुष्यात आपल्यावर कोण प्रेम करते ? हे खूप मह्त्वाचे असते… तुझ्या नशिबाने तुला या वयातही तुझ्यावर प्रेम करणारी कोणीतरी सापडली आहे हे तुझे भाग्यच म्हणावे लागेल.

विजय : कामिनी ! तुला तुझ्या आयुष्यात एक पत्नी म्हणून जशी स्त्री हवी होती अगदी तशीच आहे. ती तुझ्या आयुष्यात थोडी नाही खूपच उशिरा आली पण काही हरकत नाही ! देर आये दुरुस्त आये !

प्रणय : पण जग काय म्हणेल ?

विजय : प्रणय ! तू जगाचा कधीपासून विचार करायला लागलास ?

महेश : हल्ली जगाला दुसर्‍यांच्याच काय ? स्वत:च्या आयुष्याचाही विचार करायला वेळ नाही ‍!

प्रणय : तुम्ही दोघे बोलताय ते योग्यच आहे ! आनंद मिळवायला वयाचे बंधन नसते … माणूस कोणत्याही वयात त्याचा आनंद शोधू शकतो, नव्हे तो शोधण्याचा त्याला अधिकार आहे , तो अधिकार कोणीच नाकारू शकत नाही…आम्ही दोघे लग्न करून एकत्र आलो तर काही वर्षे का होईना एकमेकांच्या आयुष्यात आनंद पेरू शकतो…

महेश : नक्कीच !

विजय : आता उशिर करू नको ! आज रात्रीच आपण तुमचे लग्न ठरवून टाकू ! हे ऐकल्यावर तुझ्या वहिणीला खूप आनंद होईल ! ती नेहमी म्हणते,’’ मला एखादी लहान बहिण असती तर तिचे लग्न मी नक्कीच प्रणय भावोजींशी लावून दिले असते.

प्रणय : हो ! मला माहित आहे… विजया वहीनींचा माझ्यावर सख्ख्या भावासारखा जीव आहे…

( रात्री ते सर्व एका हॉटेलात जेवायला एकत्र आलेले असतात आणि कामिनीची वाट पाहात असतात  इतक्यात समोरून छान सुंदर नटलेली साडी नेसलेली कामिनी येताना दिसताच )

विजया : प्रणय भावोजी ! इतक्या सुंदर परीसोबत लग्न करण्याचा विचार करायला तुम्हाला पाच वर्षे लागली, अहो ! कोणीही हिच्या पाहता क्षणी प्रेमात पडावे इतकी सुंदर आहे ही !

कामिनी जवळ येताच प्रणय कामिनीची विजयाशी ओळख करून देताच विजया कामिनीला आपल्या मिठीत भरून घेते…

कामिनी  विजयच्या ! बाजुच्या खूर्चीवर बसल्यावर …

विजया : कामिनी ! खरोखरच ह्या साडीत तू फारच सुंदर दिसते आहेस अगदी तुझ्या नावाला शोभेल अशी…

कामिनी : विजया ताई ! ताई म्हटले तर चालेल ना ?

विजया : चालेल काय ? अगं धावेल ! मलाही एक लहान बहीण हवीच होती… तू माझी ती इच्छा पूर्ण केलीस ! आता मी ही तुझी एक इच्छा पुर्ण करणार आहे…

कामिनी : माझी  ! कोणती इच्छा ?

विजया : प्रणय भावोजींशी लग्न करण्याची !

कामिनी : खरंच ! प्रणय ? माझा माझ्या कानावर विश्वास बसत नाही.

प्रणय : हो  ! कामिनी !! तु जे ऐकते आहेस ते खरे आहे.

विजया : कामिनी पण तू तयार आहेस ना ? या लग्नासाठी ?

कामिनी : मी तर मागच्या चार वर्षापासून तयार आहे…

महेश : कामिनी ! तुला प्रणयशी लग्न का करायचे आहे ?

कामिनी : महेश भावोजी ! आम्ही दोघांनी या वयात लग्न केल्या न केल्यामुळे आम्हाला  फार काही फरक पडणार नाही ! पण आपल्या आयुष्यात एक खरा पुरुष आला याचा आनंद मात्र मला नक्कीच मिळेल, मी विजयच्या  विचारांनी प्रंचंड प्रभावित झाले आहे, माझ्यासारख्या खूप स्त्रिया त्याच्या प्रेमात पडल्या असतील याची मला खात्री आहे. पण त्याची पत्नी होण्याचे भाग्य जर मला लाभणार असेल तर ते भाग्य मला हवे आहे… अगदी या वयातही ! आमच्या लग्नानंतरही तो मला फार वेळ देणार नाही याची मला खात्री आहे पण तो माझ्यावर प्रेम करण्यात कोठे कमी पडेल असे मला वाटत नाही.

विजय : व्वा ! कदाचित तुमची जोडी स्वर्गातूनच बनून आलेली होती… पण देव कदाचित आपण अशी एखादी जोडी बनविलेली आहे हे विसरून गेला असावा…

विजया : मलाही तसेच वाटते…

प्रणय : कामिनी मी काही तुझ्यासोबत लग्न करून तुझ्यावर उपकार वगैरे करीत नाही ! तुला भेटल्यानंतरच माझ्या आयुष्यातील माझ्या पत्नीची जागा घेणारी स्त्री कशी असावी हा माझा शोध संपलेला होता… पण कदाचित कोणाचा नवरा होण्याची हिंमत माझ्याच्याने होत नव्हती कदाचित…

महेश : चला ! तर मग आता तुमच्या दोघांचे लग्न ठरले हे आपण जाहीर करू या ! ते तुम्हाला करायचे तसे करा ! पण आम्हाला लग्नाच्या पार्टीला नक्की बोलवा ! पण आता तुमच्या दोघांचे लग्न ठरल्याबद्दल माझ्या कडून दिल्या गेलेल्या या पार्टीला सुरुवात करुया !

विजय : वेटर ! मेन्यू कार्ड लाना !

( त्यांची ऑर्डर आल्यावर ते तिघे जेवत जेवता )

विजया : कामिनी ! तुझ्या भुतकाळाबद्दल प्रणय भावोजींनी मला सर्व काही सांगितले … तू आई होऊ शकत नव्हतीस यात तुझा काहीही दोष नव्हता, उलट निसर्गाकडून तो तुझ्यावर झालेला अन्याय होता… तुझ्या नवर्‍याच्या जागी जर प्रणय भावोजी असते तर मी खात्रीने सांगते तुझ्यावर हा अन्याय झालाच नसता.

कामिनी : हो ! मलाही त्याची खात्री आहे…

विजया : आता आमचेच बघ ! आम्हाला मुलं आहेत पण ती असून नसल्यासारखीच आहेत… शेवटी आता आम्ही दोघेच एकमेकांसाठी आहोत… आता महेश भावोजी तर मुलं असूनही एकटेच आहेत… प्रत्येकाला हे जग कधीना कधी सोडावेच लागते पण ते सोडताना आपल्या सोबत चांगल्या आठवणी असाव्यात असे मला वाटते… भावोजी आणि तू ! तुम्ही तुमच्या आयुष्यात आनंदीच आहात पण तुम्ही लग्न केल्यामुळे तो आनंद द्विगुणीत होईल… तुमच्या मनात कोठेतरी असलेली अपुर्णत्वाची बोच कायमची नाहीशी होईल.

कामिनी : हो ! ताई ! तू अगदी बरोबर बोललीस ! जगण्यातून मिळणारा आनंद मग तो कोणत्याही वयात का मिळेना , तो प्रत्येकाने घ्यायलाच हवा ! माणसाचा जन्म आपल्याला एकदाच मिळतो … हेच गृहीत धरून आपण जगायला हवे !

प्रणय : कामिनी ! एका पुरुषाकडून स्त्रीवर होणारा कोणताच अन्याय माझ्याकडून तुझ्यावर कधीच  होणार नाही ! या एका गोष्टीची मी तुला झोपेतही हमी देऊ शकतो…

कामिनी : मला त्याची खात्री आहे…

विजया : पुढच्या आठवड्यात तसेही आपण तुमच्या गावी जाणारच होतो… तर तेंव्हाच तुमचे लग्नही उरकून घेऊ या !

महेश : हे उत्तम होईल !

विजय : मग ! तुम्ही जा हनिमुनला ! आम्ही तेथे झाडे लावत बसू !

त्यावर सारेच मनमुराद हसतात…

©लेखक : निलेश दत्ताराम  बामणे

Avatar
About निलेश बामणे 419 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..