महिला अत्याचाराच्या घटनांनी ती पेटून उठायची. पण करणार काय? त्याविषयी महिला बोलायच्या नाहीत. मग तिच्या डोक्यात विचार आला, या महिलांना बोलते करायचे. त्यांना हक्काची आणि त्यांच्यासाठी असलेल्या कायद्यांची जाणीव करून द्यायची. याच उद्देशाने तिने वयाच्या २१व्या वर्षी “बिईंग लॉजिकल‘ संस्थेची स्थापना केली अन् महिलांना कायद्याची ओळख करून देण्याचा विडा उचलला. अभिधा निफाडे हिच्या याच प्रयत्नांमुळे तिला संयुक्त राष्ट्रसंघाच्या “वर्ल्ड अॅट स्कूल‘ उपक्रमाची जागतिक राजदूत होण्याची संधी मिळाली आहे.
आयएलएस विधी महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अभिधाने जागतिक राजदूत बनण्याची कामगिरी करून दाखवली आहे. तिच्या या यशाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
मूळची नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरची असलेल्या अभिधाने चार वर्षांपूर्वी सर परशुरामभाऊ महाविद्यालयात असताना “रोशनी‘ संस्थेमार्फत सामाजिक कार्यात पाऊल ठेवले. मासिक पाळी, महिला बचत गट, बाललैंगिक शोषण, शैक्षणिक उपक्रम आणि कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीवर तिने काम सुरू केले.
सलग दोन वर्षे तिने संस्थेमार्फत वस्ती पातळीवर काम केले. त्यानंतर महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महिलांना कायद्याविषयी माहिती नसल्याची बाब तिच्या लक्षात आली आणि तिने याच ध्येयासाठी काम करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने या संस्थेची स्थापना केली. सध्या संस्थेमार्फत ती कायदेविषयक कार्यशाळा, मोफत कायदा सल्ला आणि मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम करते.
अभिधा म्हणाली, ‘गेली चार वर्षे मी सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. माझे आई-वडील दोघेही प्राध्यापक आहेत. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हे काम करत आहे. कौटुंबिक हिंसाचार, ऍट्रॉसिटी कायदा, कामगार कायदे आणि राइट टू डिसऍबिलिटी या कायद्यांविषयी मी जनजागृती करत आहे. आम्ही दहा तरुण मिळून लोकांना मार्गदर्शन करतो. लोकांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. संस्थेद्वारे कायदेविषयक आणखीन उपक्रम राबविण्याचा मानस आहे. जागतिक स्तरावर मी नगरपालिका शाळांमधील शिक्षणपद्धती अधिकाधिक विद्यार्थिभिमुख करणे आणि समाजात कायद्याविषयी जाणीव निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. वस्तीस्तरावरील महिलांना कायदेविषयक माहिती देण्याचा उपक्रम सध्या सुरू आहे. भारतातून माझी राजदूत म्हणून निवड झाल्याचा आनंद आहे.
Leave a Reply