नवीन लेखन...

एसीपी दाभोलकर

साप्ताहिक मार्मिक त्याकाळी लोकप्रियतेच्या शिखराकडे वाटचाल करत होते.त्यांतली मा. बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे मराठी मनांना जागवीत होती. संपादकीयात काय लिहिलंय ह्याला खूप महत्त्व होतं. जून १९६६मध्ये शिवसेनेचा स्थापना झाली होती. १९६९मध्ये नेहमीप्रमाणे मार्मिकचा एक अंक मी विकत घेतला. त्यावर मुखपृष्ठावर ठळक अक्षरांत लिहिलेल्या मथळ्याकडे माझं लक्ष आपोआप वेधलं गेलं. “असे इन्स्पेक्टर दाभोलकर प्रत्येक पोलिस स्टेशनला हवेत.” आत याचं मथळ्याच्या अग्रलेखात इन्स्पेक्टर दाभोलकरांनी गुंडांवर केलेल्या कारवाईचा गौरवाने उल्लेख केला होता. दादरच्या सैतानचौकी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील दुकानदारांकडून जबरीने खंडणी वसुल करणाऱ्यांना त्यांनी कशी जरब बसवली आहे, ह्याची हकीकत दिली होती. नावाने उल्लेख करून म्हटले होते की असे इन्स्पेक्टर दाभोलकर प्रत्येक पोलिस स्टेशनला हवेत. आता असा लेख दाभोलकरांना आनंदीत करणारा व्हायला हवा. तसा तो कांही काळ झालाही. पण तो आनंद जेमतेम १५ दिवसही टिकला नसेल.

तो लेख प्रसिध्द झाला, त्यानंतरच्याच आठवड्यामध्ये, फेब्रूवारी १९६९मधे अर्थमंत्री मोरारजी देसाई आले. शिवसेनेने सीमा प्रश्नावरून निदर्शने केली व त्यांना मोरारजी देसाईंना निवेदन द्यावयाचे होते. मोरारजींनी गाडी थांबविण्यासही नकार दिला. १९६६ पासून प्रत्येक दसऱ्याला मा. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कवर घणाघाती भाषण होतच होते. शिवसैनिक पेटून उठलेले होते. त्यावेळी सारा रोष दाक्षिणात्यांवर होता. बाहेरून येऊन मराठी लोकांच्या नोकऱ्या लाटतात म्हणून. मोरारजी निमित्त झाले. त्या रागाला वाट देण्यासाठी उडपी हाॅटेल्सना निशाणा बनवले गेले. दादर, माटुंगा, प्रभादेवी भागांत जाळपोळ सुरू झाली. दुकानांवर हल्ले होऊ लागले. इन्स्पेक्टर दाभोलकरांवर त्याच भागांत शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी होती. तो शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यांनी कारवाई करण्यांत कसर सोडली नाही. परंतु एका पोलिस स्टेशनवरचे पोलिस त्यासाठी पुरेसे नव्हते. त्यांतच कांही पोलिसांची मुलेही दंग्यात सहभागी होत होती. पोलिस आपल्याच लोकांवर कारवाई करायला कचरत होते. पोलिसांवरही घराघरांतून जात्यापासून वरवंट्यापर्यंत कांहीही फेकले जात होते. तत्कालीन महाराष्ट्र सरकारने दंगलीची तब्बल आठवडाभर दखल घेतली नाही. इन्सपेक्टर दाभोलकरांच्या मदतीला कोणतीही कुमक पाठवण्यात आली नाही. यथावकाश दंगे थांबले. दाक्षिणात्य दुकानदारांचे खूप नुकसान झाले. शिवसेनेची दहशत निर्माण झाली. त्यानंतर दाभोलकरांना कमिशनर आॅफीसात बोलावून दंगल घडल्याबद्दल जाब विचारण्यात आला ? मार्मिकचा तो अंक दाभोलकरांसमोर धरला आणि त्यांच्यावर आरोप केला की शिवसेनेचे त्यांच्याशी सख्य असल्यामुळेच ही दंगल आटोक्यात आणण्यात त्यांनी दिरंगाई केली. प्रत्यक्षात दाभोलकरांनी प्राणांची पर्वा न करतां, तहान, भूक वा झोप यांची पर्वा न करता, कारवाई करण्याचा प्रयत्न ते सहा-सात दिवस करत होते. ते सर्व पोलिस खात्याला माहित होता. परंतु दंगलीचे खापर कोणावर तरी फोडायचे हा वरीष्ठांचा उद्देश होता. असंही म्हटलं जातं की खरं तर तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई किंवा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा शिवसेनेला छुपा पाठींबा होता. कारण काँग्रेसला कम्युनिस्टांना शह द्यायचा होता. अर्थात आपल्याला राजकारणांत, तेव्हाच्या किंवा आताच्याही, शिरायचे नाही. त्या प्रभागाचे (zone) पोलिस उपायुक्त रिबेरो होते. आपल्या पुस्तकात लिहितात, “माझ्या भागांत दाभोलकर नावाचा एक निरीक्षक दंगल आटोक्यात आणण्याच्या कामी अतिशय सक्रीय होता. गल्लीबोळात घुसून तो तरुणांना घराबाहेर काढत असे. ते त्या भागातील नाहीत असे कळल्यावर त्यांना पकडून उलटतपासणी करायला त्यांना पोलिस स्टेशनवर घेऊन येत असे. दाभोलकर ज्या पध्दतीने दंगलखोरांना हुडकून काढत होता, ते पाहून मी प्रभावित झालो.”

इन्स्पेक्टर दाभोलकर प्रथम गाजले ते सुर्वे बंधू आणि त्यांच्या टोळीला त्यांनी गजाआड केले तेव्हां. मन्या सुर्वे व त्याचा भाऊ भार्गव सुर्वे आणि त्यांची टोळी दादर भागांत दहशत निर्माण करून होती. प्रत्येक दुकानदारांकडून जबरदस्तीने मोठ्या रकमा धाक देऊन वसूल करीत. न घेणाऱ्यांना जबरदस्त मारहाण करत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले होते. दरोडे, मारहाण, खून, दहशत पसरवणे इ. गुन्हे नित्य होत होते.इ. दाभोलकरांनी त्या दोघांना व त्यांच्या टोळीच्या दहा-बारा जणांना शिताफीने अटक केली. तोंवर सुर्वे बंधूना आपल्या वाटेला कोणी पोलिस अधिकारी येत नाही, याची खात्री होती. परंतु इ. दाभोलकरांनी त्यांचा गैरसमज दूर केला. पकडून पोलिस स्टेशनांत आणलेले असतांना दोघांनी इ. दाभोलकरांवर शिव्यांचा भडीमार केला. जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. परंतु त्यामुळे इ. दाभोलकर अजिबात डगमगले नाहीत. गुन्हेगारांना अटक करून पोलिसांचे काम संपत नाही. गुन्हेगारांविरूध्द भक्कम पुरावा जमवणे आणि तो न्यायालयांत स्वीकारला जाईल हे पहाणे, हे गुन्हेगाराला पकडण्याइतकेच किंबहुना जास्तच महत्त्वाचे काम असते. इ. दाभोलकरांनी सुर्वे बंधू आणि त्यांच्या टोळींतील सदस्य यांच्याविरूध्द भक्कम पुरावा गोळा केला. त्यांनी त्या टोळीविरूध्द भरभक्कम पायावर केस उभी केली. सुर्वे बंधूच्या वकीलांना त्याचा भेद करणे अशक्य झाले. कोर्टात सगळ्यांना कमीत कमी १४ वर्षे ते आमरण जन्मठेपेची शिक्षा झाली. पुन्हां कोर्टात दाभोलकरांना सुर्वे बंधूद्वयातर्फे धमक्या देण्यांत आल्या. पण ते सर्व दीर्घकालीन शिक्षेवर गेलेच.

त्यावेळी भारतांत अनेक वस्तू आयात होत नसत. किंवा त्यावर खूप जकात बसत असे. त्यामुळे पोर्तुगीजांच्या ताब्यांतलं गोवा हे स्मगलींगचं मोठं ठिकाण होतं. एकदां गोव्याहून असाच स्मगल झालेला खूप भारी किंमतीचा माल इ. दाभोलकरांनी पकडला. त्या काळांत त्या मालाची किंमत ४०-५०लाख असेल. त्याबद्दल खरं तर इ. दाभोलकरांना पुरस्कार, निदान वरिष्ठांची शाबासकी मिळायला हवी होती. पण झाले उलटेच. तो स्मगलर तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या ओळखीचा होता. त्याच्या सांगण्यावरून इ. दाभोलकरांवरच आरोप ठेवण्यात आला की जप्त केलेला सर्व माल त्यांनी सरकारजमा न करतां कांही भाग गायब केला आहे. शिवाय स्मगलिंगच्या आरोपांतही चुकीच्या व्यक्तीला गोवले आहे. ह्याच कारणास्तव इ. दाभोलकरांना सक्तीच्या रजेवर पाठवून डिपार्टमेंटल चौकशी करण्यात आली. एक वर्ष इ. दाभोलकरांना मानसिक क्लेश सहन करत घरी बसावं लागलं. परंतु केसचा निकाल देताना नमूद केलं गेलं की आपल्या प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकाऱ्यावर आरोप करतांना पोलिस खात्याने पूर्ण विचार केला पाहिजे. हा आरोप कोणत्या आधारावर करण्यात आला आहे हेच इथे कळत नाही.” इ. दाभोलकर पुन्हा जोमाने कामाला लागले.

दाभोलकर निवृत्त झाल्यावर सांताक्रुजला रहात असत. मन्या सुर्वेने तेव्हां आजारी आईला भेटण्यासाठी पॕरोलवर तात्पुरती सुटका मिळवली. त्या निमित्ताने सुटलेला सुर्वे पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला. तो पुन्हां टोळीची जमवाजमव करू लागला. त्याला तुरूंगात पाठवणाऱ्या इ. दाभोलकरांना तो विसरला नव्हता. त्याने त्यांचा घरचा फोन नंबर मिळवला. घरी धमकीचे फोन येऊ लागले. त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. आता ए.सी.पी. म्हणून रिटायर झालेल्या दाभोलकरांकडे रिव्हॉल्वरही नव्हते. स्वसंरक्षणासाठी एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे तेही पोलिसांवरच अवलंबून होते. त्यांनी तक्रार केल्यामुळे सांताक्रुझ पोलिस स्टेशनचा फक्त एक पोलिस त्यांचे घर असलेल्या गल्लीत कांही काळ तैनात करण्यात आला. पण मुंबई पोलिस मन्या सुर्वेच्या मागे हात धुवून लागले होते. लौकरच एका चकमकीत त्यांनी मन्याला ठार केले.

इ. दाभोलकरांना विविध प्रकारचे वरिष्ठ लाभले. “दाभोलकर, तुमचं पगारांत भागत असेल. आमचं नाही भागत. तुम्ही पोलिस स्टेशनला असतां, वरकमाईची संधी तुम्हाला असते. तेव्हां आम्हाला अमकी रक्कम दर महिन्याला मिळाली पाहिजे” असं सांगणारे वरीष्ठही भेटले. एकदा एक मुसलमान आपल्या मुलाला घेऊन जात असतांना त्याच्या मुलाला कारने उडवले. मुलगा मरण पावला. तो बाप पोलिस स्टेशनमध्ये येऊन खूप रडला. तक्रार येताच इ. दाभोलकरनी कार जप्त करून पोलिस स्टेशनला आणून ठेवायला सांगितले. कार आणून ठेवली गेली. दुर्दैवाने ती कार दुसऱ्या मुस्लिम देशाच्या वकीलातीतील कोणाची तरी होती. वकीलातीने तत्कालीन कमिशनरना फोन केला. ते कमिशनरही मुस्लिम होते. त्यांनी इ. दाभोलकरांना बोलावून दोष दिला. वकीलातीच्या कारला “संरक्षण” असते, ह्याची आठवण करून दिली. इ. दाभोलकरनी कार तात्काळ सोडली पण केस कोर्टांत नेलीच. कोर्टामधे ज्या बापाने तक्रार केली होती तोच फिरला. तो म्हणाला, “चूक आमचीच होती. माझा मुलगा माझा हात सोडून रस्त्याच्या मधे गेला.” त्याला पैशांनी विकत घेण्यांत आल होतं आणि त्याने आपला पोलिस स्टेशनवर नोंदवलेला जबाब फिरवला. एका कमिशनरने त्यांना (बहुदा शिवसेना चळवळीनंतर) रोषाने पोलिस ट्रेनिंग काॅलेजला बदलीवर पाठवले. पण दोन महिन्यातच पुन्हा पोलिस स्टेशन प्रमुख म्हणून परत आणले गेले. ते ट्रेनिंग काॅलेजमध्ये कायदा (Law) हा विषय शिकवीत. एकदा एका केसमध्ये त्यांची साक्ष चालू होती. त्यांनी क्रिमीनल प्रोसिजर मधील कांही कलमांचा सफाईने केलेला वापर पाहून आरोपीच्या वकीलांने हेटाळणीच्या स्वरांत म्हटले, “वाह, दाभोलकर, तुम्ही सर्व पाठांतर करून आलेले दिसतां !” त्यावर दाभोलकरांनी ताड्कन उत्तर दिले, “मला पाठांतर करावे लागत नाही, कारण मी हा विषय पोलिस ट्रेनिंग काॅलेजमधे शिकवतो.”

सभाबंदी मोडून कामगार नेता सभा घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या बायकोचा इन्स्पेक्टर भाऊ (मावसभाऊ) तिथे येऊन त्याला हातकड्या घालतो. हे कुठल्या हिंदी किंवा तामीळ चित्रपटांतलं दृष्य नाही. इ. दाभोलकरांच्या कारकीर्दीत त्यांना दोन-तीनदा पार पाडावं लागलेलं कर्तव्य आहे. कामगार नेते बगाराम तुळपुळे ह्यांची पत्नी इ. दाभोलकरांची सख्खी मावसबहीण. बगाराम तुळपुळे आपल्या तत्त्वांप्रमाणे सभाबंदीचा हुकुम मोडण्याचा प्रयत्न करीत. तर इ. दाभोलकर आपलं कर्तव्य पार पाडीत. मात्र हे सारं दंगा न होता, फार तर घोषणांच्या आवाजांत पार पडे. एकदां सांताक्रूजला कोणत्या तरी संप काळांत बेस्ट डेपोजवळ गर्दी जमत गेली. त्याला अनिष्ट वळण लागणार असं दिसू लागलं. जवळच असलेल्या बसेस हे जमावाचं प्रथम लक्ष्य ठरलं असतं.पण ए.सी.पी. दाभोलकरांनी लाठीमाराचा आदेश न देतां, वाहतूक पोलिस वापरतात त्या ठोकळ्यावर ते उभे राहिले. भाषण देऊन जमावाला त्यांनी धमकी न देता अशा कांही शब्दांत शांततेच आवाहन केलं की थोड्याच वेळांत जमाव शांत होऊन पांगला. इन्स्पेक्टर वाकटकर आणि इन्स्पेक्टर पेंडसे हे गुन्हे अन्वेषण क्षेत्रांत प्रसिध्द आहेत. त्यांच्या कथाही प्रसिध्द आहेत. दाभोलकरांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आल्याबद्दल त्यांचे आभार मानताच, पेंडसे माझ्या मोठ्या भावाजवळ म्हणाले, “दाभोलकर आमचे गुरू.” ते पुढे म्हणाले, “एकदा दाभोलकर वांद्र्याला एका चोरांचा पाठलाग करत होते. चोर पळतां पळतां वांद्रा खाडीजवळ पोहोचला. चोराने खाडीच्या पाण्यात उडी मारली. आणि दाभोलकरांनी पुढचा मागचा विचार न करतां त्याच्या पाठोपाठ खाडीत उडी मारली. थोड्याच वेळांत ते त्याला केसाला धरून वर घेऊन आले.” सर्वच घटना चित्रपटीय वाटण्याजोग्या. सर्व सरकारी खात्यात होतो तसाच सिनिआरिटीचा घोळ पोलिस खात्यातही होताच. परंतु इ. दाभोलकरनी बरीच वर्षे सब-इन्सपेक्टर, इन्सपेक्टर व सिनियर इन्स्पेक्टर म्हणून गाजवल्यावर निवृत्तीच्या आधी कांही वर्षे त्यांना एसीपी ही पदोन्नती देण्यात आली. आता एसीपी हे पोलिस स्टेशनचे प्रमुख असतात. तेव्हा इन्स्पेक्टर प्रमुख असे.

एसीपी दाभोलकरांचे संपूर्ण नाव द्वारकानाथ साबाजी दाभोलकर. हे प्रा. देवदत्त दाभोलकरांचे सख्खे मावसभाऊ. त्यांच्यापेक्षा थोडे मोठे. माझ्या आईचे ते आत्तेभाऊ व त्याचबरोबर माझ्या सख्ख्या मावशीचे यजमान. असे दुहेरी नाते. त्यामुळे मला त्यांचा अभिमान वाटतो. माझे वडील लौकर निधन पावले. तेव्हां माझ्या लग्नांत मावशी आणि तेच माझे पालक म्हणून कार्याला बसले होते. त्यांच्याकडून मला बऱ्याच हकीकती प्रत्यक्ष ऐकायला मिळाल्या. ते म्हणत, “लालबाग, भोईवाडा पोलिस स्टेशनं बरी. गुंडाशी दोन हात करणं सोप. ते पोलिसांना घाबरतातही.पण मंत्र्यांची घरं ज्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत आहेत असं गावदेवी पोलिस स्टेशन नको.” महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री निवर्तले तेव्हां इ. दाभोलकर गांवदेवी पोलिस स्टेशनला होते. अर्थात मृत मुख्यमंत्र्यांच्या निवासात हजर होते. तेव्हां मृताकडे संपूर्ण दुर्लक्ष करून “आता कोणी मुख्यमंत्री व्हायचे,” यावरून जे राजकारण चालू होते, ते पाहून इ. दाभोलकरना किळस आली. इ. दाभोलकरांचे वडील पोलिसांतच होते. (बहुदा फौजदार असावेत). त्यांचे धाकटे बंधूही एसीपी होऊन रिटायर झाले. धाकट्या भावाने (एकनाथ) धाडसाने ७५लाख रूपयांचे (सुमारे पन्नास वर्षांपूर्वीच्या किंमतीने) चोरटे सोने जप्त करून वाहवा मिळवली होती. मोठे दाभोलकर ७७-७८वर्षांचे असताना निवर्तले.

अशा या कडक पोलिस अधिकाऱ्याच्या मनांत एक कवी दडला होता, हे सांगितलं तर विश्वास बसेल ? पण ते खरं आहे. ते दत्तभक्त होते. त्यांनी गुरू दत्तात्रेयांवर अनेक कविता केल्या. माझ्या मावशीनेही स्वत:च्या ५५ व्या वर्षी कविता लिहायला सुरूवात केली. मावशीच्या कविता फारच छान शब्दांत बांधलेल्या असत. तर यांच्या कवितांमध्ये भक्तिरस ओतप्रोत दिसे. ते जवळच्या नात्यांतील व्यक्तीच्या लग्नात स्वरचित मंगलाष्टके खड्या आवाजात चालीवर म्हणत लाऊडस्पीकरशिवाय. निवृत्तीनंतर एकमेकांना कविता ऐकवणे हा त्यांचा मोठा छंद झाला होता. मी त्यांना भेटायला गेलो की दोघंही मला नवीन कांही लिहिलेलं वाचून दाखवत. मग मी दोघांच्याही कवितांची पुस्तके छापायचे ठरवले. आत्माराम प्रकाशन हे नाव घेऊन व माझ्या पत्नीला प्रकाशक बनवून मी त्या दोघांच्या कवितांचे दोन संग्रह प्रसिध्द केले. मावशीच्या कविता संग्रहाचे नाव “सुगंध माझ्याही हातांना” असे ठेवले तर त्यांच्या कवितासंग्रहाचे नाव “श्रीदत्तभक्तिगीते” असे ठेवले. एकच आवृत्ती काढली. पुस्तके पाहून दोघांना खूप आनंद झाला. व त्यांना आनंद मिळवून दिल्याचा मला आनंद झाला. एसीपी दाभोलकरांची दत्तभक्तिगीते हातोहात संपली. मावशीची पुस्तके संपायला थोडा वेळ लागला. पण पुढे कोणीतरी एक फुलोरा नावाचा एक अनेक कवींच्या कांही खास कवितांचा संग्रह काढला, त्यांत आवर्जून तिची परवानगी घेऊन तिच्या दोन कविता समाविष्ट केल्या. ९४ वर्षांची माझी मावशी आता पणतवंडांत रमली आहे.

गेल्याच आठवड्यात मी “ध्यानी, मनी ते स्वप्नी” लिहिलं होतं. आज अगदी तसचं झालं. रविवार गेला तरी माझं कांहीच लिहून झालं नव्हतं. कशावर लिहावं तेही ठरलं नव्हतं. उद्या कांही तरी लिहिलचं पाहिजे असा विचार मनाशी करत मी रविवारी झोपलो. स्वप्नांत मला एसीपी दाभोलकर दिसले. जसे मी त्यांना त्यांच्या तरूणपणी पाहिले होते तसे. उंच, सडपातळ, देखणे, रुबाबदार. पण माझे मामा म्हणून नाही की इन्स्पेक्टर म्हणून नाही तर आम्हा कांही जणांचा इंटरव्ह्यू घेणारे साहेब म्हणून. आम्ही मित्र इंटरव्ह्यूची खूप तयारी करत होतो कारण ते कडक आहेत असं ऐकून होतो. मग मी इंटरव्ह्यूसाठी गेलो आणि त्यांच्यासमोर बसलो.मी प्रश्नांच्या सरबत्तीच्या अपेक्षेत असतानांच, ते ओळखीचं हंसून म्हणाले, “काय रे अरविंद ! कसा आहेस ?” आणि मी जागा झालो. सोमवारी वेळ मिळताच हा लेख लिहून काढला. तो त्यांच्याच स्मृतीला समर्पित.

-अरविंद खानोलकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..