रीना रॉय यांचे खरे नाव रुपा सिंह. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९५७ रोजी मुंबई येथे झाला. रीना यांचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीना रॉय यांच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही, चौथ्या अपत्याच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर ते रीनाची आई आणि आपली चारी अपत्ये सोडून चेन्नईला निघून गेले. आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने वयाच्या केवळ १३ व्या वर्षी आपल्या चेहऱ्यावर मेकअप चढवला मात्र तिने यासाठी कधीही आपल्या परिवाराला दोष दिला नाही वा आपण कुटुंबाच्या चरितार्थासाठी हे काम करतोय याची कबुली दिली नाही. ती एक जबाबदार मुलगी होती, प्रेमळ बहिण होती मात्र ती व्यवहारी तरुणी खचितच नव्हती !रॉय यांनी स्टुडीओचे उंबरठे झिझवून स्क्रीन टेस्ट देण्याचा सपाटा लावला आणि सौदर्य बी.आर.इशारांनी बरोबर हेरले. मात्र रीना रॉय यांची सुरुवात फारच वाईट झाली. बी.आर. इशारांनी त्यांना एकदम दोन चित्रपटासाठी साईन केले होते. त्यांचा ‘नई दुनिया नए लोग’ हा सिनेमा आधी फ्लोअरवर गेला, त्यात रीना रॉय यांचा नायक होता डेनि डेन्ग्झोपा! या सिनेमाची आठवण अशीही आहे की यात रेल्वेचा एक सीन होता, सारे युनिट बेंगलोरजवळील जंगलात होते आणि हा सीन महत्वाचा होता. रेल्वे दिवसातून एकदाच तिथून जायची.त्यामुळे सीन चुकला तर रिटेकसाठी दुसरा दिवस उजडायचा. दोनेक दिवस असेच गेले, तिसऱ्या दिवशी बी.आर.इशारा वैतागले ते म्हणाले आता माझे पैसे संपलेत आणि एका शॉटसाठी सगळे युनिट जंगलात आणायचे मला परवडत नाही तेंव्हा आता चूक न करता तू शॉट दिला तर माझ्यावर उपकार होतील. रीना रॉय यांचे वय तेंव्हा फक्त १४ वर्षांचे होते ! मात्र इथे ती परत संवाद विसरली, रेल्वे आणि निघून गेली. सीन तसाच राहून गेला आणि पुढे जाऊन सिनेमाही डब्यात गेला. हा सिनेमा रिलीज झालाच नाही. त्या दिवशी रीना मात्र हमसून हमसून रडली. तिने पुन्हा असं चुकायचे नाही हा निश्चय मनोमनी केला तो थेट वर दिलेल्या ‘आशा’तल्या प्रसंगापर्यंत पाळला ! याच बी.आर.इशारा यांचा १९७३ मध्ये आलेला ‘जरुरत’ या सिनेमात असेच दृश्य होते ज्यात अस्ताला जाणारया सूर्याचे दृश्य सीनच्या पार्श्वभूमीला होते. या सिनेमात तिचा नायक होता तरणाबांड देखणा (पण ठोकळा) नायक विजय अरोरा ! इथे तिने सूर्यास्त नेमका पकडला आणि तिची गाडी रांकेला लागली. पडद्यावर आलेला ‘जरुरत’ हा रीनाचा पहिला सिनेमा ठरला होता. या सिनेमातील बोल्ड दृश्यामुळे नंतर रीना ‘जरुरत गर्ल’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. जरुरतमुळे तिच्या नावापुढे रॉय कायमचे चिकटले. राजपूत रीनाचे बंगालीकरण झाले, मात्र तिने तेच नाव रिअल लाईफमध्येही धारण केले कारण तिला तिच्या बालपणीच्या कटू आठवणी विसरायच्या असाव्यात….
रीनाच्या सुरुवातीच्या काळात समीक्षक तिची तुलना आशा पारेखशी करायचे, रीनाला ते पटत नसे. आशा पारेख आणि माला सिन्हा नंबर रेसमध्ये कधीही वर जाऊ शकल्या नाहीत मात्र त्यांची शिडी वापरून अनेक ठोकळे अभिनेते आपला सिनेमा हिट करण्यात यशस्वी ठरले होते त्यामुळे रीनाला त्यांच्यासोबत आपली तुलना मान्य नसे. खरे तर लुक आणि गेटअपची जाण तिला रेखाने करून दिली. तिचा कपाळावरचा केसांचा महिरप आणि धनुष्याकृती मासोळी डोळे याचा योग्य वापर कसा करायचा याचे धडे तिला रेखाने दिले. मात्र रीनाला स्वतःची इमेज आणि करीअर यांची गंभीरता सुरुवातीला नव्हती, केवळ अर्थार्जन ह्या हेतूने तिने बी आणि सी ग्रेडचे ढीगभर सिनेमे तिने केले. या काळात ओ.पी. रल्हान सारखा जाणता निर्माता दिग्दर्शक तिच्या सौंदर्याला भूलला होता आणि तिच्या सोबत खेटे मारत होता.तेंव्हा त्यांचा राजेंद्रकुमार अभिनित ‘तलाश’ तिकीटबारीवर सुपरहिट झाला होता. पण रीनाला लफडेबाजीत रस नव्हता. तिला शोध होता आयुष्याच्या जोडीदाराचा….
रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. ‘मिलाप’, ‘जंगल में मंगल’ आणि ‘उम्रकैद’ हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते. मात्र १९७६ साली रिलीज झालेल्या राजकुमार कोहलीच्या ‘नागिन’ या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. नागीन नंतर कोहलीने तिला ‘जानी दुश्मन’, ‘मुकाबला’, ‘बदले की आग’ आणि ‘राजतिलक’ या मल्टीस्टारकास्ट सिनेमात रिपीट केले. राजकुमार कोहली आणि रीनाचे हे कॉम्बिनेशन हिट ठरले.
त्यानंतर जे. ओमप्रकाशच्या १९७७ मध्ये आलेल्या ‘अपनापन’ या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी देखील तिला ‘आशा’ व ‘अर्पण’ मध्ये रिपीट केले. १९८० मध्ये आलेल्या ‘आशा’साठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत. रीनाची पडद्यावरची जोडी शत्रुघ्नखालोखाल सुनील दत्त आणि जितेंद्रसोबत जास्त जमली. राजेशखन्ना आणि अमिताभसोबत मेन रोलमध्ये तिचे सिनेमे कमी आले त्यामुळे नंबर गेममध्ये ती मागे राहिली. त्या उलट रेखा आणि हेमामालिनी यांचे चित्रपट अमिताभ, राजेश आणि धर्मेंद्र यांच्यासोबत जास्त आले आणि तितकेच हिट झाले. पण तरीही रीना त्यांच्या पुढे टिकून होती, ती केवळ तिच्या वेगळ्या आयडेंटीटीमुळे ! आज सोनाक्षीदेखील स्पर्धेत टिकून आहे ते केवळ इंतर अभिनेत्रीपेक्षा तिच्यात असणारया वेगळेपणामुळे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल.
बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांची करिअरची सुरुवात एकाच काळात झाली होती. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. १९७५ मध्ये रीनाचा सुनीलदत्तसोबतचा ‘जख्मी’ हिट झाला तर याच वर्षीच्या सुभाष घईच्या ‘कालीचरण’ने एकाच वेळी अनेकांना जीवदान दिले. यात स्वतः सुभाष घई, शत्रुघ्न, रीना आणि अजित यांना संजीवनी मिळाली. कालीचरण हिट झाल्याने घईंनी १९७८ मध्ये रीना -शत्रुघ्न यांची सुपरहिट ठरलेली जोडी रिपीट केली आणि गॉसिपला ऊत आला. दरम्यानच्या काळात रीनाचे जितेंद्रसोबतचे ‘प्यासा-सावन’, ‘बदलते रिश्ते’, हिट झाले होते. ‘अपनापन’, ‘आशा’ आणि ‘अर्पण’मध्येही तिचा नायक जितेंद्र होता मात्र रीनाने शत्रू वगळता आपले नाव कोणाबरोबर जोडले जाणार नाही याची काळजी घेतली. जितु आणि सुनीलदत्त दोघेही विवाहित होते त्यामुळे तिचे काम अधिक सुकर झाले. याच काळात विवाहित असलेल्या धर्मेंद्र आणि हेमाचा रोमान्स रंगात आला होता, तरअमिताभ विवाहित असूनही रेखाने त्याच्या आयुष्यात पुन्हा एन्ट्री घेतली होती. जुलै १९८० मध्ये रीना लंडनला असताना शत्रुघ्नने रीनाला वाऱ्यावर सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले. याच दिवसात धर्मेंद्रने पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हेमाशी लग्न केले. शत्रुघ्नच्या लग्नाची बातमी रीनाला मोठा धक्का देणारी होती. इतकेच नाही तर मुंबईला परतल्यानंतर रीनाने म्हटले होते, की माझ्या गैरहजेरीत शत्रुघ्नला लग्न करण्याची काय गरज होती ? ती बरेच वर्ष शत्रुघ्न यांच्यावर नाराज होती. मात्र शत्रुघ्नने ‘एनिथिंग बट खामोश : द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’ या त्याच्या बायोपिक पुस्तकात विवाहोत्तर काळात देखील तो रीनाला भेटत असल्याचा उल्लेख करून तिच्याशी अफेअर असल्याची मनमोकळी कबुली दिली आहे.
बॉलिवूडमध्ये ज्यावेळी रीना रॉयचे करिअर यशस्वी होते, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हासोबत चालू होते. जेव्हा रीनाला दोघांच्या लग्नाविषयी माहित झाले तेव्हा ती भडकली आणि तिने भारतात येऊन शत्रुघ्न सिन्हाला याचे उत्तर मागितले होते. लग्नानंतर अनेक वर्षे ते रीना रॉयला भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत का झाला याचे उत्तर या पुस्तकात देणे शत्रुघ्नने टाळले आहे. पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी तिच्या इंग्लंड दौऱ्याच्यावेळेस ओळख झाली होती, मात्र तिने बारकाईने विचार न करता त्याच्याशी १९८३ मध्ये निकाह लावला. खरे तर ह्या निर्णयामुळे तिचे करिअर उद्ध्वस्त झाले अन तीही संपली. तिला चुकीची जाणीव होऊ लागल्यावर रुपेरी पडदा पुन्हा खुणावू लागला.मात्र मोहसीनचे लोढणे तिच्या गळ्यात पडले त्याला घेऊन ती पुन्हा मुंबईला आली. यापाई मोहसीनखानला त्याच्या ९ वर्षाच्या क्रिकेट करिअरला अलविदा करावे लागले.
१९९२ ते १९९७ या पाच वर्षात त्याला तेरा चित्रपट मिळाले मात्र ऐकही सिनेमा चालला नाही. शेवटी त्याने रीनासह गाशा गुंडाळला आणि तो परत पाकिस्तानला गेला. या काळात जे.ओमप्रकाशनी तिला पुन्हा हात दिला आणि त्यांचा ‘आदमी खिलौना है’ने तिची थोडीफार पत राखली, या व्यतिरिक्त तिने केलेले या ५ वर्षातले सर्व दहाही चित्रपट दणकून पडले. या दरम्यान तिचे आणि मोहसीनचे खटके उडू लागले. तिने पाकिस्तानात गेल्यावर त्याच्याशी तलाक घेतला. मात्र तिला तिच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीची ‘सनम’ची कस्टडी मिळाली नाही. सैरभैर झालेली रीना आईकडे परत आली आणि पुन्हा बॉलीवूडमध्ये रिएन्ट्रीसाठी ती प्रयत्न करू लागली. अजय देवगणच्या ‘गैर’ आणि अभिषेक बच्चनच्या ‘रीफ्युजी’त तिला भूमिका मिळाल्या आणि तिच्या पदरात आणखी सिनेमे पडणार असे वाटत असतानाच तिच्यातल्या आईने उचल खाल्ली. तिने मोहसीनला परत संपर्क केला, त्यानेही तिच्याशी तलाक नंतर दुसरा निकाह लावला नव्हता.
रीनाने आपल्या मुलीवरच्या प्रेमापायी मोहसिनबरोबर कराची येथे पुन्हा एकदा निकाह केला आणि तिच्यातली आई सुखावली. मात्र आईच्या ममतेमुळे तिच्यातल्या अभिनेत्रीवर पुन्हा अन्याय झाला….यानंतर मोहसीन आणि रीनाने आपले संबंध न ताणता एकमेकापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला मात्र आपले नाते न तोडता त्यांनी हा निर्णय घेतला.
रीना आपल्या मुलीला घेऊन भारतात परत आली तर तिकडे पाकिस्तानमध्ये मोहसीन अजूनही एकटाच आहे. आपल्या टीनएजमध्ये कुटुंबासाठी जगलेली रीना तिच्या तारुण्यात शत्रुघ्नसाठी जगली, तो तिच्या आयुष्यातून निघून गेल्यावर तिने जणू काही स्वतःवर सूड उगवावा तसा निर्णय घेतला आणि आपल्या शानदार करिअरचे मातेरे केले.तिथून पुढे ती पूर्ण सावरल्यासारखी कधी वाटलीच नाही. ती दमदार पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिच्यातल्या ‘आई’ने तिच्यातल्या हीरोईनवर मात केली. सुखाचा काठोकाठ भरलेला प्याला तिच्या ओठी कधी आलाच नाही. संघर्ष मात्र अविरतपणे तिच्या नशिबी आला आणि तो ती करत राहिली.
रीना रॉय यांची गाणी
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ समीर गायकवाड
Leave a Reply