ज्येष्ठ अभिनेत्री आणि ‘मी…मिठाची बाहुली’ या आत्मचरित्राने साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या लेखिका वंदना मिश्र म्हणजेच पूर्वाश्रमीच्या सुशीलाबाई लोटलीकर. मराठी, गुजराथी आणि मारवाडी रंगभूमीवरचे १९४० च्या सुमारास एक नावाजलेले व्यक्तिमत्व.
त्यांचा जन्म २६ जानेवारी १९२७ रोजी झाला. त्यांच्या आई लक्ष्मीबाई लोटलीकर यांचे लग्न १९१८ ला झाले होते. सुशीलाबाईना दोन मोठी भावंडे होती. त्यांच्या वडिलांचा मृत्यू त्या अडीच वर्षांच्या असताना न्युमोनियाने अचानक झाला. आई मुलांना घेवून मुंबईतून रत्नागिरीमधील आडिवरे गावी त्यांच्या सासरी गेली पण थोड्याच काळात त्यांना कळून चुकले कि त्यांना एका विधवेसारखे जगावे लागेल. त्यांच्या आईला हे काही पटले नाही. त्या मुलांना घेवून परत मुंबईत आल्या.
१९३० साली एका विधवेने तीन मुलांसह नोकरी करून मुंबई राहणे हा एक धाडसी आणि थोडासा बंडखोरी विचार होता. त्यांनी पुढे नर्सिंगचे शिक्षण घेवून हॉस्पिटलमध्ये नोकरी करायाला सुरुवात केली. तिथून त्यांच्या घराची आर्थिक परीस्थिती बदलू लागली. शाळेत असताना सुशीलाबाईनी गाणे शिकण्यास सुरवात केली. त्याकाळी मराठी ब्राम्हण घरातील मुलीने संगीत शिकावे असे वातावरण नव्हते. पुढे त्यांचा प्रवेश मराठी रंगभूमीवर झाला. काही काळाने आईच्या अपघातामुळे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम करण्यास सुरवात केली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी त्यांना रंगभूमीवर प्रवेश घ्यावा लागला. त्यावेळी मामा वरेरकरांच्या ‘सारस्वत’ या गाजलेल्या प्रायोगिक नाटकात महत्वाची भूमिका बजावली होती. पुढे पाश्र्वनाथ आळतेकर यांच्यासारख्या तितक्याच तालेवार आणि प्रयोगशील अशा दिग्दर्शक, कलावंताच्या मार्गदर्शनाखाली त्यांना अभिनयकलेचे धडे गिरवता आले. गुजराती, राजस्थानी अशा अन्य भाषिक कलाकृतींच्या रंगमंचीय अविष्कारात त्यांचे त्यावेळी सक्रिय योगदान असे. गायक अभिनेत्री या नात्याने ज्योत्स्ना भोळे, शोभा गुर्टू अशा अनेकींशी त्यांचा वैयक्तिक स्नेहसंबंध होता. शोभा गुर्टू यांची आठवण त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत व्याकुळ करीत असे.
त्यांनी विविध दिग्दर्शक आणि कलावंतांसोबत काम केले. गुजराती, राजस्थानी नाटकांमध्येही त्यांनी काम केले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांचे लग्न हिंदी लेखक जयदेव मिश्र यांच्याशी झाले. त्याकाळी एक तर नाटक सिनेमा मध्ये काम करणाऱ्या मुलीला लग्न साठी मुलगा मिळणे कठीण अश्या परिस्थितीत समोरून चालत आलेले स्थळ आंतरजातीय असले तरी सारासार विचार करून त्यांच्या आईने त्यांना लग्न करायचा सल्ला दिला. लग्नानंतर त्यांनी रंगभूमीला विश्राम दिला आणि घर, संसार आणि मुले यात रममाण झाल्या. लग्नानंतर २२ वर्षांनी परत व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचे पुनरागमन झाले.
वंदना मिश्र यांचे चिरंजीव म्हणजे जेष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र. ‘मी.. मिठाची बाहुली’ अशा अनवट शीर्षकाच्या परंतु कमालीच्या रसरशीत अशा एकाच पुस्तकाने मराठी साहित्यातील आत्मचरित्र दालनात वंदना मिश्र यांनी स्वताचे स्थान निर्माण केले होते. त्यांनी ‘मी…मिठाची बाहुली’मधून आपला गुजराती, राजस्थानी रंगभूमीवरचा प्रवास, स्वातंत्र्यपूर्व भारतातील मुंबई, तेव्हाचे समाजजीवन, राजकीय चळवळी, फाळणीचे पडसाद आदी विषयांचा वेध घेतला आहे. २०१४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या आत्मचरित्राचा इंग्रजी अनुवाद विख्यात लेखक जेरी पिंटो यांनी केलेल्या या पुस्तकाच्या ‘आय.. द सॉल्ट डॉल’ या अनुवादाचा तर राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. ‘मरताना का असेना झाले की नाही मी लेखिका’, असे मिश्किलपणे त्या म्हणत.
आपला गुजराती, राजस्थानी रंगभूमीवरचा प्रवासानुभव, त्या काळातील.. म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातील मुंबई, या शहराचे तत्कालीन समाजजीवन, चतन्यदायी राजकीय चळवळी, फाळणीचे पडसाद असा मोठा कालपट वंदनाजींनी ‘मी.. मिठाची बाहुली’ या पुस्तकात मोठय़ा सराईतपणे चितारला आहे. २०१४ साली प्रकाशित झालेल्या या आत्मचरित्राचे रसिक आणि अभ्यासक अशा दोघांकडूनही मोठय़ा उत्साहात स्वागत झाले.
वंदना मिश्र यांचे २५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले.
Leave a Reply