कणकवली तालुक्यात तळेरे नजीक कासार्डे तिठा नांवाचं एक ठिकाण आहे. अगदी मुंबई-गोवा हायवेवरच. तिठा म्हणजे तीन रस्ते एकत्र मिळण्याचं ठिकण. कासार्ड्यात मुंबईकडे जाणारा, गोव्याकडे जाणारा असे दोन आणि तिसरा रस्ता या दोन रस्त्यांना टांग मारून तिसऱ्याच दिशेला विजयदुर्गाकडे जातो.
या रस्त्यावर तिठ्यापासून पुढे काही अंतरावर गवाणे नांवाचं गांव आहे. देवगड तालुक्याचं हे शेवटचं गांव. अब्दुलमाजिद मुल्ला सर तिकडचे रहिवासी. तसा त्यांचा जन्म कर्नाटकातल्या निपाणीचा आणि पुढचं शिक्षण वैगेरे कोल्हापुरातल्या खानापुरातलं. गारगोटीतल्या मौनी विद्यापिठात सरांची घडवणूक झाली. सद्गुरू मौनी महाराजांच्या पावन भुमीत घडल्याचं सर अभिमानानं सांगतात. पेशाने शिक्षक. सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यातील गवाणे गांवात त्यांची नेमणूक झाली आणि सर इकडचेच झाले. इतके, की ते अंतरबाह्य कोकणीच वाटतात. त्यांच्या बोलण्यात डोकावणारा थोडासा कानडी/बेळगावी हेल सोडला, तर सर मालवणीच.
सन १९८९ मधे सरांची नेमणूक इथल्या शाळेत झाली. तिथपासून ते २००६ पर्यंत सरांनी शिक्षक म्हणून आणि त्यानंतर आतापर्यंत सर मुख्याध्यापक म्हणून शाळेत अखंड कार्यरत आहेत. त्यांच कार्य शाळेच्या वेळेपुरतं मर्यादीत नसून शाळेनंतरही सरांचे विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. सुरुवातीला तर सरांकडे जागा नव्हती म्हणून कुणाच्या तरी घरी सर रात्रीच्या शिकवण्या घ्यायचे, ते ही कोणत्याही विद्यार्थ्यांकडून कोणताही मोबदला न घेता. गाववाल्यांना सरांची तळमळ येवढी भावली, की जे मुंबईला आहेत व गांवातलं घर बंद आहे अशा लोकांनी गावातल्या घराच्या चाव्या विनाअट सरांच्या सुपूर्द केल्या आणि त्यात विद्यार्थ्यांना शिकवण्याची विनंती केली. कोणतही भाडं सरांकडून घेतलं नाही की विजबिलही. एखाद्याच्या कार्यामागची सच्ची तळमळ लोकांपर्यंत बरोबर पोचते आणि मग लोकांचा हातभार त्या कार्याला न मागता आपसूक लागत जातो..जनतेला जनार्दन का म्हणतात, ते अशावेळी समजतं..
महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमा भागातल्या मुलखात जन्मले-वाढलेले सर आता जवळपास गवाण्यातच स्थायिक झालेत. ते निवृत्तीनंतर त्यांच्या मूळ गांवी जातील असं काही मला वाटत नाही. त्याहीपेक्षा गाववाले त्यांना सोडणार नाहीत अशीच शक्यता जास्त वाटते. सरांचं आता कोकणचं मुख्य पिक असणाऱ्या भातासारखं झालं आहे. तांदळाचं बी पेरलं एकीकडी जातं आणि मग त्याची लावणी दुसरीकडे केली जाते व नंतरच ते खरे बहरते. सरांचं तसंच काहीसं झालं. फरक एकच कोल्हापुरातल्या साखरेची गोडीही या भातात उतरली आहे..
सरांना गांवातल्या व पंचक्रोशीतली एक पिढी घडवली. सरांच्या तालमीत घडलेले विद्यार्थी आज गावातला सरपंच ते परदेशातले बडे अधिकारी अशा पातळ्यांवर काम करत आहेत. दुसऱ्या पिढीवर सरांचे शिल्पकाराच्या नजाकतीने छिन्नीचे घाव पडत असून त्यातूनही सुरेख, शहाणं विद्यार्थी शिल्प जन्माला येईल यात मला शंका नाही.
सर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषेदेच्या कामात आहे. मुख्याध्यापक संघाचेही पदाधिकारी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळ स्थापनेतही सरांचा मोलाचा वाटा आहे, परंतू माझ्यासाठी ते नंतर. मला ते प्रथम शिक्षक आहेत हेच मोठं वाटतं.
शिक्षक आणि कलावंत ही दोनच माणसं समाजाच्या सर्वेच्च आदराचा विषय असाचला हवीत असं मला वाटतं. कलावंत म्हणजे लेखक-कवी, चित्रकार, शिल्पकार, नाट्यो-चित्रपटकर्मी इ. शिक्षक समाज घडवतो व तो समाज, समाज म्हणून वाटचाल करताना गैरमार्गाने जात असेल, तर त्याला आरसा दाखवण्यातं काम कलावंत करतो. पण आज आपल्या समाजात नेमके हे दोन घटक अगदी कुचेष्टेचे झालेत. आपल्या समाजात आज विचार आणि आचार स्तरावर जो गोंधळ दिसतो, त्यामागे महत्वाचं कारण हेच आहे. आता ते असे का झालेत ह्याची कारणं अनेक आहेत, त्यापैकी महत्वाचं कारण समाजात त्यांना मान नाही हे आहे..सरांवरती दोन शब्द लिहीण्याचं कारण की अशा परिस्थितीतही सर आणि सरांसारखे काहीजण समाज घडवण्याचं मिशन निष्ठेने चालवत आहेत..आज सर्वच बाबतीत ताळतंत्र सोडल्यासारखा वागू पाहाणारा आपला समाज जो काही थोडा बहुत जमिनीवर पाय, नव्हे, पायची बोटंच फक्त टिकवून कसाबसा उभा आहे, त्याचं श्रेय अब्दुल माजिद सर आणि त्यांच्यासारख्या काही शिक्षकांना आहे..ही संख्या कमी आहे, पण आहे..! ही संख्या वाढेल तेंव्हाच आपला समाज जमिनीवर पाय घट्ट रोवून उभा राहील..
मुल्ला सरांचा आणि माझा परिचय फेसबुकच्या माध्यमातून झाला. नंतर सरांची दोनेकवेळा भेट झाली तेंव्हा त्याच्याशी झालेल्या गप्पांतून ज्या गोष्टी मला समजल्या, त्याच वर मांडल्या आहेत. त्यातील तपशीलात थोडाफार फरक असू शकतो. डाॅ. अशोकराव मोडकांचा सरांच्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. काल सर संध्याकळच्या समयी, भर थंडीत मोटरसायकलवरून जवळपास ८० किमि अंतर, ते ही मुंबई-गोवा हायवेवरून कापून त्यांचं श्रद्धास्थान असलेल्या डाॅ. अशोकराव मोडकांना भेटण्यासाठी सावंतवाडीत आले होते, यावरून त्यांचं आणि अशोकरावांचं नातं समजतं..डाॅ. अशोकराव मोडक हे काय कोटीचं व्यक्तीमत्व आहे ते समजण्यासाठी इंटरनेटचा आधार घ्यावा ही विनंती. या प्रसंगी मी ही तिकडे हजर होतो म्हणून हे लिहावसं वाटलं. ही सरांची स्तुती नव्हे, ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावं’ असं म्हणून प्रेमासोबत जगाला ज्ञानही अर्पावं हाच ‘धर्म’ म्हणून कार्य करणाऱ्या सरांना आणि सरांसारख्या इतर काही शिंक्षकांना मी एक विद्यार्थी (त्यांचा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलो तरी अप्रत्यक्ष आहे.) या नात्याने अर्पण केलेली गुरुदक्षिणा..
–नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply