घर्षण किती वेळ करावे: सर्वांग घर्षणाची सुरुवात कराल तेव्हा पहिले आठ दिवस प्रत्येक अवयवाला दररोज पाच वेळा घर्षण करावे. नंतरच्या आठवड्यात प्रत्येक अवयवाला दररोज दहा वेळा घर्षण करावे. नंतर दर आठवड्यात घर्षणाची संख्या पाचाने वाढवावी. शेवटी पंचवीसपर्यंत आणावी. नंतर प्रत्येक अवयवाला दररोज पंचवीस वेळा घर्षण करावे. (घर्षण संपले, की सुरुवातीला एक मिनिट तरी विश्रांती घ्यावी.) घर्षण स्वतःच्या हितासाठी करावयाचे आहे. तेव्हा तारतम्याने आपली शक्ती ओळखून घर्षण संख्या ठरवावी. त्रास होत असूनसुद्धा या लेखात सांगितले म्हणून अट्टहासाने घर्षण संख्या वाढवू नये.. सर्वांग घर्षणास पंधरा ते वीस मिनिटे लागतील. घर्षण चिकित्सा वरदान असली तर तिचा अति उपयोग करू नये. उदा.
शिरस्थानच्या इंद्रियांवर अति घर्षण करू नये. अति घर्षणाने चक्कर येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, यासारखी लक्षणे दिसू लागण्याचा संभव असतो. यासाठी इंद्रियांना, तसेच मन, बुद्धी, भावना यांना किंचितही धक्का लागणार नाही अशा प्रकारे सावकाश, सावधानतेने घर्षण करावे. एखाद्या अवयवावर वस्त्राने घर्षण करताना ते वस्त्र हातांनी मागे-पुढे करावयाचे, की त्या अवयवाची हालचाल करावयाची हे त्या त्या अवयवाच्या स्थितीवर अवलंबून राहील. उदा. मानेचा मणका दुखत असेल तर त्या वेळी मान न हालवता हाताचीच हालचाल करणे योग्य ठरेल. विशेष काळजी कोणती घ्यावी? डोळ्यांवर घर्षण करताना फक्त तळहात फिरवून अगदी हलक्या हाताने दाब न देता घर्षण करावे. डोळे आलेले असताना किंवा डोळ्यांचे विकार असताना घर्षण करू नये व डोळ्यांच्या मांसल भागावरही दाब पडू देऊ नये. दोन भुवयांमधील भाग आणि हनुवटी ही मर्मस्थाने असल्यामुळे तेथील घर्षण विशेष सावधानतेने करावे. तेथे एकाच वेळी पाच वेळांपेक्षा अधिक घर्षण करू नये. ताप आलेला असताना घर्षण करू नये. स्त्रियांनी स्तनांवर घर्षण करू नये. गरोदर स्त्रियांनी पोटावर घर्षण करू नये. मासिक पाळीच्या दिवसांत स्त्रियांनी घर्षण- व्यायाम करू नये.
पुरुषांनी जांघेत घर्षण करताना जननेंद्रियाचे उत्थापन होणार नाही अशा पद्धतीने घर्षण करावे. आंत्रपुच्छ (Appendix) वा इतर विद्रधी (गळू) (Abscess) हे पक्वावस्थेत असल्यास (पिकलेल्या अवस्थेत) घर्षण करू नये. अस्थिभंग असल्यास त्या जागी घर्षण करू नये.
वैद्य शुभदा पटवर्धन
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply