जीवन गौरव पुरस्कार घेण्यासाठी दादासाहेब रंगमंचावर आले आणि टाळ्यांचा कडकडाट करीत संपूर्ण सभागृह, त्यांना मानवंदना देण्यासाठी उभं राहिलं. त्यांनी हात जोडले. टाळ्यांचा कडकडाट चालूच होता. दादासाहेबांनी सर्वांना थांबवण्याचा यत्न केला, पण उत्स्फूर्तता असल्यानं कुणीच थांबत नव्हतं.
दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं.
गर्दी इतकी झाली होती की आयोजकांना थिएटर बाहेर, आवारात स्क्रीनची सोय करावी लागली.
– टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. निवेदकाच्या वाणीला बहर आला होता आणि अनपेक्षितपणे दादासाहेब विंगेकडे वळले. त्याच क्षणी एकदम शांतता पसरली.काय झालं कुणाला कळेना. सगळं सभागृह अवाक झालं. सगळ्यांचं लक्ष विंगेकडे गेलं. तिथे रामुदा होता. काय होतंय हे कळायच्या आत दादासाहेब खाली वाकले आणि त्यांनी रामुदाच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. म्हातारपणाकडे झुकलेला रामुदा लाजला. खजील झाला. ओशाळला आणि त्याच्या डोळ्यातून आसवं ओघळली.
दुसऱ्याच क्षणी दादासाहेब रंगमंचावर आले आणि त्यांनी निवेदकाकडून माईक हाती घेतला. ” तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी विंगेत का गेलो. कारण मला रामुदाला नमस्कार करायचा होता. त्याचं वय मला माहीत नाही. मी विचारलंच नाही कधी. माझ्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत, प्रत्येक क्षणी तो माझ्या बरोबर होता म्हणून मी मोठा झालो. नामवंत वगैरे झालो. नाटकवाल्या सगळ्या ग्रुप्सना, तो काय आहे हे माहीत आहे. तो मेकअपमन आहे. तो लाईट्स सांभाळतो. तो नेपथ्य लावायला मदत करतो. तो कपडेपट सांभाळतो. तो इस्त्री करतो. गरज असेल तर तोंडाला रंग लावून वेळ सांभाळतो. प्रयोग सुरू होण्याआधीच्या धावपळीत त्याचे पाय थकत नाहीत, दुखत नाहीत. नाटक संपल्यानंतर सगळी आवराआवर झाली, सामान ट्रकमध्ये भरलं आणि सगळे जेवले की मग हा कसातरी घाईगडबडीत दोन घास खाऊन गाडीत येऊन बसतो. जेवण संपलं असलं तर याची तक्रार नसते, तो नुसत्या वडापावावर राहतो. आम्हाला झोप मिळावी, प्रवासात त्रास होऊ नये म्हणून रात्रभर हा गाडीत जागा असतो. रंगमंचावर आमच्या पायाला खिळे टोचू नयेत म्हणून हा स्वतः सगळा रंगमंच झाडून काढतो. विंगेत उभा राहून प्रत्येक प्रयोग पाहतो आणि कोण कुठे चुकलं ते स्पष्टपणे सांगतो. आम्हा सगळ्यांचं पाठांतर करवून घेण्याचा कठीण काम हा लीलया करतो. माझ्या स्वगताच्या वेळी मी जेव्हा विंगेकडे तोंड करून अभिनय करीत असतो, तेव्हा रामुदा आतून इतका चांगला प्रतिसाद देतो की पूछो मत. त्यामुळं तुम्हाला माझा अभिनय दिसतो पण विंगेतून माझ्याइतका किंबहुना माझ्याहून दर्जेदार अभिनय करणारा रामुदा दिसत नाही. त्याच्या तुटपुंज्या पगारात त्याचं कसं भागतं हे आम्ही कधी त्याला विचारलंच नाही. त्याच्या मुलीच्या लग्नात, त्याचं बापाचं काळीज आम्ही अनेकांनी पाहिलं आहे. माझ्या दुःखाच्या क्षणी मी अनेकदा त्याचे खांदे भिजवले आहेत. कुणी सांगितलं तर तो तिकिटाच्या खिडकीतही बसतो आणि गरज लागली तर बॅटरी हाती घेऊन डोअर किपरसुद्धा बनतो. ग्रामीण भागातल्या दौऱ्याच्या वेळी नाटकाचे समान वाहण्यासाठी हमाल होताना त्याला कमीपणा वाटत नाही आणि स्त्री कलाकारांना कुणी त्रास दिला तर तो कुणाची खैर करीत नाही.आमची घरं उभी करताना त्याला चांगला निवारा आम्ही बांधून देऊ शकलो नाही ही आमची खंत आहे. आमची तब्येत सांभाळण्यासाठी त्याचं आरोग्य त्यानं अनेकदा पणाला लावलं आहे. नावलौकिक असल्यानं आम्हाला कर्ज मिळणं जेवढं सोयीचं झालं तेवढं, त्याला कर्जासाठी जामीन राहण्यात आम्ही कमी पडलो, ही खंत आहे. आमची मुलंबाळं शिकून गडगंज कमवायला लागली पण त्याच्या मुलांना संसार सांभाळण्यासाठी शिक्षण सोडून लहान वयात मोलमजुरी करावी लागली, याचे क्लेश सतत मनाला बोचत आहेत. अशावेळी आम्ही प्रतिष्ठा नामक भुलभुलैयात अडकल्याने आमच्या पायाखालची जमीन आम्हाला कधी दिसलीच नाही. तिची सुखदुःख कळलीच नाहीत. आम्ही स्वतःला आभाळाएवढे उंच समजत असताना आम्हाला पेलणाऱ्या या उत्तुंग खांबांना जाणून घेणं कधी गरजेचं वाटलंच नाही. म्हणून ज्याच्यामुळं आज मी मोठा झालो त्याला आजचा हा जीवन गौरव, ही शाल, तुम्ही दिलेले पाच लाख रुपये आणि हे स्मृतिचिन्ह मी रामुदाला अर्पण करतो. शिवाय माझे स्वतःचे पाच लाख त्याच्या पायावर अर्पण करतो. रामुदाच्या कर्तृत्वापुढं हे नगण्य आहे, हे मला कळतंय पण हे फूल नाही, फुलांची पाकळी आहे, हे नम्रपणे कबुल करतो .”
दादासाहेबांनी रामुदाला विंगेतून पुढं आणलं आणि पुन्हा एकदा त्याच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला.
आभाळाच्या खांबाचा तो सत्कार बघून सगळं सभागृह पुन्हा एकदा रामुदाला मानवंदना देण्यासाठी उभं राहिलं आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला …
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६
ही कथा काल्पनिक असली तरी आशय खरा आहे .
Leave a Reply