विष्णु हरी औंधकर यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी झाला.
विष्णू हरी औंधकर यांचे शिक्षण मराठी चार इयत्तेपर्यंतच झाले होते. बालवयातच त्यांनी महाराष्ट्र नाटक मंडळीत स्त्रीपार्ट करण्यासाठी प्रवेश केला. तेथे त्यांनी ‘पुण्यप्रभाव’, ‘शिवसंभव’, ‘कांचनगडची मोहना’ इत्यादी नाटकांतून कामे केली. त्याच वेळेस दादासाहेब फाळके ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. या चित्रपटात भूमिका करण्यासाठी ते नट मंडळी शोधत होते. त्यांच्या नजरेत औंधकर आले व त्यांनी औंधकर यांना आपल्या चित्रपटात भूमिका दिली. फाळके यांचा हा चित्रपट १९१३ साली पडद्यावर आला. पुढे फाळके यांनी मुंबई सोडून नाशिकला मुक्काम हलवला. औंधकर मात्र मुंबईतच राहिले व नाटकातून भूमिका करू लागले.
तीव्र बुद्धी आणि सूक्ष्म निरीक्षणशक्ती यांच्या बळावर रंगभूमी आणि तिचा प्रेक्षकवर्ग यांचा अभ्यास करून ‘बेबंदशाही’, ‘आग्र्याहून सुटका’ अशी नाटके औंधकर यांनी सातत्याने लिहिली. ही नाटके रंगभूमीवर गाजली.
पांडुरंग तलगिरी यांनी पुण्याला खडकी येथे युनायटेड पिक्चर्स सिंडिकेट ही चित्रसंस्था स्थापना केली आणि औंधकरांना खास बोलावून घेतले. ‘शिवप्रभाव’(Glory of virtue, १९२७) हा चित्रपट औंधकरांनी त्या वेळेस लिहून दिला. चित्रपट चांगला जमल्यामुळे तलगिरींनी त्यांना लगेच पुढला चित्रपट लिहिण्याचा आग्रह केला. केवळ पाच दिवसांत औंधकरांनी ‘शूर किल्लेदारीण’ (Brave woman, १९२७) चित्रपट लिहून दिला आणि पुढे त्या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. औंधकरांनी प्रभातमध्ये अनेक चित्रपटांची कथानके रचून दिली.
बाबूराव पेंटर यांनी शालिनी सिनेटोनसाठी १९३६ साली ‘सावकारी पाश’ या बोलपटाची निर्मिती केली. बाबूरावांनी प्रथम हा चित्रपट १९२५ साली मूकपट म्हणून काढला होता. आता चित्रपट बोलणार होता म्हणून पटकथा आणि संवाद लिहिण्यासाठी औंधकरांना आमंत्रण धाडले आणि काम करून घेतले. तसेच त्या बोलपटातल्या खलप्रवृत्तीच्या सावकाराचे काम करण्याची संधीही दिली.
मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात १७ मार्च १९३६ रोजी ‘सावकारी पाश’ हा वास्तववादी चित्रपट प्रदर्शित झाला. त्या वेळेस औंधकरांच्या संवादांची आणि अभिनयाची खूपच प्रशंसा झाली. औंधकरांनी शेठशिराज अली हकीम यांच्यासाठी ‘चंद्रराव मोरे’ (१९३८) या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीतरचना करून दिली व त्यात खलप्रवृत्तीची भूमिका केली.
प्रकाश पिक्चर्सचे एक भागीदार विजय भट यांनी औंधकरांकडून ‘भरतभेट’ (१९४२), ‘नरसी भगत’ (१९४७) व ‘रामराज्य’(१९४४) हे बोलपट लिहून घेतले. त्यांचे हे सारे चित्रपट पडद्यावर भरपूर यशस्वी ठरले. मात्र ‘भरतभेट’ आणि ‘रामराज्य’ या चित्रपटांचे यश औंधकर पाहू शकले नाहीत. कारण हे चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
विष्णू हरी औंधकर यांचे १७ डिसेंबर १९४२ रोजी निधन झाले.
— द. भा. सामंत
Leave a Reply