१९७८-७९ चा काळ ! “महासागर ” या नाटकाचा प्रयोग सांगलीच्या दिनानाथ मंगेशकर नाटयगृहात होता. विक्रम ,नाना ,नीना कुळकर्णी अशी तगडी स्टारकास्ट आणि जयवंत दळवींचे लेखन ! मी आणि माझा नाट्यवेडा मित्र -जयंत असनारे नेहेमीप्रमाणे नाटकाला गेलो. प्रयोगाआधी सेट ,नेपथ्य अभ्यासणे आणि मध्यंतरात नटमंडळींच्या सह्या घेणे हा आमचा परिपाठ !
त्याही दिवशी गेलो विक्रम गोखलेंकडे !
” मी अशी सहजासहजी फुकट सही देत नाही. “ते गंभीरपणे म्हणाले. “कोकणात मी माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक शाळा बांधतोय. तुम्ही त्या शाळेसाठी काही वर्गणी दिलीत तर मी पावती देईन आणि सहीही ! ”
आम्ही मुकाटपणे दोन -दोन रू .काढले. एक लफ्फेदार सही मिळाली . वडील सीमेवरील सैनिकांसाठी फंड पाठवतात ,त्यात स्वकमाईचे पैसे घालतात आणि मुलगा मातृऋण अल्पसे फेडण्यासाठी शाळा सुरु करतो.
“वीर जारा ” मधील रानी मुखर्जी सारखे म्हणावेसे वाटते – ” ही कोठल्या दुनियेतील माणसे आहेत?”
अभिजात अभिनयासाठी प्रसिद्ध असलेले हे बाप-लेक व्यक्तीगत जीवनातही तितक्याच उंचीवर आहेत.
“बॅरीस्टर ” (पुन्हा जयवंत दळवी ) नाटकात दुर्वास मुनींच्या स्वभाव राशीचे चंद्रकांतजी गोखले पोटच्या पोराशी अभिनयातील नक्षत्रांच्या राशी रंगमंचावर उधळायचे आणि आपण “बाप “असल्याचे सिद्ध करायचे.
विक्रमजींनी दिलेली पावती कालौघात हरवली पण त्यांची सही आजवर जपली आहे.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply