हृदयनाथ आणि लता मंगेशकरांबद्दल लिहिल्यावर आशा भोसलेंवर लिहिणे आलेच. त्याही पूर्वाश्रमीच्या मंगेशकर – त्यामुळे अभिजात या शिक्क्यावर त्यांचाही तितकाच हक्क !
धर्मेंद्र एका ठिकाणी म्हणाला होता- ‘ आयुष्य हा एक सुंदर संघर्ष आहे. ” संघर्ष शब्दाच्या आणि त्याच्या अर्थाच्या प्रेमात पडलेल्या आशाबाईंच्या जीवनाकडे बघूनच कदाचित त्याने हे उद्गार काढले असावेत.
पुन्हा एकदा स्थळ -पुणे ! न्यू इंग्लिश स्कूल ,रमणबागेचे मैदान ! आशाताईंच्या कार्यक्रमाला नेहेमीच्या भक्तिभावाने सहकुटुंब गेलो होतो. त्यांच्या नावलौकिकाला शोभेशी गर्दी ! अचानक कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाऊस आला आणि रसभंग झाला. पटकन पुढे येत त्या म्हणाल्या – ” मी तशीही उद्या पुण्यात आहे. आपण उद्या कार्यक्रम करु या. हीच तिकिटे घेऊन उद्या याच वेळी या.”
सगळे घरी परतले. दुसऱ्यादिवशी रसिक पुन्हा जमले . थोडा कार्यक्रम पुढे सरकतो तोच पावसाने झोडपायला सुरुवात केली. आम्ही पटापट खुर्च्या डोक्यावर घेऊन पावसाच्या माऱ्यात उभे राहिलो. आशाताई म्हणाल्या -“मला उद्या मुंबईला जायचं आहे. काय करू या? तुमची तयारी असेल तर मी पावसात भिजत गायला तयार आहे.” थोड्याशा क्रूरपणे आम्ही होकारलो. त्यात स्वार्थही होताच. ही संधी हातची घालवायची नव्हती. त्यांच्यासाठी स्टेजवर भिजत गाणं ही खरेतर शिक्षा होती. नाना पाटेकर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी आशाबाईंच्या डोक्यावर छ्त्री धरली. स्वतः अर्ध ओले उभे राहिले -पाइकासारखे ! आणि मग आकाशाला लाजवतील अशा सरी स्टेजवरून बरसू लागल्या. मधूनच नाना पाटेकरांची (जन्मजात ) मिश्किलपणे बोलती बंद करणे सुरू झाले. आशाबाईंच्या सुरांनी साक्षात आभाळाशी संघर्ष सुरू केला. पाऊस मंदावला -अधूनमधून थांबू लागला , पण हा स्वर बेफामपणे बरसात राहिला .आम्ही भाग्यवंत ! दोन्ही सरींमध्ये डुंबत राहिलो. ” बघा जिंकले की नाही (याही संघर्षात -नेहेमीसारखी )” असं विजयी स्मित चेहेऱ्यावर खेळवत बाईंनी स्टेज सोडले.
आम्ही नमस्कार करायचे विसरून गेलो. स्वतःच्या व्यवसायाशी ,दिलेल्या शब्दाशी बांधिलकी आणि नेहेमी १०० टक्क्यांहून अधिक देण्याची ” मंगेशकरी ” प्रवृत्ती ! संघर्षके आगे हमेशा जीत और जीतही होती हैं ! न्यू इंग्लिश स्कूलच्या अंगणातील हा स्वरांचा “बोलका “पारिजात घेउन आम्ही घरी परतलो. आजही तो तितक्याच सामर्थ्याने आमच्या मनात बहरला आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply