अभिनेत्री इंदुमती पैंगणकर उर्फ कानन कौशल यांचा जन्म २१ मार्च १९३९ रोजी झाला.
कृष्णधवल चित्रपटांच्या कालखंडात ज्या सोज्ज्वळ, सोशिक सौंदर्यवतींचा बोलबाला होता, त्या काळातील नायिकांच्या अनेक लोभस चेहऱ्या पैकी इंदुमती पैंगणकर (पूर्वाश्रमीच्या इंदुमती शेट) यांचा एक चेहरा होता. अगदी शाळेपासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. महाविद्यालयीन काळात ही आवड अधिक दृढ झाली. अर्थशास्त्र व इतिहास हे विषय घेऊन त्या एम.ए. झाल्या. याच दरम्यान महाविद्यालयातील सांस्कृतिक महोत्सवांमधून अनेक नाटकांत त्यांनी काम केले. या माध्यमातून त्यांना अभिनयाकरिता हिंदी नाटकांमधून संधी उपलब्ध झाली. ‘दो जहॉ के बीच’ या हिंदी नाटकांमध्ये इंदुमती पैंगणकर यांनी संजीवकुमार आणि लीला चिटणीस या दिग्गज कलाकारांसोबत काम केले. या नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना अनेक नाटकांसाठी विचारणा होऊ लागली. नकळतपणे अभिनयक्षेत्राची दिशा त्यांच्यासाठी नक्की झाली.
‘पहर’ या हिंदी चित्रपटाने चित्रपट क्षेत्रातील त्यांची कारकिर्द सुरू झाली. त्यानंतर ‘आशा के दीप’ या हिंदी चित्रपटातही त्यांनी एक भूमिका साकारली. दुर्दैवाने हे दोन्ही चित्रपट अपूर्ण राहिले, पण या दोन्ही चित्रपटांमुळे ‘चित्रपट’ या माध्यमाची त्यांना जवळून ओळख झाली.
फोटोजेनिक चेहरा, चेहर्यावरील लोभसवाणे आणि मृदू भाव आणि उपजत अभिनयगुण यामुळे रंगभूमी आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांमध्ये त्यांचा स्वाभाविक आणि सहज वावर होता.
‘आखरी दिन पहली रात’ या कमाल अमरोही निर्मित चित्रपटा दरम्यान कमाल अमरोही यांनी इंदुमती पैंगणकर यांना ‘कानन कौशल’ असे नाव दिले. प्रदर्शित झालेला त्यांचा पहिला हिंदी चित्रपट म्हणजे ‘मान अपमान’. राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटानंतर एकामागून एक हिंदी चित्रपट त्यांना मिळत गेले.
१९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘जय संतोषी माँ’ या चित्रपटाने त्यांना भारतभर प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटामध्ये भारत भूषण, आशिषकुमार व अनिता गुहा या सहकलाकारांबरोबरची ‘सत्यवती’ची त्यांची भूमिका खूप गाजली. एका सोशिक, सात्त्विक आणि श्रद्धाळू पत्नीची मध्यवर्ती भूमिका त्यांनी साकारली. पौराणिक कथेवर आधारित अनेक चित्रपटांसाठी इंदुमती पैंगणकर यांना निर्माता-दिग्दर्शक बोलावू लागले. याशिवाय त्यांनी ‘जय द्वारकाधीश’, ‘इतनीसी बात’, ‘जाग उठा इन्सान’, ‘भगवानदादा’, ‘बिदाई’, ‘लव मॅरेज’, ‘ये गुलिस्ताँ हमारा’, ‘जीवनदाता’ अशा अनेक चित्रपटात लहानमोठ्या भूमिका केल्या.
राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘एकटी’ (१९६८) हा इंदुमती पैंगणकर यांचा पहिला मराठी चित्रपट होता. त्यांनी ‘कार्तिकी’, ‘भोळीभाबडी’, ‘पाहुणी’, ‘मामा भाचे’, ‘लक्ष्मणरेखा’, ‘श्रद्धा’, ‘चंद्र आहे साक्षीला’ अशा तीसपेक्षा जास्त मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. हिंदी आणि मराठीव्यतिरिक्त त्यांनी सोळा गुजराथी आणि चार भोजपुरी चित्रपटांतही भूमिका केल्या.
‘घुंघट’ आणि ‘गुनसुंदरीनो घरसंसार’ या गुजराथी चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना गुजराथ सरकारचे पारितोषिक प्राप्त झाले. ‘पाहुणी’ (१९७६) या मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने त्यांचा गौरव केला. इंदुमती यांनी ‘रूपसाधना’ आणि ‘वधूचा साज’ ही सौंदर्यविषयक पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी ‘रूपसाधना’ या पुस्तकाला राज्य शासनाचे पारितोषिक मिळाले. ४० वर्षे अभिनयक्षेत्राशी निगडित असूनही त्यांनी चंदेरी दुनियेतील आपले पाऊल काढून घेतले आणि त्या आनंदाने आपले जीवन व्यतीत करीत आहेत.
— नेहा वैशंपायन.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply