कामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली. मलाही जरा विचित्रच वाटले. पण विचारांती लक्षात आले की आत्ताशी तो कामाला लागलाय. आणि काही वर्षानी लग्न होईल संसाराला सुरवात झाली की काय काय बदल होणार हे आत्ताच कसे काय समजणार म्हणून कदाचित. हा आहे आमच्या मावशीबाईंच्या घरातील एक प्रसंग.
आमच्या मावशी बाई सहा भावंडात पहिल्या. आर्थिक परिस्थिती बिकट. एक स्थळ आले.लहान वयातच लग्न झाले. वीस वर्षे अंतर आहे वयात. सवत दोन मुलांना घेऊन निघून गेली आहे. सासरे दिर यांची जबाबदारी. नंतर स्वतःची दोन मुले झाली मुलीचे लग्न थाटात करून दिले आणि दोन तीन महिने झाले नाही तोच मुलींनी आत्महत्या केली. आता एका मुलाला कसे बसे शिक्षण देत होत्या आणि हे सगळे अचानक घडले. मुलाचे शिक्षण थांबले. त्या अगोदर त्या आमच्या कडे नातवाला सांभाळून स्वयंपाक. वगैरे अनेक कामे म्हणजे पडतील ती. सकाळच्या घर झाडण्यापासूनच. सकाळी घरातून हीच कामे आणि इथे आल्यावर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळे करुन घरी गेल्यावर पण तेच. जीव शिणून जातो. नवऱ्याची दुखणी आहेतच. कुठे म्हणून जीवाला विश्रांती नाही. त्यामुळे कधी कधी चिडचिड करतात पण काम करणे अपरिहार्य आहे…
आता पुढे आणखी वयानुसार शक्ती कमी होणार. सून बाई येईस्तोवर घर घरातील सर्व सामान आयते तिला मिळणार. या बद्दल काही नाही पण आपल्या घरासाठी आपल्या सासूबाईंनी किती किती आणि काय काय सोसले आहे याची जाणीव ठेवून नीट वागली तर बरं. ते ही काळानुसार मान्य केले तरी निदान मुलांनी तरी जाणिव ठेवावी. आईची विचारपूस करावी. काय हव याची माहिती करून घ्यावी. बायको जन्मभराची असते. पण जन्म दिला. संगोपन केले. त्याच्या साठी इतके कष्ट घेतले. दुसऱ्याच्या घरी काम करणे सोपे नसते. आणि गरजेमुळे अपमान घासाबरोबर मुकाट्याने गिळावा लागतो. अशा वेळी मुलगा जर उलटला बायकोच्या आधीन जाऊन अपमानास्पद वागणूक दिली तर तिच्या जिवाला किती यातना होतात हे तिलाच माहीत. शेवटी देखिल मन मारुन आश्रिता सारखे राहणे अवघड असते. आताच्या काळात पुंडलिक किंवा श्रावण होणार नाहीत हे त्रिवार सत्य आहे. आईचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतील तरच पैशाला बरकत असते. आणि आईचे प्रेम हे नेहमीच निरपेक्ष भावनेने ओथंबून असते. त्यामुळे शेवटच्या काळात तिला दुखवू नये…..
या आईने असे ऊत्तर का दिले असेल याची खात्री पटली. सध्याचे वातावरण सगळीकडे असेच आहे हे मावशीबाईंना माहित आहे म्हणूनच त्या अशा बोलल्या असतील. होय ना?
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply