रंगू शंकरराव दिवाण म्हणजेच ‘ सुलोचना ‘ यांचा जन्म ३० जुलै १९२९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यात खडकलाट या गावी मध्यमवर्गीय कुटूंबात झाला, त्यांचे वडील फौजदार शंकरराव दिवाण आणि आई तानूबाई दिवाण यांच्या अकाली निधनामुळे सुलोचनाबाईचा सांभाळ त्यांच्या मावशी बनुबाई लाटकर यांनी केला. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंतच झाले.
त्यांना लहानपणापासून चित्रपट पाहण्याचे वेड होते, त्यावेळी तंबूत चित्रपट दाखवले जात. त्यांच्या वडिलांच्या मित्रांना त्यांचे चित्रपट पाहण्याचे वेड माहीत होते त्यांच्या ओळखीतून मा. विनायक यांच्या प्रफुल्ल चित्रामध्ये महिना तीस रुपये पगारावर त्यांना नोकरी मिळाली. त्यावेळी मा. विनायक यांच्या ‘ चिमूलकला संसार ‘ ह्या चित्रपटाचे काम चालू होते. त्यामध्ये सुलोचनाबाई यांनी राजा गोसावी यांच्याबरोबरएक दृश्यात काम केले. खरे तर या कामामुळेच त्यांचे चित्रपटसृस्तीत पदार्पण साले असेच म्हणावे लागेल. तेथे त्यांचा लता मंगेशकर, ग.दि. माडगूळकर, दत्त डावजेकर, दामुअण्णा मालवणकर, दिनकर द. पाटील, मीनाक्षी, सुमती गुप्ते वसंत जोगळेकर अशा अनेक जणांशी त्यांचा परिचय झाला.
लहान खेड्यातील सुलोचनाबाई तशातच त्यांचा शुद्ध मराठी भाषेशी परिचय नव्हता. त्या ग्रामीण भाषा बोलत असत त्याचा त्यांना त्रासही झाला परंतु लता मंगेशकर यांनी दिलेला धीर त्यांना मोलाचा ठरला. अशातऱ्हेने त्यांचा लता मंगेशकर यांच्याशी स्नेहसंबध जुळला तो कायमचाच. पुढे मा. विनायक यांनी प्रफुल्ल चित्र ही आपली संस्था मुबंईला हलवली, परंतु सुलोचनाबाई तेथेच राहिल्या. याच दरम्यात सुलोचनाबाई यांचा विवाह आबासाहेब चव्हाण यांच्याशी झाला. भालजी पेंढारकर आणि आबासाहेब चव्हाण यांची मैत्री होती तेव्हा सुचानाबाईच्या अभिनयाला वाव मिळावा म्ह्णून त्यांनी सुलोचनाबाईना भालजी पेंढारकर यांच्या ‘ जयप्रभा ‘ स्टुडिओ ‘ मध्ये प्रवेश मिळवून दिला. तेथे त्यांची ज्युनिअर आर्टिस्ट म्ह्णून ५० रुपये महिना पगारावर नेमणूक झाली. तेव्हा भालजी पेंढारकर यांनी सुलोचनाबाईच्या तेराव्या वर्षी शालीन आणि सोज्वळ भूमिका ‘ महारथी कर्ण ‘ या चित्रपटात भूमिका दिली. त्या चित्रपटात पृथ्वीराज कपूर आणि दुर्गा खोटे प्रमुख भूमिका करत होते. सुलोचनाबाई यांनी भालजी पेंढारकर यांना अगुरु मानले. रेखीव आणि बोलक्या डोळ्याच्या रंगू दिवाण यांचे नामकरण भालजींनी ‘ सुलोचना ‘ असे केले आणि ह्याच नावाने त्या खूप लोकप्रिय झाल्या.
सुलोचनाबाईच्या अभिनयाची खरी सुरवात भालजी पेंढारकर यांच्या ‘ जयभवानी ‘ या चित्रपटापासून झाली. १९४९ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘ मीठभाकर ‘ या चित्रपटात पारूची भूमिका सुलोचनाबाईनी केली तर नायकाच्या भूमिकेत चंद्रकांत मांढरे होते तर भालजींचा मुलगा प्रभाकर पेंढारकर आणि मुलगी सरोज चिंदणकर यांनी काम केले. गांधीहत्येनंतर झालेल्या जाळपोळीत जयप्रभा स्टुडिओ जळून खाक झाला. त्यात या चित्रपटाची रिळे जळून गेली. सर्व कारभार अस्ताव्यस्त झाला परंतु भालजींनी सर्व कामगारांना दोन महिन्याचा पगार देऊन नोकरीतून मुक्त केले आणि दुसरीकडे काम करण्याची परवानगी दिली. सुलोचनाबाई त्यावेळी परत घरी जायला निघाल्या तेव्हा मा. विठ्ठल यांनी त्यांना पुण्याला मंगल चित्र मध्ये जाण्याचा सल्ला दिला. तेथे त्यांना राजा परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ जिवाचा सखा ‘ या चित्रपटात सुलोचनाबाईनी भूमिका केली आणि ती उत्तम झाली. या निमित्ताने सुधीर फडके, राजा परांजपे आणि ग.दि. माडगूळकर एकत्र आले आणि पुढे त्यांनी इतिहास घडवला. हा चित्रपट रौप्य महोत्सवी ठरला. दरम्यान भालजी पेंढारकर यांनी त्यांचा ‘ जयप्रभा स्टुडिओ ‘ परत उभारला. ज्या ‘ मीठभाकर ‘ या चित्रपटाची रिळे जळून खाक झाली तो चित्रपट नव्याने केला, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर सुलोचनाबाईचे काम इतके चांगले झाले की ते कुणीही विसरू शकले नाही. त्यानंतर त्यांनी ‘ बाळा जो जो रे ‘ या चित्रपटात विधवा ब्राह्मण स्त्रीची भूमिका केली होती. सुलोचनाबाईची सदाशिवराव कवी यांच्या ‘ वहिनीच्या बांगड्या ‘ चित्रपटातील भूमिका म्हणजे भारतीय स्त्री आणि भारतीय संस्कृती, परंपरा, शालीनता, स्त्री चे वात्सल्य ह्या सर्व काही गोष्टी त्यांच्या भूमिकेतून दिसून आल्या त्यामुळे तो चित्रपट अस्मरणीय असा झाला. मुख्य म्हणजे त्यांच्यावर जो ग्रामीण चित्रपटात काम करणाऱ्या म्हणून जो शिक्का बसला होता तो पुसला गेला. त्यांची दुसरी अवीस्मरणीय भूमिका म्हणजे आचार्य अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘ महात्मा फुले ‘ या चित्रपटात केलेली सावित्रीबाई फुले यांची भूमिका. आपण पडद्यावर खऱ्याखुऱ्या सावित्रीबाईना पहातो की काय असे वाटत होते.
१९५८ साली त्यांनी विमल राय यांच्या ‘ सुजाता ‘ या चित्रपटात काम केले आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने चरित्राभिनेत्री या प्रवासाला सुरवात झाली. पुढे त्यांनी हिंदीतील धर्मेंद्र, शशी कपूर, मनोजकुमार, सुनील दत्त अमिताभ बच्चन आणि अशा अनेक मोठ्या कलाकारांबरोबर कामे केली. त्यांचे अनेक मराठी चित्रपट आले भाऊबीज, स्त्री जन्मा तुझी कहाणी, प्रपंच, साधी माणसं, मराठा तेतुका मेळवावा, संत गोरा कुंभार, एकटी, सांगत्ये ऐका, मोलकरीण, ओवाळणी, धाकटी जाऊ, सतीची पुण्याई, मी तुळस तुझ्या अंगणी अशा ऐकून मराठी १५० चित्रपटात तर २५० हून अधिक हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी बंदिनी, चाळ नावाची वाचाळ वस्ती, कुणासाठी कुणीतरी या मराठी मालिकांमधूनही कामे केली. चित्रपटाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. १९७२ साली ‘ जस्टीस ऑफ पीस ‘ मध्ये ‘ व्ही. शांताराम पुरस्कार ‘, १९९९ मध्ये त्यांना भारत सरकारने पदमश्री देऊन त्यांचा सन्मान केला, चित्रभूषण पुरस्कार, फिल्फेअरचा लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, महाराष्ट्रभूषण पुरस्कार असे ऐकून ७५ हून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले. १९६१ साली चिनी आक्रमणाच्या वेळी भारत सरकारच्या आवाहनानुसार सुलोचनाबाई यांनी संरक्षण निधीसाठी घरातील दागिने आणि निधी उपलब्ध करून दिल्या.
आज सुलोचनादीदी 93 व्या वर्षी आपले तृप्त आयुष्य मुंबईत समाधानाने जगत आहेत.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply