कवी पी. सावळाराम यांचे ‘ जेथे सागरा धरणी मिळते…’ हे गाणे अजरामर करणाऱ्या अभिनेत्री जीवनकला.
जीवनकला म्हणजेच जीवनकला दत्तोबा कांबळे. यांचा जन्म २९ जून १९४४ रोजी पुणे येथे झाला. जीवनकला म्हटले की एक गाणे डोळ्यासमोर येते ते म्हणजे ‘ जेथे सागरा धरणी मिळते..’ हे गाणे ठाण्याचेच कवी पी. सावळाराम यांचे गाणे, ह्या गाण्याला संगीत दिले होते वसंत प्रभू यांनी तर अभिनेता विवेक यांच्याबरोबर ‘ जीवनकला ‘ यांनी त्यामध्ये अभिनय केला आहे. दत्तोबा कांबळे आणि गंगुबाई कांबळे यांची मुलगी म्हणजे जीवनकला. त्यांच्या आई गंगुबाई कांबळे यांनी एकेकाळचा मूकपटाचा काळ गाजवला होता. ‘ फिअरलेस नादिया ‘ यांचा उदय होण्यापूर्वी गंगुबाई तशाच पद्धतीने चित्तथरारक कामे करत असत. त्यामुळे त्यांच्या काळात त्या ‘ स्टंट क्वीन ‘ म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. त्यानंतर बोलपट आल्यावर त्यांनी बोलपटामधूनही कामे केली. त्यांचे वडील दत्तोपंत कांबळे हे देखील चित्रपटामध्ये कामे करत असत.
मंगेशकर कुटूंबाने सुरु केलेल्या ‘ सुरेल बाल कला केंद्र ‘ ह्यामध्ये अनेक बाल कलाकार कामे करीत त्या मंडळींमध्ये छोटी जीवनकला उत्तम नृत्य करीत असे. ह्या केंद्रामध्ये उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर,लक्ष्मीकांत कुडाळकर,प्यारेलाल शर्मा, कल्याणजी, आनंदजी, बाळ पार्टे, जयवंत कुलकर्णी, कुमारसेन गुप्ते, अरविंद मयेकर ही मंडळी होती ज्यांनी पुढे खूप नाव कमावले. तेव्हापासून त्या मंगेशकर कुटूंबातल्याच झाल्या.
१९५२ साली दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ अखेर जमलं ‘ ह्या चित्रपटामध्ये ‘ बेबी जीवनकला ‘ म्ह्णून काम केले ह्या चित्रपटामध्ये सूर्यकांत, बेबी शकुंतला, वसंत शिंदे, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी भूमिका केल्या होत्या.
त्यानंतर जीवनकला यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून ‘ नृत्यांगना ‘ म्हणून कामे केली त्याचप्रमाणे हेलन, जयश्री टी, बेला बोस अशा अनेक नृत्यांगनांच्या बरोबर न विसरता येणारी नृत्ये केली. १९६० साली त्यांनी राजा गोसावी यांच्याबरोबर ‘ संगत जडली तुझी नि माझी या चित्रपटामध्ये काम केले. त्यानंतर शेरास सव्वाशेर, सुदर्शन, काळी बायको, तो मी नव्हेच अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी कामे केली होती. राजा ठाकूर यांच्या ‘ पुत्र व्हावा ऐसा ‘ या चित्रपटामध्ये त्यांनी प्रेमभंगामुळे निराश झालेल्या प्रेयसीची भूमिका केली त्या चित्रपटामधील ‘ जेथे सागर धरणी मिळते ‘ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही लोकप्रिय आहे.
१९६८ साली त्यांचे वडील दत्तोपंत कांबळे यांनी ‘ जानकी ‘ हा चित्रपट काढला त्यामध्ये हिंदी चित्रपट ‘ दोस्ती ‘ मध्ये काम केलेल्या सुधि रकुमार यांना त्या चित्रपटाचे नायक केले होते परंतु तो चित्रपट चालला नाही. जीवनकला यांच्यावर चित्रित झालेली अनेक गाणी गाजली त्यामध्ये ‘ रेशमाच्या धाग्यांनी, साडी दिली शंभर रुपयाची, अखेरचा हा तुला दंडवत ही गाणी आजही कुणी विसरू शकले नाही. त्याचप्रमाणे त्यांनी ‘ पारसमणी ‘ या हिंदी चित्रपटामध्ये ‘ हसता हुआ नूरानी चेहरा ‘ या गाण्यावर त्यांनी नृत्य केले, ते नृत्य खूप लोकप्रिय झाले.
जीवनकला यांनी अनेक हिंदी मराठी चित्रपटांमधून कामे करून त्यांच्या आई वडिलांचा वारसा पुढे नेला, जपला. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतंत्र नृत्याचे कर्यक्रमही केले. त्यांचा विवाह सुप्रसिद्ध पटकथा-संवादलेखक राम केळकर यांच्याशी झाला. परंतु दुर्देवाने केळकर यांचे अकाली निधन झाले. त्यांनी समर्थपणे आपल्या मुलांचा सांभाळ करून त्यांना मोठे केले. त्यांचा मुलगा हेमंत हा लेखक आणि दिग्दर्शक आहे तर मुलगी मनीषा ही अभिनेत्री आहे. जीवनकला यांनी आपल्या वडिलांप्रमाणे एका चित्रपटाची निर्मितीही केली आहे.
जीवनकला यांना २०११० साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानितही केले गेले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply