अचानक हा एकमेव चित्रपट की जेथे कवी /शायर /गीतकार गुलजारला काही वाव नव्हता. संपूर्ण चित्रपटात कोठेही काव्य /कविता नाही म्हणून गुलजारने चित्रपटच कवितेत रुपांतरीत केला – एक अशी कविता जिच्या वर्णनासाठी आपण कायम मेहेंदी हसन साहेबांची गज़ल गुणगुणू –
रंजीशही सही ,दिलंही दुखानेके लिए आ !
आ फिरसे मुझे ,छोड के जाने के लिए आ !!
दरवेळी हा चित्रपट कोठेतरी खोलवर रुतून जातो तरीही त्याला वारंवार आवताण द्यावंसं वाटतं. दोन मूलभूत प्रश्न हा चित्रपट विचारतो-
१) शत्रुसैनिकांना जीवे मारले तर ती हत्या नसते ,उलट गौरव होतो. “वीरचक्र ” प्रदान केले जाते. मग दोन व्यक्तींना जीवानिशी मारले तर सजा का? फक्त नकाशावरील सरहद आणि रेषा ठरविते का आपल्या कृत्याचे मूल्यमापन ?
२) दरवेळी तुरुंगातून निसटलेल्या जखमी कैद्यांना डॉक्टरने जीवापाड मेहेनत घेऊन वाचवायचे आणि नंतर कायद्याच्या हवाली करून त्या कैद्याला सजा -ए -मौत ! मग त्याला वाचवायचे तरी का?
थोडासा तीव्र आणि बंदिस्त कथानकाचा हा चित्रपट आहे. मधून -मधून काही कोवळे क्षण जरूर पेरले आहेत पण त्यांचे प्रयोजन थोडी दाहकता कमी करणे एवढेच !
रणांगणावर शौर्य गाजवून ,”वीरचक्र “कमावून विनोद खन्ना ” अचानक ” घरी परततो त्यावेळी त्याची प्रिय पत्नी त्याच्या एका प्रिय मित्राबरोबर (मराठी कलावंत -रविराज ज्याचे अस्तित्व क्षणिक असले तरी आनंददायी आहे ) एकांतात असते आणि ते दृष्य सहन न झाल्याने विनोद खन्ना त्या दोघीनांही एकेक करून संपवितो. स्वतःच पोलीसांकडे हजर होतो. यथावकाश कोर्ट त्याला फाशीची सजा सुनावते. आपल्या हातून घडलेल्या कृत्याची त्याला न तमा असते ना खंत ! तो होश्यमाणाला सामोरा जातो. पण सगळे इतके सरळसोट नसते. मध्यें दवाखाना नावाचा पडाव येतो. कारण पत्नीची इच्छा (मंगळसूत्र तिच्या मृत्यूनंतर गंगार्पण करणे )पूर्ण करण्यासाठी तो पोलिसांच्या तावडीतून निसटतो. मात्र पोलिसांच्या गोळ्या लागून जख्मी अवस्थेत त्याला दवाखान्यात आणतात. तेथे ओम शिवपुरी ,असरानी हे डॉक्टर्स आणि फरिदा जलाल ही नर्स त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढतात आणि बरा झाल्यावर पोलिसांच्या स्वाधीन करतात.
पुष्पांला (विनोदच्या पत्नीला ) पतीचा विश्वासघात का करावासा वाटतो? बाह्यतः त्यांचे वैवाहीक जीवन संपन्न असते, प्रेमभारीत असते. रविराजला आपल्या मित्राशी बेईमानी करून दोन्ही (जिवलग मित्र आणि वहिनी ) नात्यांचा अपमान कां करावासा वाटतो? उत्तरे नाहीत. (किंवा ज्याची त्याने शोधावीत असे कदाचित अभिप्रेत असावे.) पण हे घडते.
ज्या पत्नीची हत्या केली तिची अंतिम इच्छा (खरंतर अंतिम नव्हे -एकदा गंमती गमतीत तिने तसे बोलून दाखविले असते) एवढी महत्वाची कां वाटावी? बहुदा यामागील एक तर्क असा असावा -तिला खुलासाही करण्याची संधी न देता संपविले याबद्दल विनोद खन्नाचे मन त्याला खात असावे. त्याची अंशतः भरपाई करण्याची (आणि तसेही “मरणान्ती प्रकृती वैराणी ” या न्यायानेही ) ही संधी त्याला सोडायची नसावी. मात्र हा तर्कच ! त्याला पूरक काही सापडत नाही. हिंदी चित्रपटात अभावानेच आढळलेला शिकारी कुत्र्यांचा रोमहर्षक पाठलाग येथे मनःपूत अनुभवायला मिळतो.
विनोद खन्ना या बलदंड अभिनेत्याला येथे मेजर रणजित खन्ना या भारदस्त भूमिकेत बघायला मिळणे ही मेजवानी ! त्याला तोड नाही. नंतर नंतर तो इतरांसमवेत दुय्यमत्वाच्या ओझ्याखाली दबला जायचा आणि झाकोळला जायचा. “इन्कार “, “इम्तिहान ” आणि “अचानक “मध्ये त्याचे अस्सल नाणे अनुभवायला मिळाले. नाही म्हणायला फरिदाचे अरुण आणि शिट्टी प्रकरण ही एक निसर्गसुंदर झुळूक होती. पती-पत्नीमधील काही अवखळ प्रसंग (परेडच्या वेळी टेप रेकॉर्डर वाजणे किंवा पत्नीचे पत्र वाचणे) तीव्रता थोडीशी कमी करण्यात सहाय्यीभूत नक्कीच होतात.
काळाच्या ओघात जगणे बदलते आणि जगण्याचे शास्त्रही ! १९५८ च्या नानावटी खटल्यावर आधारित हा चित्रपट त्या काळातील जगण्याचे शास्त्र आणि नियम अधोरेखित करतो. आज विनोद खन्नाने हाच मार्ग अवलंबिला असता का? सूड ही आदिम भावना आहे पण तिचा व्यक्त होण्याचा (निचरा होण्याचा ) मार्ग वेगळा असू शकला असता का?
ह्या कथेवर आणखी दोन चित्रपट निघाले पण त्यांचे रेखाटन इतके तीव्र (आणि म्हणून भिडण्याजोगे)नव्हते.
दोन-तीन वेळी “सून मेरे बंधु रें” ही अथांग (मंदिराच्या देव्हाऱ्यातून येणाऱ्या पवित्र आवाजातील) धून मनाला भिडून जाते. आणि सरते शेवटी एकाकीपण आखणारी “कोई होता जिसको अपना ” ची धूनही घायाळ करून जाते. खरं तर हे गीत “मेरे अपने ” पेक्षा “अचानक “मध्ये अधिक चपखल बसले असते.
चित्रपटातील शेवटचा प्रसंगही काव्यगत न्यायाला अनुसरून , पण वरील दोन प्रश्नांना जणू उत्तर देणारा –
पुन्हा तुरुंगातील एक पळताना जख्मी झालेला कैदी दवाखान्यात भरती होतो. डॉक्टर उद्वेगाने विचारतो – ‘यालाही वाचवून शेवटी मरूच द्यायचे आहे ना? मग सरळ मी राजीनामा देतो.”
पण त्याला स्वधर्माचा साक्षात्कार होतो.- रुग्णाला वाचविणे हा डॉक्टरचा धर्म असतो आणि त्याने इतर काही विचार मनात येऊ न देता तो फक्त पाळायचा असतो.”
डॉक्टर ऑपरेशन थिएटर कडे जातात.
जवानाचाही धर्म असतो “शत्रूला ” जीवे मारण्याचा (भलेही तो सीमेच्या कोठल्याही बाजूला असो).विनोदही त्याचा धर्म पाळतो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
सर, तुमचे लेख नेहमीच सुरेख असतात. चित्रपट हा माझा वीक आहे. माझे मित्र सुरेश नावडकर सरांचेही ही ललित लेख व त्यांच्या व्यवसायातील आठवणी छान असतात. असेच लेख लिहीत चला, तुम्हाला शुभेच्य्या
Thanks a lot ! Replied separately on your mail id. We stay in touch.