शाहू रामकृष्ण मोडक यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी अहमदनगर येथे झाला. मूळचे ते कोकणस्थ ब्राह्मण परंतु त्यांचे पणजोबा रामकृष्ण यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. शाहू मोडक यांचे वडील अहमदनगरच्या चर्चमध्ये रेव्हरंड म्ह्णून काम करत होते. रामकृष्णपंत नाताळाच्या सणानिमित्त होणाऱ्या उत्सवात ख्रिस्तपुराणातील कथा-विषयांवर आधारित नाटकांमधून भूमिका करत असत , त्याचप्रमाणे त्यावर कीर्तनही करत असत.
खरे तर शाहू मोडक यांना अभिनयाचे त्यांच्या शिक्षण घरातूनच मिळाले. पुढे पूना गेस्ट हाऊस चे मालक आणि दिग्दर्शक असलेल्या नानासाहेब सरपोतदार यांनी ‘ श्यामसुंदर ‘ चित्रपटातील लहान श्रीकृष्णाचे काम करण्यासाठी दादा तोरणे यांना मोडक यांच्या नावाची शिफारस केली होती.
१९३२ मध्ये आलेला ‘ श्यामसुंदर ‘ हा शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट खूपच गाजला मुंबईच्या थिएटर मध्ये सतत २७ आठवडे चालून रोप्यमहोत्सव करणारा तो अखंड भारतातील पहिला चित्रपट होता. त्यात शाहू मोडक यांनी गायलेले ‘ भावे वरिता गोसेवेला ‘ हे गीत खूपच गाजले आणि वऱ्हाड प्रांतातील शालेय क्रमिक पुस्तकात ते गीत समाविष्ट केले. त्यांचा दुसरा चित्रपट होता ‘ औट घटकेचा राजा ‘ . तर त्यांचा तिसरा चित्रपट ‘ प्रिन्स अँड पॉपर ‘ या इंग्रजी कादंबरीवर आधारलेला होता त्याचे नाव होते ‘ आवारा शहजादा ‘ त्यात त्यांनी दुहेरी भूमिका केली होती . ह्या चित्रपटामुळे शाहू मोडक यांना भारतीय बोलपटातील सर्वप्रथम दुहेरी भूमिका करण्याचा मान मिळाला.
त्यांचा आवाज आणि दिसणे यावर त्यांना चागले चित्रपट मिळत असत. त्यांनी सेवासदन या चित्रपटात काम केले हा चित्रपट मुन्शी प्रेमचंद यांचा कथेवरून केलेला होता. त्याचवेळी त्यांनी ‘ बुलबुले पंजाब ‘ ह्या चित्रपटात काम केले . ह्या दोन्ही चित्रपटाच्या नायिका होत्या ‘ झुबेदा ‘. त्या काळात तीन मराठी नायक प्रमुख होते मा. विट्ठल , बाबालाल नांद्रेकर आणि माधव काळे आणि त्यांच्यामध्ये आता शाहू मोडक यांची भर पडली.
कोल्हापूर सिनेटोन हा कोल्हापूरचे श्रीमंत राजाराम महाराज यांचा स्वतःचा स्टुडिओ होता. त्यांनी शाहू मोडक यांना घेऊन हिंद महिला आणि होनहार हे दोन चित्रपट काढले. ‘ होनहार ‘ हा चित्रपट गजाजन जागीरदार यांनी दिग्दर्शित केला होता.
त्यांनी त्यानंतर अनेक चित्रपटात कामे केली . त्यांचे प्रभातचे ‘ माणूस ‘ आणि ‘ आदमी ‘ हे मराठी हिंदी चित्रपट निघाले . या चित्रपटातून ‘ बिल्ला क्रमांक ३३३ ‘ असणाऱ्या गणपत शिपायाची भूमिका खूपच गाजली. त्यांचा ‘ संत ज्ञानेश्वर ‘ हा चित्रपट न्यूयॉर्क मध्ये कार्नोजी हॉल थिएटरमधून दाखवण्यात आला. त्याची फ्रॅंक काप्रासारख्या जगद्विख्यात दिग्दर्शकाने प्रशंसा केली होती , अमेरिकेत दाखवला गेलेला हा पहिला मराठी चित्रपट होता.
प्रभात चित्रपट संस्थेशी केलेला करार संपल्यावर शाहू मोडक यांनी प्रकाश पिचर्सच्या ‘ भरत भेट ‘ , ‘ भरत मिलाप ‘ चित्रपटात भरताची भूमिका केली. हा चित्रपट देशभर गाजला. त्यानंतर त्यांनी वाडिया म्हुव्हिटोनचा ‘ शोभा ‘ हा चित्रपट केला त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते कुमारसेन समर्थ आणि नायिका होती शोभना समर्थ . त्याला वसंत देव यांनी संगीत दिले होते.
आचार्य अत्रे यांनी ‘ वसंतसेना ‘ नावाचा चित्रपट काढला त्यात शाहू मोडक होते. त्यांनी कारदार यांच्या ‘ कानून ‘ आणि ‘ गीत ‘ या चित्रपटात कामे केली . महासती अनुसूया , पहिली मंगळागौर , लढाई के बाद , देवकी बोस यांचा ‘ मेघदूत ‘ , भालजींचा ‘ महारथी कर्ण ‘ , मा. विनायक यांचा ‘ मंदिर ‘ अशा चित्रपटातून त्यांनी कामे केली. बदामी यांनी निर्माण केलेल्या ‘ उत्तरा-अभिमन्यु ‘ या चित्रपटात त्यांच्याबरोबर शांता आपटे आणि अशोककुमार होते. त्या चित्रपटात त्यांनी कृष्णाची भूमिका केली होती. त्या भूमिकेमुळे त्यांना राम आणि कृष्ण असेलेले पौराणिक चित्रपट येऊ लागले. त्यांनी सुमारे १०० हुन अधिक चित्रपटातून राम आणि कृष्णाची कामे केली.
पुढे ते चित्रपटातून निवृत्त झाले आणि पुण्यास रहावयास गेले.
शाहू मोडक यांचे ११ मे १९९३ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply