क्रिशन निरंजन सिंग म्हणजे के. एन . सिंग यांचा जन्म १ सप्टेंबर १९०८ रोजी डेहराडून येथे झाला. त्यांचे वडील चंडिप्रसाद सिंग मोठे वकील होते. त्यांना आपल्या वडिलांप्रमाणे मोठे वकील व्हायचे होते , लंडनला वकिलीचे शिक्षण घेण्याचे पण ठरले होते परंतु एकदा एका अपराधी माणसाला त्यांच्या वडिलांनी सोडवलेले पाहून त्यांनी आपण वकील न होण्याचे ठरवले , वकील होण्यापासून त्यांचे मन परावृत्त झाले. त्यांनी लखनऊ मधून आपले सीनिअर केंब्रिज शिक्षण पुरे केलं होते , त्यात लॅटिन हा पण विषय होता.
पुढे त्यांनी भाला फेक , गोळा फेक आणि अन्य खेळावर लक्ष केंद्रित केले. त्यांची १९३६ साली बर्लिन ऑलम्पिक साठी निवड करण्याचेही चालले असतानाच त्यांना कोलकाता यथे आपल्या बहिणीची तब्येत बिघडल्यामुळे जावे लागले. तिथे त्यांचे कौटुंबिक मित्र पृथ्वीराजकपूर भेटले. पृथ्वीराजकपूर यांनी तिथे त्यांची ओळख सुप्रसिद्ध सिनेदिग्दर्शक देवकी बोस याच्याबरोबर करून दिली. सिंगसाहेबांचे व्यक्तिमत्व पाहून त्यांनी त्यांना ‘ सुनहरा संसार ‘ या चित्रपटासाठी ऑफर दिली , त्यात त्यांनी एका डॉक्टरची भूमिका केली होती , ते साल होते १९३६ .
कोलकत्यात हवाई डाकू , अनंताश्रम , विद्यापती ह्या चित्रपटात त्यांनी कामे केली त्यांनतर चित्रपट दिग्दर्शक ए . आर कारदार त्यांना मुबंईत घेऊन आले. हळूहळू त्यांचे चित्रपटसृस्ष्टीत बस्तान बसू लागले. त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेललेले नव्हते परंतु आपल्या भूमिकेसाठी जीव तोडून मेहनत करत असत . ‘ इन्स्पेक्टर ‘ या चित्रपटात ते व्हिक्टोरिया ड्राईव्हर ची भूमिका करत होते त्यावेळी त्यांनी अनेक व्हिक्टोरिया ड्राईव्हरशी चर्चा केली होती , ते कसे वावरतात याचा अभ्यास केला , ते त्यासंबंधी सर्वकाही शिकले आणि मग त्यांनी ती भूमिका केली. त्यानंतर आलेल्या ‘ बागबान ‘ या चित्रपटामुळे ते खूप गाजले ते त्याच्या खलनायकी भूमिकेमुळे . तो चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट ठरला . राजकपूरच्या चित्रपटातून त्यांनी कामे केली होती. त्यांनी ‘ आवारा ‘ या चित्रपटात काम केले होते , ‘ आवारा ‘ ने रशियामध्ये खूप लोकप्रियता मिळवली होती. त्यावेळी के. ऐन . सिग असे एकटे होते की त्या चित्रपटातील सर्व संवाद रशियन भाषेत त्यांनी स्वतःच्या आवाजात ‘ डब ‘ केले होते बाकी सर्वाना दुसऱ्यांचा आवाज दिलेला होता.
के. ऐन . सिंग यांचे भेदक डोळे , त्यांची संवादफेक , खलनायकी ढंग इतका प्रसिद्ध झाला की ते कधी कुणाच्या घरी गेले तर त्याच्यासाठी पटकन दरवाजा उघडला जात नसे , कुणाकडे समारंभास गेले की त्याच्याशी आलेल्या स्त्रिया त्यांना बघून घाबरत. ते म्हणतात की माझ्या खलनायकी भूमिकेमुळे स्त्रिया खूप घाबरत. मी एकदा माझ्या मित्राकडे काही कामानिमित्त गेलो असताना , त्याच्या दाराची बेल वाजवली , एका स्त्रीने पडदा बाजूला करून मला बघीतले आणि ती भीतीने घाबरून आतल्या खोलीत पळून गेली. अर्थात ही त्याच्या अभिनयाची पोच पावतीच होती असे म्हणावे लागेल.
१९३६ ते १९६० या कालखंडात ते सर्वात ‘ लोकप्रिय ‘ खलनायक झाले. त्यांनी सिंकदर , ज्वार-भाटा …( ज्वार -भाटा हा दिलीपकुमारचा पहिलाच चित्रपट होता.) , हुमायून , आवरा , जाल , सी. आय . डी. , हावडा ब्रिज , चलती का नाम गाडी , आम्रपाली, इव्हीनींग इन पॅरिस हे चित्रपट आले.
ते नेहमी ‘ व्हाईट कॉलर ‘ सभ्य खलनायकी भूमिका करायचे , सूट घातलेले , तोंडात पाईप आणि थंड भेदक नजर ही त्यांच्या भूमिकेचे वैशिष्ट्ये होती.
त्यांनी सुमारे ६० ते ६५ चित्रपटातून कामे केली. मंझिल , वो कौन थी , मेरे हुजूर , दुश्मन , मेरे जीवन साथी , दो चोर , रेश्मा और शेरा , किंमत , लोफर , हमराही अशा अनेक चित्रपटातून कामे केली . त्यांनी झूठा कही का , हाथी मेरे साथी , मेरे जीवन साथी आणि लोफर यामध्ये महत्वाची कामे केली. त्यानांतर त्यांनी चित्रपटात कामे केली ती मोजक्याच सीन मध्ये.
त्यांचे भेदक डोळे हळूहळू अधू व्हायला लागले आणि पुढे त्यांना दिसेनासे झाले. मी त्यांना मुबईला नरीमन पॉईंटला समुद्राच्या काठावरील कट्ट्यावर बसलेले असताना पाहिले , तिथे कोणतातरी कार्यक्रम होता . तेव्हा त्यांच्याशी बोलता बोलता त्यांची स्वाक्षरी घेतली , त्यांना दिसत नव्हते , पण त्याच्या हाताला धरून मी त्याची स्वाक्षरी घेतली. गप्पा चालू असताना लांबून अमरीश पुरी येताना दिसले . त्याच्या भोवती गर्दी होती. मी सिग साहेबाना सांगितले अमरिश पुरी आलेत तशी ते मला म्हणाले त्याला तू घेऊन ये, तू फक्त त्याला माझे नाव सांग. मी त्या गर्दीत अमरीश पुरीना गाठले त्यांना सिग साहेब बोलावत आहेत हे सांगितले, सगळे सोडून अमरीश पुरी माझ्याबरोबर आले मग त्यांच्या आणि सिग साहेबांच्या गप्पा सुरु झाल्या.
सिंग साहेबाना मुलबाळ नव्हते , त्यांनी दोन मुलांना दत्तक घेतले होते. त्याच्या पत्नीचे नाव होते परवीन पॉल .
ते तबस्सुमला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणतात , ‘ माझ्या ह्या किंग्जसर्कलच्या घरात ही खुर्ची आहे ना तिथे माझा मित्र बसत असे त्याचे नाव होते मोतीलाल , आणि त्याच्या बाजूच्या खुर्चीवर बसत असे पृथ्वीराज , एक खुर्ची सोडून जी खुर्ची आहे ना तिथे बसायचा माझा मित्र पहाडी सन्याल , आणि त्या खडकीच्या जवळ जी खुर्ची आहे ना तिथे बसायचा माझा खूप आवडता मित्र के. एल . सैगल . आमच्या अशा अनेक सुंदर संध्याकाळ येथे आम्ही घालवल्या , पण अफसोस सर्वजण एकामागोमाग ही दुनिया सोडून निघून गेले . राहिल्या त्या खुर्च्या आणि आठवणी . आता मी फक्त वाट बघतो घराची घंटी कोणी वाजवते का , कोणी फोन करते का, पण कोणतीच घंटी वाजत नाही ‘ .
…आणि मृत्यूने घंटी वाजवली ३१ जानेवारी २००० रोजी . त्याचे किंग्जसर्कल , मुंबई येथे त्यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
लेख चांगला आहे – आभार