थॉमस बीच ऑल्टर यांचा जन्म २२ जून १९५० रोजी मसुरी येथे झाला. त्यांचे आजोबा-आजी १९१६ मध्ये अमेरिकेमधील ओहायो मधून रावळपिंडीमध्ये आले. त्यांच्या वडिलांचा जन्म सियालकोट यथे झाला जे आता पाकिस्तान येथे आहे. भारताच्या विभाजनानंतर त्यांच्या परिवाराचेही विभाजन झाले त्यांचे आजी-आजोबा पाकिस्तान येथे राहिले आणि त्यांचे आई-वडील भारतामधील इलाहाबाद , जबलपूर आणि सहारानपूर येथे राहिल्यानंतर शेवटी उत्तर प्रदेशामधील राजपूर येथे राहू लगले. त्यानंतर १९५४ मध्ये डेहराडून आणि मसुरी यामधील राजपूर या शहरात राहू लागले. त्यांच्या बहिणीचे नाव मार्था आणि भावाचे नाव जॉन असून जॉन एक कवी आणि शिक्षक आहे.
मसुरी मधून टॉम यांनी इतर विषयांबरोबर हिंदीचाही अभ्यास केला. त्यांचे शिक्षण मसुरीमधील वूडस्टॉक स्कुलमध्ये झाले. त्यामुळे त्यांना हिंदी बोलणारा ‘ निळ्या डोळ्याचा ‘ साहेबही म्हणत. त्यांचे वडील इलाहाबाद येथील कॉलेजमध्ये इतिहास आणि इंग्रजी शिकवत होते त्यानंतर ते सहरानपुरमध्ये एक शाळेत शिकवत होते. पुढे त्यांच्या आई-वडिलांनी राजपुरमध्ये एक आश्रम सुरु केला त्याला ‘ विशाल ध्यान केंद्र ‘ म्हणत असत. तेथे सर्व धर्माचे लोक शिकण्यासाठी आणि चर्चेसाठी येत असत.
१९५८मध्ये १८ व्या वर्षी टॉम उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. ते एक वर्ष ‘ येल ‘ येथे शिकले. परंतु तेथील शिक्षण त्यांना कठीण वाटत असल्यामुळे ते एक वर्षानंतर परत आले. १९ व्या वर्षी ते सेंट थॉमस स्कूल, जगाधरी, या हरियाणामधील एका शाळेत खेळाचे शिक्षक म्ह्णून शिकवू लागले. तेथे त्यांनी सहा महिने शिकवले. त्यांनी त्या काळात त्यांच्या विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षणही दिले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. ते परत अमेरिकेला गेले त्यांनी अमेरिकमधील एका हॉस्पिटलमध्ये कामही केले होते. जवळजवळ अडीच वर्षे ते फिरतच होते. जगधरीमध्ये असताना त्यांनी हिंदी चित्रपट बघण्यास सुरवात केली. त्यांना 1970 मध्ये आलेला राजेश खन्ना यांचा ‘ आराधना ‘ चित्रपट इतका आवडला की त्यांनी तो चित्रपट त्यांच्या मित्रांबरोबर एक आठवड्यामध्ये तीनदा पाहिला .
‘आराधना’ हा चित्रपट त्यांच्या आयुष्यामधील ‘ टर्निग पॉईंट ‘ ठरला असेच म्हणावे लागेल. कारण आराधनामुळे त्यांना चित्रपटांचे आकर्षण निर्माण झाले आणि आपणही अभिनेता व्हावे असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. हा विचार करण्यामध्ये दोन वर्षे गेली तसतसा त्यांचा विचार पक्का झाला आणि त्यांनी पुण्यामधील ‘ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया ‘ मध्ये १९७२ ते १९७४ अभिनयाचे शिक्षण घेतले. पुण्याच्या फिल्म इंस्टीट्युटमध्ये त्यांची ओळख नसरुद्दिन शहा आणि बेजामीन गिलानी या मित्रांशी झाली ते पण त्यावेळी फिल्म इन्स्टिटयूटचे विद्यार्थी होते. टॉम ऑल्टर यांनी रोशन तरनेजा यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. तेथे त्यांना स्वतःची खरी ओळख पटली. रोशन तरनेजा यांना ते अभिनयामधले गुरु मानत. ते मनोजकुमार यांनादेखील गुरु मानतात कारण क्रांती चित्रपटाच्यावेळी त्यांची मनोजकुमार यांच्याशी मैत्री झाली होती , एक वेळ अशी होती की टॉम ऑल्टर परेशान होते , पैसे नव्हते , लग्न करायचे होते . तेव्हा मनोजकुमार त्यांना म्हणाले तू यशस्वी अभिनेता बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईला आला आहेस ते मात्र विसरू नकोस ते स्वप्नच तुला बरोबर रस्ता दाखवेल.
फिल्म इन्स्टिटयूट मधून बाहेर आल्यानंतर त्यांनी रामानंद सागर यांच्या ‘ चरस ‘ या चित्रपटामध्ये एक अभिनेता म्हणून पाहिलांदा काम केले. त्यांच्या विदेशी गोऱ्या रंगामुळे सुरवातीला त्यांना इंग्रजांचे रोल मिळत होते. १९७७ मध्ये टॉम ऑल्टर यांनी त्यांचे मित्र नसरुद्दिन शहा आणि बेजामीन गिलानी यांच्याबरोबर ‘ मोटली ‘ नावाचा थिएटर ग्रुप सुरु केला आणि या गृपमधूनच त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले आणि इथूनच त्यांचा रंगभूमीवरील प्रवास सुरु झाला.
रंगभूमीवर त्यांनी मौलाना आझाद, गांधीजी , रवींद्रनाथ टागोर , बहादूरशहा जफ़र , गालिब , साहिर लुधयानवी यांचे रोल , भूमिका केल्या आहेत. टॉम ऑल्टर म्हणतात जर तुम्ही अत्यंत प्रामाणिकपणे भूमिका कराल तर समोरचा प्रेक्षक तुम्हाला स्वीकारतो. त्यांनी एक प्रसंग सांगितला जेव्हा ते फिल्म इन्स्टिटयूटमधून बाहेर आले तेव्हा काही कामानिमित्त ते दिलीपकुमार याना भेटले तेव्हा त्यांनी मोठा धाडसाने त्यांना विचारले , ‘ अच्छी एकटिंग का राज क्या है ?’ दिलीपकुमार यांनी पटकन उत्तर दिले ‘शेरो-शायरी’. टॉम ऑल्टर म्हणाले त्यांचे उत्तर त्यांना पटले कारण शेरो-शायरीची आवड टॉम यांनाही होती, त्यामुळे त्यांच्या शेरो-शायरीच्या आवडीला आणखी प्रोत्सहानच मिळाले. त्यांची कविता , शायरी यांची आवड वाढली. त्यांनी जबान संभालकें ,शक्तिमान , हातिम अशा अनेक मालिकांमधून भूमिका केल्या होता. त्याचप्रमाणे त्यांनी हिंदी इंग्रजी , असामी , भोजपुरी , बंगाली चित्रपटांमधून भूमिका केल्या होता त्यांनी हॉलिवूड चित्रपटांमधूनही भूमिका केल्या होत्या .
पूर्वी मी त्यांना अनेक नाटकांमधून बघीतले होते परंतु नुकतेच त्यांचे ‘ वेटींग फॉर द गोदो ‘ हे नाटक बघावयास मिळाले.
टॉम ऑल्टर यांनी सुमारे ३०० ते ३५० चित्रपटांमधून कामे केली. त्यांना खेळाची खूप आवड होती. विशेषतः क्रिकेट हा त्यांचा आवडीचा खेळ आहे. त्यांनी पत्रकारिताही केली. सचिन तेंडुलकरच्या आयुष्यामधली त्याची पहिली मुलखात टॉम यांनी घेतली त्यावेळी सचिन तेंडुलकर पंधरा वर्षाचा होता.
टॉम ऑल्टर यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्याचबरोबर त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले.
टॉम ऑल्टर यांचे २९ सप्टेंबर २०१७ रोजी कर्करोगाने मुंबईमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply