अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांचा जन्म दि. २ मार्च रोजी भुसावळ येथे झाला.
मधुराणी या माहेरच्या मधुराणी श्रीराम गोखले. अभिनय, लेखन, सूत्रसंचालन या क्षेत्रात वेगळ्या पद्धतीचं काम करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मधुराणी गोखले प्रभुलकर. मधुराणी गोखले प्रभुलकर यांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झालं. एस.पी. महाविद्यालयात असताना त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळाला आणि ‘इंद्रधनुष्य’द्वारे त्यांना कला क्षेत्रात पदार्पण करण्याची संधी मिळाली. मॉडेलिंग क्षेत्रातही चांगलं नाव कमावणाऱ्या मधुराणी यांनी अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्या गेला दशकभराहून अधिक काळ वेगवेगळं काम करीत आहे. ‘मणी मंगळसूत्र’, ‘सुंदर माझं घर’, ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. यापैकी ‘सुंदर माझं घर’ या चित्रपटाला तिनं संगीतदेखील दिलं होतं. आपले पती दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर आणि मधुराणी प्रभुलकर यांनी मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ची स्थापना पुण्यात केली. अनेक उत्तम कलाकार मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’ च्या माध्यमातून प्रकाशझोतात आले. त्यांना भक्कम पाठिंबा देण्याचं काम दिग्दर्शक प्रमोद प्रभुलकर व अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांनी नेटाने केले. या संस्थेद्वारे कला क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शाखांचं शिक्षण दिलं जातं. ‘युथट्यूब’ या त्यांच्या चित्रपटात त्यांच्याच ‘मिरॅकल्स अक्टिंग अकॅडमी’तील ३०० विद्यार्थी या सिनेमामध्ये झळकले. एकाच अक्टिंग अकॅडमीच्या ३०० विद्यार्थ्यांनी एकाच सिनेमात काम करण्याची ही पहिलीच वेळ असून मनोरंजन सृष्टीच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले असावे. मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी मराठी कवितांवर केलेली वेब सिरीजही लोकप्रिय ठरली. स्टार प्रवाहवर सुरु असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची व्यक्तिरेखा मधुराणी गोखले प्रभुलकर साकारली होती.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply