नवीन लेखन...

अच्युताष्टकम् – मराठी अर्थासह

हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे.

अच्युतं केशवं रामनारायणं
कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम् ।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं
जानकीनायकं रामचंद्रं भजे ॥ ०१

मराठी- जो कधीही चुकत नाही अशा अच्युताला, ज्याचे केस सुंदर लांबसडक आहेत (ज्याने केशी दैत्याचा वध केला) अशा केशवाला, रामाचे रूप घेणार्‍या विष्णूला, ज्याच्या कमरेभोवती (यशोदेने) दोर बांधला अशा कृष्णाला, वसुदेवाचा पुत्र, हरी,जो ऐश्वर्यधारी आहे, लक्ष्मीचा पती आहे,गोपींचा नाथ आहे त्याला, सीतेचा पती रामाला मी वंदन करतो.

अच्युता,केशवा,रामरूपा तुला
वासुदेवा, कटी दोर ज्या, सावळा ।
श्रीधरा, श्रीपती, गोपिकां दादला
वंदना भूसुतानाथ माझी तुला।। ०१        (भूसुतानाथ- भूमिकन्या सीतेचा पती श्रीराम)


अच्युतं केशवं सत्यभामाधवं
माधवं श्रीधरं राधिकाराधितम् ।
इन्दिरामन्दिरं चेतसा सुन्दरं
देवकीनन्दनं नन्दजं सन्दधे ॥ ०२

मराठी- जो कधीही चुकत नाही अशा अच्युताचे, ज्याचे केस सुंदर लांबसडक आहेत (ज्याने केशी दैत्याचा वध केला), जो सत्यभामेचा पती आहे, लक्ष्मीचा पती आहे, जो ऐश्वर्यधारी आहे, राघा ज्याची उपासना करते, जो कमलेचे निवासस्थान आहे, ज्याचे विचार अत्यंत उदात्त आहेत, अशा देवकीच्या (पोटच्या) तनयाचे, नंदाच्या (मानीव) कुमाराचे मी ध्यान करतो.

ना चुके, केशवा, सत्यभामापती
श्रीधरा, राधिके पूज्य, पद्मापती ।
श्रीनिवासा तुझे ध्यान मी सुंदरा
नंदपुत्रा करी देवकी कूमरा ॥ ०२


विष्णवे जिष्णवे शङ्खिने चक्रिणे
रुक्मिणिरागिणे जानकीजानये ।
बल्लवीवल्लभायार्चितायात्मने
कंसविध्वंसिने वंशिने ते नमः ॥३॥

मराठी- रुक्मिणीला प्रिय, शंख चक्रधारी, विजयी विष्णो, सीतेचा भर्ता, आपल्या मनात तुझे पूजन करणार्‍या गवळणींच्या नाथा, कंसाला ठार मारणार्‍या, बासरी वाजवणार्‍या तुला मी नमस्कार करतो.

रुक्मिणीनाथ सीतापती, धारका
शंखचक्रा, यशस्वी, हरी, गोपिका- ।
नाथ ज्या पूजिती मानसी, बासरी
वादका, वंदु तो कंस मारेकरी ॥ ०३


कृष्ण गोविन्द हे राम नारायण
श्रीपते वासुदेवाजित श्रीनिधे ।
अच्युतानन्त हे माधवाधोक्षज
द्वारकानायक द्रौपदीरक्षक ॥०४

मराठी-  हे कृष्णा, गोविन्दा, श्रीरामा, नारायणा,रमानाथा, वासुदेवा, अजेया, हे ऐश्वर्याची राशी, अमोघा, अनन्ता, माधवा, अधोक्षजा, द्वारकाधीशा, द्रौपदीरक्षका ……..

कृष्ण गोविंद नारायणा राघवा
श्रीपती वासुदेवा रमा माधवा ।
इंद्रियातीत जो द्वारका-मालका
ना ढळे जो कधी द्रौपदीतारका ॥ ०४


राक्षसक्षोभितः सीतया शोभितो
दण्डकारण्यभूपुण्यताकारणः ।
लक्ष्मणेनान्वितो वानरैः सेवितो_
ऽगस्तसम्पूजितो राघव: पातु माम् ॥ ०५

मराठी- ज्याला राक्षसांनी संताप आणला, जो सीतेमुळे शोभायमान दिसत आहे, ज्याच्या (वास्तव्या) मुळे दंडकारण्याच्या भूमीला पावित्र्य आले, ज्याच्याबरोबर (नेहेमी) लक्षमण असे, वानरगण ज्याची सेवा करतात, अगस्ति ऋषींनी ज्याचे पूजन केले असा रघुकुलोत्पन्न (श्रीराम) माझे रक्षण करो.

राग ज्या राक्षसां, मान सीतेमुळे
दंडकारण्य हो पुण्यकारी बळें ।
साथ देती कपी, संगती लक्ष्मणा
ज्या अगस्ती नमे, राम ये रक्षणा ॥ ०५


धेनुकारिष्टकानिष्टकृद्द्वेषिहा
केशिहा कंसहृद्वंशिकावादकः ।
पूतनाकोपकः सूरजाखेलनो
बालगोपालकः पातु मां सर्वदा ॥ ०६

मराठी- धेनुक, अरिष्टक राक्षसांचे अनिष्ट करणारा, शत्रूंचा नाश करणारा, केशी आणि कंसाचा वध करणारा, बासरी वाजवणारा, पूतना राक्षशिणीवर आपला क्रोध प्रकट करणारा, यमुना नदीच्या किनारी खेळणारा, बालकृष्ण माझे नित्य रक्षण करो.

दैत्य आरिष्ट धेनूस मारी, अरी
कंस केशी वधी, वाजवी बासरी ।
पूतने राग दावी, असीता तिरी               (असिता- यमुना)
बाळ खेळे, मला राखि तो श्रीहरी ॥ ०६

टीप- येथे पहिल्या तीन चरणांचा संदर्भ श्रीमद् भागवताच्या दशम स्कंदातील विविध कथांशी (बलराम व कृष्णाने तालवनात केलेले धेनुकासुर व अरिष्टासुर, कृष्णाने घोड्याच्या रूपातील केशी दैत्य याचा तसेच पूतना राक्षसीचा वध) आहे.


विद्युदुद्योतवत्प्रस्फुरद्वाससं
प्रावृडम्भोदवत्प्रोल्लसद्विग्रहम् ।
वन्यया मालया शोभितोरःस्थलं
लोहिताङ्घ्रिद्वयं वारिजाक्षं भजे ॥ ०७

मराठी- ज्याचे वस्त्र विजेसमान तेजस्वी आहे, ज्याची काया पावसाळी मेघाप्रमाणे चमकत आहे, वनमालेमुळे ज्याच्या छातीला शोभा प्राप्त झाली आहे, आणि ज्याची पाउले लाल रंगाची आहेत अशा कमलनयन विष्णूला मी भजतो.

वीज जेवी नभी तेज वस्त्रा दिसे
पावसाळी जणू मेघ अंगी वसे ।
पुष्पमाला उरी शोभते साजिरी
पाउले लाल, मी वंदितो श्रीहरी ॥ ०७


कुञ्चितैः कुन्तलैर्भ्राजमानाननं
रत्नमौलिं लसत्कुण्डलं गण्डयोः ।
हारकेयूरकं कङ्कणप्रोज्ज्वलं
किङ्किणीमञ्जुलं श्यामलं तं भजे  ॥ ०८

मराठी- ज्याचा चेहरा रुळणार्‍या कुरळ्या केसांनी रमणीय झाला आहे, चमचमणार्‍या रत्नखचित कर्णभूषणांनी ज्याचे गाल झगमगत आहेत, आकर्षक बाजुबंद व किणकिण आवाज करणार्‍या कंकणांनी ज्याचे बाहू सजले आहेत, अशा सावळ्या (श्रीकृष्णा) ला मी भजतो.

केस मुद्द्याळ शोभा मुखा लाभते     (मुद्द्याळ- कुरळे)
डूल गाली मणी तेजही फाकते ।
चाळ वाकी गळा हार तेजाळतो
किंकिणी नाद, मी सावळा पूजितो ॥ ०८


अच्युतस्याष्टकं यः पठेदिष्टदं
प्रेमतः प्रत्यहं पूरुषः सस्पृहम् ।
वृत्ततः सुन्दरं कर्तृविश्वम्भर-
स्तस्य वश्यो हरिर्जायते सत्वरम् ॥ ०९

मराठी- जो, हे इच्छित फल देणारे अच्युताचे आठ श्लोकी सुंदर स्तोत्र प्रेम आणि परमात्म्यावरील श्रद्धेने गाईल त्याला हे विश्व धारण करणारा विश्वकर्ता श्रीहरी तात्काळ वश होतो.

आठ ओळी सदा गीत हे छानसे
आदरे प्रेमभावे कुणी गातसे ।
विष्णु त्या विश्वकर्ता, फला देतसे
श्रीहरी तातडी आपला होतसे ॥ ०९

। इति श्रीमद शंकराचार्य विरचित अच्युताष्टकं संपूर्ण ।

*************

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..