राजाराम दत्तात्रेय परांजपे यांचा जन्म २४ एप्रिल १९१० रोजी मिरज यथे झाला , त्यांचे बालपण पुण्यात गेले. त्यांना शालेय शिक्षणाची जास्त आवड नव्हती म्हणून लहान वयातच ते रंगभूमीकडे आकर्षित झाले. शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनामधील माधवराव जोशी यांच्या एका नाटकात त्यांनी विनोदी भूमिका केली होती ती सर्वाना आवडली . राजाभाऊ जेव्हा चित्रपटक्षेत्रात आले तो जमाना मूकपटाचा होता , त्यांनी ह्या क्षेत्रात प्रवेश मिळवला तो मूकपटाना संगीत देण्याच्या निमित्ताने . परंतु ते तरुण असल्यामुळे पडद्यावरील उत्तमोत्तम पात्रे पाहून ते भारावून जात आणि त्यातूनच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली . राजाभाऊ यांनी एस . व्ही. वर्तक यांच्या ‘ लपंडाव ‘ नाटकात ‘ वाटाणे ‘ नावाचे विनोदी पात्र रंगवले होते.
राजा परांजपे यांनी १९३५ मध्ये बाबूराव पेंटर यांच्या ‘ सावकारी पाश ‘ मध्ये आपली पहिली चित्रपटामधील भूमिका केली होती. त्यानंतर राजाभाऊ यांनी बाबूराव पेंटर यांच्याच १९३७ साली प्रदर्शित झालेल्या ‘ प्रतिभा ‘ या चित्रपटात चकण्या मंडूकचे काम केले होते. या चित्रपटात केशवराव दाते आणि दुर्गा खोटे यांच्याही भूमिका होत्या. त्यानंतर १९४० मध्ये भालजी पेंढारकर यांच्या ‘ गोरखनाथ ‘ या चित्रपटात राजाभाऊ परांजपे यांचा विनोदी ‘ भोलेनाथ ‘ खूप गाजला , आणि या चित्रपटात त्यांनी दोन गाणीही गायली. चित्रपटांमध्ये काम करत असताना निर्मितीच्याबाबतीत त्यांची जिज्ञासा जागृत झाली आणि म्हणूनच त्यांनी भालजी पेंढारकर आणि मा . विनायक यांच्या चित्रपटांसाठी दिग्दर्शन सहाय्य केले . राजा परांजपे हे हुरहुन्नरी होते ते सायकलींवर कसरत करायचे , पत्यांची जादू करायचे हे फारच कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा अभिनय हा नैसर्गिक होता. अभिनेता सचिन यांच्या मते राजाभाऊ यांच्याकडे अनेक उत्तम गुण होते परंतु त्यांच्याकडे आणखी एक गुण होता तो म्हणजे ‘ विद्यार्थी गुण , विद्यार्थी वृत्ती ‘ .
राजा परांजपे यांनी १९४७ साली ‘ बलिदान ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. तर त्यानंतर आलेल्या त्यांचा ‘ जिवाचा सखा ‘ हा चित्रपट खूप गाजला. ह्या चित्रपटाचे निर्माते होते वामनराव कुलकर्णी आणि विष्णुपंत चव्हाण. या चित्रपटाने ग. दि. माडगुळकर , सुधीर फडके आणि राजा परांजपे यांना एकत्र आणले. पुढे या तिघांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले.
१९५० साली आलेल्या ‘ पुढचं पाऊल ‘ या चित्रपटात ग. दि. माडगूळकर आणि पु. ल. देशपांडे यांनी भूमिका केल्या होत्या. त्या चित्रपटात राजाभाऊ यांनी कोकणी चिपळूणकर ची भूमिका केली होती. ती त्यांची भूमिका खूप गाजली. राजाभाऊंचा पेडगावचे शहाणे , लाखाची गोष्ट हे चित्रपट खूप गाजले. करदार स्टुडिओने पेडगावचे शहाणे या चित्रपटावरून ‘ चाचा चौधरी ‘ हा हिंदी चित्रपट तयार केला. राजाभाऊंच्या ‘ ऊनपाऊस ‘ या चित्रपटामध्ये त्यांचा अभिनय आणि दिग्दर्शन अत्यंत उत्तम झाले. १९५५ साली त्यांचा ‘ गंगेत घोडं न्हालं ‘ हा फार्सिकल चित्रपट आला.
राजाभाऊ परांजपे यांनी १९५९ मध्ये ‘ बाप-बेटे ‘ या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, ह्या चित्रपटात , अशोककुमार , श्यामा , कन्हैयालाल यांच्या भूमिका होत्या, ह्या चित्रपटात रमेश देव यांनी भूमिका केली होती आणि हा रमेश देव यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. त्याचप्रमाणे अभिनेता सचिन म्हणजेच सचिन पिळगांवकर या नटाच्या कारकिर्दीची सुरुवात त्याच्या वयाच्या ४ थ्या वर्षी राजा परांजपे यांनी करून दिली त्या चित्रपटाचे नाव होते ‘ हा माझा मार्ग एकला ‘
१९६० साली राजाभाऊ परांजपे यांनी निर्मिती आणि दिग्दर्शित केलेला ‘जगाच्या पाठीवर ‘ हा चित्रपट आला . ह्या चित्रपटात राजाभाऊ यांनी प्रमुख भूमिकाही केली होती . ह्या चित्रपटामुळे राजाभाऊ , ग .दि. माडगूळकर आणि सुधीर फडके पुन्हा एकत्र आले आणि ह्या चित्रपटाने इतिहास घडवला या चित्रपटाची कथा राजाभाऊ यांचीच होती . या चित्रपटातील गाणी , सवांद , संगीत सर्व काही अप्रतिम होते. आजही हा चित्रपट आणि त्यातील गाणी कुणीही विसरू शकले नाही. त्यानंतर राजाभाऊ यांचा सुवासिनी हा चित्रपट आला त्याचे दिग्दर्शन राजाभाऊ यांनी केले होते. १९६३ मध्ये बिमल रॉय यांच्या ‘ बंदिनी ‘ या चित्रपटात राजाभाऊ यांनी उतारवयातील पोस्टमास्तरची भूमिका केली होती.
चार्ली चॅप्लिन यांच्या ‘ द किड ‘ या चित्रपटावर आधारित त्यांनी ‘ हा माझा मार्ग एकला ‘ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते आणि त्या चित्रपटात नायकाची भूमिका केली होती ती विग लावून , त्यावेळी राजाभाऊ यांचे वय होते ५३. हा त्यांचा चित्रपट खूप लोकप्रिय झाला आणि त्या चित्रपटावरून राज खोसला यांनी ‘ मेरा साया ‘ हा चित्रपट काढला आणि त्याशिवाय त्याच्या तमिळ आणि तेलगू भाषेतही आवृत्या निघाल्या.
राजाभाऊ यांनी ‘ आधार ‘ नावाचा वेगळा चित्रपट काढला त्या चित्रपटामध्ये एक वृद्ध माणूस आणि तरुण मुलगी यांच्यामधील प्रेमाचा नाजूक दुवा दाखवून दिला होता. राजाभाऊ यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर त्यांनी काही मराठी आणि हिंदी चित्रपटातून भूमिका केल्या.
राजा परांजपे यांनी पेडगावचे शहाणे , लाखाची गोष्ट , जगाच्या पाठीवर हे चित्रपट निर्माण केले. त्याचप्रमाणे २९ चित्रपट दिग्दर्शित केले त्यामध्ये आधार , काका मला वाचवा , गुरुकिल्ली , Love and Murder , पडछाया , पाठलाग , बायको माहेरी जाते , हा माझा मार्ग एकला , सोनियाची पाउले , आधी कळस मग पाया , सुवासिनी यांचा समावेश आहे. राजा परांजपे यांनी ४० वर्षात ८० चित्रपटांमधून भूमिका केल्या.
राजाभाऊ यांचे शिष्य राजदत्त यांनी १९७५ साली दिग्दर्शित केलेल्या ‘ या सुखांनो या ‘ चित्रपटात त्यांनी शेवटची भूमिका केली.
राजा परांजपे यांना दोन राष्ट्रीय आणि चार राज्य पुरस्कार मिळाले.
राजा परांजपे यांचे ९ फेब्रुवारी १९७९ रोजी पुण्यात निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply