सूर्यकांत उर्फ वामन तुकाराम मांढरे यांचा जन्म २ जून १९२६ त्यांच्या आईचे नाव तानूबाई असे होते. त्यांचे आई वडील हे कडक शिस्तीचे होते. ते टोप्या आणि अत्तर विकायचे . त्यांचे बंधू चंद्र्कांत उर्फ गोपाळ मांढरे हे देखील उत्तम कलाकार होते. ह्या दोन्ही बंधूंचे बालपण त्यांच्या वडिलांच्या कडक शिस्तीखाली गेले. सूर्यकांत मांढरे यांनी सुरवातीला सरस्वती विद्यालय आणि हरिहर विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांना व्यायामाची आवड होतीच त्यामुळे त्यांची अंगकाठी मजबूत होती. त्यांचे व्यक्तीमत्व चारचौघात उठून दिसत होते. एकदा त्यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी पाहिले आणि १९३८ साली त्यांना ‘ ध्रुव ‘ या चित्रपटामध्ये काम दिले त्यावेळी त्यांचे वय फक्त १२ वर्षे होते. सूर्यकांत मांढरे यांचा हा पहिला चित्रपट होता. त्यांचा ओढा कलेकडे असल्यामुळे १९४३ साली त्यांनी आपले शिक्षण थांबवले आणि बाबा गजबर या सुविख्यात चित्रकाराकडे शिकू लागले. हे चित्रकलेचे शिक्षण चालू असताना सूर्यकांत यांनी भालजी पेंढारकर यांच्या शिवचरित्रावर आधारलेल्या ‘ बहिर्जी नाईक ‘ या चित्रपटामध्ये बालशिवाजीची भूमिका केली. या चित्रपटाच्या नामावलीत त्यांचे नाव ‘ सूर्यकांत ‘ असे भालजी पेंढारकर यांनी ठेवले. त्यानंतर ते याच नावाने पडद्यावर दिसू लागले.
त्यांच्या भक्कम शरीरयष्टीमुळे त्यांनी ग्रामीण बाजाच्या भूमिकांना योग्य तो न्याय दिला. साधारणतः दोन तीन चित्रपटानंतर त्यांनी २६ डिसेंबर १९४७ रोजी सुशीला पिसे यांच्याशी विवाह केला. पुढच्या संपूर्ण आयुष्यात त्यांच्या पत्नीने त्यांना साथ दिली.
१९५० साली सूर्यकांत यांनी राजा नेने यांच्या ‘ केतकीच्या बनात ‘ या चित्रपटामध्ये ‘ सर्जेराव ‘ ची रंगेल भूमिका केली या चित्रपटाला त्यावेळी चित्रपट महामंडळाकडून ‘ फक्त प्रौढांसाठी ‘ असे सर्टिफिकेट मिळाले. असे ‘ फक्त प्रौढांसाठी ‘ असे सर्टिफिकेट मिळालेला हा पहिला मराठी चित्रपट होता.
सूर्यकांत मांढरे यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीमध्ये नायक, खलनायक, सहाय्यक अभिनेते, चरित्र भूमिका, पाहूणा कलाकार तर काही चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका केल्या. त्यांच्या बहुतेक भूमिका ग्रामीण बाजाच्या होत्या त्यामुळें त्यांना महाराष्ट्रात अमाप प्रसिद्धी मिळाली कारण शहरी भागापेक्षा तसे पाहिले तर ग्रामीण भाग खूपच मोठा आहे.
सूर्यकांत मांढरे यांनी स्त्री जन्मा तुझी कहाणी, गृहदेवता, बाळा जो जो रे, या चित्रपांमधून त्यांनी वेगळ्या बाजाचीही भूमिका केल्या. जयश्री गडकर यांच्याबरोबरची चित्रपटामधली त्यांची जोडी अतिशय लोकप्रिय झाली. त्यांचे उषाकिरण आणि सुलोचना यांच्याबरोबरचेही चित्रपट नावाजले गेले.
‘ शिकलेली बायको ‘ ह्या चित्रपटामधील त्यांची ‘ रघुनाथ ‘ ची भूमिका खूप गाजली. तर ‘ साधी माणसं ‘ या चित्रपटामधील रंगभूषेशिवाय केलेला ‘ शंकर लोहार ‘ आजही लोकांना आठवत आहे. त्यांचा ‘ सांगते ऐका ‘ हा चित्रपट तर गाजलाच परंतु त्यांच्या ‘ कन्यादान ‘ ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी सूर्यकांत ह्यांना १९६० साली महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. सूर्यकांत हे वेळ पाळणारे आणि निर्व्यसनी होते. त्यांचे बंधू चंद्र्कांत यांनी दोघे मिळून १४ चित्रपटांमध्ये काम केले. १९६५ साली ‘ मल्हारी मार्तंड ‘ या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस मिळाले.
मराठी चित्रपट सृष्टीतील सूर्यकांत यांनी अनेक चित्रपटातून शिवाजी राजांची अजरामर भूमिका साकारली यांच्या भूमिकेतून प्रेरणा घेऊन दक्षिणेत एन टी रामाराव,शिवाजी गणेशन,करुणानिधी यांनी तेथील भाषेत राजांची भूमिका साकारली या भूमिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळवून दक्षिणेकडील स्टार नेते बनले . पण दुर्दैवची बाब आहे की ज्यांनी ही शिवरायची भूमिका अजरामर केली .ते सुर्यकांत मांढरे आजच्या पिढीला अज्ञात आहेत .ज्यांच्या अभिनयातून आणि त्यांच्या शरीराच्या ठेवणीतून संपूर्ण महाराष्ट्राला आपले आराध्य शिवप्रभू पाहता आले, आजही अनेक बऱ्याच ठिकाणी शिवरायांचे तैल चित्र हे सुर्यकांत यांच्या रूंपात रंगवलेले पहावयास मिळते, कारण त्यांच्या अभिनयामुळेच त्यांनी शिवराय अगदी हुबेहूब जिवंत केले आणि १९०० शतकात आपल्याला प्रत्यक्ष शिवप्रभू अनुभवता आले. गनिमी कावा, स्वराज्याचा शिलेदार अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा उभी केली. शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत असताना त्यांनी चित्रपटामधील दृश्यात डमी कलाकार न वापरता, घोडेस्वारीची जीवावर बेतणारी दृश्ये मेहनत करून केली. ‘ रत्नघर ‘ या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी वाघाबरोबर झुंजीची प्रत्यक्ष दृश्येही दिली. त्यांचा ‘ वारणेचा वाघ ‘ हा चित्रपटही गाजला. सूर्यकांत यांनी १९७८ साली ‘ ईर्षा ‘ या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शनही केले आणि त्या चित्रपटाचे पटकथा लेखनही केले.
सूर्यकांत यांनी भालजी पेंढारकर अनंत माने, दत्ता माने, कमलाकर तोरणे, अनंत ठाकूर, गजानन जागीरदार अशा नामवंत दिग्दर्शकाकडे काम केले.
त्यांनी पाच ऐतिहासिक, अकरा सामाजिक, आणि वीस ग्रामीण नाटकांमधून कामे केली. बेबंदशाही, झुंझारराव, दिल्या घरी तू सुखी रहा, लग्नाची बेदी, तुझे आहे तुजपाशी, पाठलाग, दसरा उजाडला, सोळावं वरीस धोक्याचं, तुम्हावर केली मी मर्जी बहाल अशा कितीतरी नाटकांचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात केले.
सूर्यकांत मांढरे यांनी आपला चित्रकलेचा चांद जोपासला . चित्रकलेत त्यांनी पावडर शेड आणि मानवी चित्रे ह्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांनी कोल्हापूरमध्ये राजाराम आर्ट गॅलरी आणि चित्रनगरी व्हावी यासाठी खूप प्रयत्न केले. ते आपली दैनंदिनी लिहून ठेवत असत, बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रोत्साहन दिल्यामुळे त्यांनी ‘ धाकटी पाती ‘ हे स्वतःचे आत्मचरित्र लिहिले . त्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला त्याचप्रमाणे त्यांनी कोल्हापुरी साज आणि कलामहर्षी बाबुराव पेंटर ( विश्वकर्मा ) या दोन पुस्तकाचे लेखन केले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले.
१९७३ साली त्यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला, तर १९९० साली त्यांना ‘ महाराष्ट्र गौरव ‘ पुरस्कार मिळाला.
सूर्यकांत मांढरे यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी २२ ऑगस्ट १९९९ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply