चिंतामणी गोविंद पेंडसे म्हणजे ‘ मामा पेंडसे ‘ यांचा जन्म २८ ऑगस्ट १९०६ रोजी सांगली येथे झाला. साधी रहाणी असलेले मामा नट झाले ते परिस्थेतीमुळे. घरच्या अत्यंत अरिबीमुळे त्यांचे शिक्षण जेमतेम सातवी इयत्ती पलीकडे जाऊ शकले नाही. आपल्या कुटुंबासाठी चार पैसे मिळावेत म्ह्णून त्यांना काम करणे भाग पडले. त्यांना पैंटिंगची आवड होती. ते शिकण्यासाठी सांगलीच्या गायकवाड पेंटरकडे ते शिकण्यास जात. पुढे गायकवाड ‘किर्लोस्कर नाटक मंडळीत’ पेंटर म्हणून राहिले. त्यांच्याबरोबर मामाही गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पैंटिंगचे शिकण्याचे काम चालू होते. पडेल ते काम मामा तेथे करत असत. एकदा किर्लोस्कर नाटक मंडळी सातारा येथे गेली असता तिथे त्यांच्या ‘ राजरंजन ‘ या नाटकातील नट प्रयोगाच्या दिवशीच आजारी पडला. कंपनीचे मालक नानासाहेब चाफेकर यांच्या समोर प्रश्न पडला आता हे काम कोणाला द्यावे, काम महत्वाचे होते हैदरअलीचे. त्यामुळे कोणीही पुढे येईना. चिंतामणी गोविंद पेंडसे नावाचा गडीमाणूस वेळोवेळी नकला करत असतो, तर कधी पात्रांचे हुबेबुब आवाज काढून ओरडत असतो हे चाफेकरांना माहीत होते. त्यांनी मामा पेंडसे याना विचारले ‘ तू आज रात्री हैदरअलीचे काम करशील का ? ‘ मामांनी बेदरकारपणे होकार दिला. त्यांनी ते काम केले आणि संधी मिळाली तर काम करीन असेही सांगितले.
त्यांनी लहान लहान भूमिका केल्या. परंतु ते ‘ गडीमाणसातच ‘ राहिले. ‘ राक्षसी महत्वाकांक्षा ‘ ह्या नाटकासाठी गोव्यात मुद्दाम दत्तोबा भोसले यांना आणले ते केशवराव भोसले यांचे बंधू होते. त्यावेळी ‘ कंदन ‘ ची भूमिका मामांना आयत्या वेळी करावी लागली. मामांचे काम पाहून दत्तोबा भोसले इतके खूष झाले की त्यांनी मामांना आनंदाने खांद्यावर घेऊन रंगपटात नेले. अखेर मामांची रवानगी नाट्यमंडळीत झाली. त्यांना नट म्ह्णून मानाचे स्थान मिळाले. मग मामांनी कामाचा धडाका सुरु केला. शारदा, श्रीमंत, राक्षसी महत्वाकांक्षा, चंद्रग्रहण, पुण्यप्रभाव, संशयकल्लोळ ह्यासारख्या अनेक नाटकातून भूमिका केल्या. मालवण मध्ये शहाशिवाजी या नाटकात मामांनी ‘रणदुल्लाखानची’ ची सुरेख भूमिका केले की त्यांचा पगार आठ रुपयांवरून तीस रुपयांवर गेला.
पुढे १९२९ मध्ये किर्लोस्कर नाटक मंडळी बंद पडली आणि मामा ‘समर्थ’ नाटक मंडळीत आले तिथे त्यांना केशवराव दाते यांचा फायदा झाला. मामांना जे काही यश पुढे मिळाले त्याचे श्रेय मामांच्या मेहनतेकडे जातेच तितकेच केशवराव दाते यांनी त्यांना दिलेल्या नाट्यदृष्टीकडे जाते. समर्थ नाटक मंडळी नंतर ते ‘ बळवंत नाटक मंडळी ‘ मध्ये आले. दीड वर्षानंतर ते ‘बळवंत’ मधून बाहेर पडले. त्यांनतर बोलपटाचा जमाना सुरु झाला.
पुढे १९४२ साली त्यांनी दुधाचा धंदा सुरु केला. गोरेगावहून दूध आणायचे आणि दादरमध्ये घरोघरी पोहचवायचे. खूप कष्ट करत, पण नाटक त्यांना स्वस्थ बसून देत नव्हते. १९४२ साली भालचंद्र पेंढारकरांनी ‘ललितकलादर्श’ चे पुनरुज्जीवन केले. तेव्हा मामांचे तेथे हार्दिक स्वागत झाले. ‘सत्तेचे गुलाम’ आणि ‘हाच मुलाचा बाप’ ह्या दोन नाटकांमधून भूमिका करू लागले.
एकीकडे नाटक तर दुसरीकडे दुधाचा धंदा हे उरकता उरकता त्यांचा दम निघायचा पण त्यांनी तालमी कधी चुकवल्या नाहीत. त्यांची झुंझारराव मधील खलनायकाची भूमिका गाजली, ती भूमिका पूर्वी केशवराव दाते करत असत. मामा पेंडसे यांच्या वाट्याला खलनायकी भूमिका जास्त आल्या. मामा पेंडसे यांची स्वच्छ वाणी, स्पष्ट उच्चार, वैशिष्ट्यपूर्ण शब्दफेक, खानदानी विचार आणि निर्व्यसनीपणा हे त्यांचे महत्वाचे गुण होते. त्यांनी बेबंदशाही नाटकात खंडोजी, संभाजी आणि कब्जी ह्या तीनही भूमिका केल्या होत्या. खडाष्टक मध्ये रागोपंत, वारोपंत आणि कर्कराव ह्या तीन भूमिका केल्या होत्या. तर भावबंधनमध्ये घनश्याम, धनेश्वर आणि धुंडीराज या तीन भूमिका केल्या होत्या.
मामा पेंडसे यांनी शारदा, पुण्यप्रभाव, शहाशिवाजी, राजसंन्यास, सत्तेचे गुलाम, केशवकाका, विद्याहरण, दुरितांचे तिमीर जावो, पंडितराज जगन्नाथ, कुलवधू, तुझे आहे तुजपाशी, नाटककाराच्या शोधात सहा पात्रे या नाटकातून भूमिका केल्या. मामा पेंडसे स्वतः जुन्या पठडीत वाढलेले असले तरी त्यांना नावीन्याचे मुळीच वावडे नव्हते. नाट्यक्षेत्रात नव्या प्रवाहाचे त्यांनी नेहमी स्वागतच केले. त्यांनी इंडियन नॅशनल थिएटरच्या ‘ साक्षीदार ‘ या नाटकातही हौसेने काम पत्करून नवविचाराच्या तरुणाशी सहकार्य केले होते. मामा पेंडसे यांना आम्ही कॉलेजमध्ये असताना ठाण्यात अनेक वेळा बघायचो, ते ठाण्यात रहात असत. कधी कधी एखाद्या कार्यक्रमात ते स्टेजवरून स्वगत संवाद म्ह्णूनही दाखवत. त्यांचे ते संवाद अनेक वेळा मी आणि ठाणेकरांनी आइकले आहेत.
मामा पेंडसे यांना १९६६ साली विष्णुदास भावे सुवर्णपदक सन्मानाने दिले, तर १९६७ मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतर्फे सुवर्णपद दिले.
अशा जुन्या-नव्याची नाळ जोडणाऱ्या रंगकर्मी मामा पेंडसे यांचे १२ जानेवारी १९९१ मध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply