उषाकिरण म्हणजेच उषा बापू मराठे यांचा जन्म २२ एप्रिल १९२९ रोजी वसईमधील एका मध्यमवर्गीय कुटूंबात झाला. त्यांच्या आईचे नाव राधा असे होते. त्यांची आर्थिक परिस्तिती बेताचीच होती. तरीही त्यांच्या वडिलांनी बापू मराठे यांनी त्यांच्या मुलीला लहानपणापासून नृत्यकलेचे शिक्षण दिले. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मो.ग. रांगणेकर यांच्या आशीर्वाद या नाटकात प्रथम काम केले. त्यांच्या नृत्यावर खूश होऊन प्रसिद्ध नर्तक उदय शंकर यांनी उषा मराठे यांना मद्रास येथे तयार झालेल्या ‘ कल्पना ‘ या चित्रपटात १९४८ साली भूमिका दिली. तेथील चित्रीकरण करून त्या मुंबईला परत आल्यावर त्यांना मो.ग.रांगणेकर यांनी त्यांच्या ‘ कुबेर ‘ या चित्रपटात भूमिका दिली. ती भूमिका त्यांनी उषा मराठे या नावानेच केली.
त्यानंतर त्याच नावाने त्यांनी ‘ सीता स्वयंवर ‘ , ‘ माझा राम ‘ , चाळीतले शेजारी ‘ यासारखे चित्रपट केले. १९५० मध्ये त्यांना ‘ गौना ‘ या हिंदी चित्रपटात भूमिका मिळाली. त्यावेळी अमिया चक्रवर्ती यांनी त्यांचे ‘ उषाकिरण ‘ हे नामकरण केले. त्यानंतर त्या त्याच नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. विश्राम बेडेकर यांनी उषाकिरण यांना ‘ क्रांतिवीर वासुदेव बळवंत ‘ या चित्रपटात तमाशात नाचणाऱ्या कोल्हाटणीची भूमिका दिली. त्यामुळे त्यांची खूप प्रशंसा झाली. आणि त्यानंतर त्या मराठी हिंदी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या नायिका म्ह्णून सुप्रसिद्ध झाल्या. वि. वि. बोकील यांनी लिहिलेल्या गाठीभेटी या कादंबरेवर आधारलेल्या ‘ बाळा जो जो रे ‘ या चित्रपटात त्यांची भूमिका लोकप्रिय झाली.
राम गबाले यांच्या ‘ जशास तसे ‘ या चित्रपटात त्यांना पुन्हा एकदा कोल्हाटणीची भूमिका मिळाली. त्यांच्या बरोबर बाबूराव पेंढारकर यांनी काम केले. त्यांनी उत्तमपणे काम करून बाबूरावांची शाबासकीही मिळवली. तर १९४२ मध्ये त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या ‘ दूधभात ‘ या चित्रपटात काम करून पु. ल. देशपांडे यांची शाबासकी मिळवली. दत्ता धर्माधिकारी यांच्या ‘ स्त्री जन्मा तुझी कहाणी ‘ या चित्रपटामधील भूमिकेमुळे त्या अधिक लोकप्रिय झाल्या. त्यानंतर त्यांनी कांचनगंगा , पोस्टातली मुलगी , पुनवेची रात , शिकलेली बायको ह्या चित्रपटातून कामे केली. मोहन सैगल यांनी ‘ शिकलेल्या बायको ‘ या चित्रपटावरून ‘ डॉक्टर विद्या ‘ हा चित्रपट काढला. त्यात वैजयंतीमाला यांनी भूमिका केली होती.
१९६० साली उषाकिरण यांनी ‘ कन्यादान ‘ या चित्रपटात काम केले हा चित्रपट महादेवशास्त्री जोशी यांच्या ‘ जगावेगळी गोष्ट ‘ या कथेवरुन घेतला होता. या चित्रपटातील कथानक खूप चांगले होते आणि उषाकिरण यांनी त्यामंध्ये विधवा स्त्रीची भूमिका केली होती. या चित्रपटाला १९६१ साली राष्ट्रपती रौप्य पदक मिळाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांनी केलेले होते. त्यांनंतर उषाकिरण यांचे जे चित्रपट आले त्यामधील अभिनयाने त्यांनी लोकांची मने जिंकली , त्या चित्रपटांची नावे सीता स्वयंवर , गरिबाघरची लेक , सप्तपदी , सुनबाई अशी होती. अर्थात ते चित्रपट व्यवसायिकदृष्टया चाललेही .
पुढे उषाकिरण यांनी ’ जशास तसे ’ मध्ये डोंबारीण आणि ‘ पुनवेची रात ‘ मध्ये तमासगिरीण , तर ‘ बाळा जो जो रे ‘ मध्ये ‘ सोशिक स्त्री ‘ अशा लक्षवेधी भूमिका अप्रतिम साकारल्या. माधव शिंदेंच् यांच्या ‘ शिकलेली बायको ‘ आणि ‘ कन्यादान ‘ मध्ये त्यांच्यातले अद्भुत अभिनयसामर्थ्य पाहण्याची संधी सिनेरसिकांना लाभली. ‘ पतित ‘ मध्ये देव आनंद, ‘ दाग ‘ मध्ये दिलीपकुमार, ‘ काबुलीवाला ‘ मध्ये बलराज साहनी तर ‘ नजराना ‘ मध्ये राज कपूर या अभिनेत्यांबरोबर त्यांनी काम केले. या सिनेमांमुळे हिंदी सिनेसृष्टीतही त्यांची लोकप्रियता वाढली. डॉ. मनोहर खेर यांच्याशी त्यांचा १९५४ मध्ये त्यांचा विवाह झाला. १९५५ पासून त्या १९६१ सालपर्यंत चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्या. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत पुरागमां केले ते हृषीकेश मुखर्जी यांच्या ‘ बावर्ची ‘ या चित्रपटापासून . त्यानंतर त्यांनी चुपके चपके , मिली अशा अनेक चित्रपटातून कामे केली. त्यांनी मोजकेच सिनेमे केले. खरे तर ‘ माया बाजार ‘ या चित्रपटापासून त्यांचा खरा हिंदीत यशस्वी प्रवास सुरु झाला .
या चित्रपटांशिवाय उषाकिरण यांनी मर्दमराठा , बेलभंडार , प्रीतिसंगम , चाळ माझ्या पायात, माणसाला पंख असतात अशा महत्वाच्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. उषाकिरण यांनी गौना या चित्रपटानंतर मदहोश , दाग , पतिता , मुसाफिर , औलाद , समाज , झांजर , माया बाजार हे चित्रपट त्यांनी केले. ‘ चुपके चुपके ‘ या चित्रपटातील त्यांची ओमप्रकाश यांच्याबरोबरची त्यांच्या पत्नीची भूमिका कोणीही विसरू शकणार नाही . त्यांनी पुढे अनेक चित्रपटातून चरित्र अभिनेत्रीच्या भूमिका केल्या. त्यांनी देव आनंद , दिलीप कुमार , अशोक कुमार , किशोर कुमार , राजकपूर यांच्याबरोबर प्रमुख भूमिका केल्या.
१९५४ साली प्रदर्शित झालेल्या ‘ बादबान ‘ या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्रीचा ‘ फिल्मफेअर ‘ पुरस्कार मिळाला. तर मराठीमधील ‘ कन्यादान ‘ या चित्रपटातील सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटातून कामे केली.
उषा किरण यांनी १९८० साली शेवटचा चित्रपट ‘ चंबल की कसम ‘ हा केला. त्यांचा चुपके चुपके चित्रपट आणि त्यातील उत्पल दत्त यांच्याबरोबर केलेली भूमिका कुणीच विसरणार नाही. त्यांनी समाजउपयोगी कामे करण्यास सुरवात केली. त्यांचे काम पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना मुंबईचे नगरपालपद दिले . त्यांची मुलगी तन्वी आझमी यांनी त्यांची अभिनयाची परंपरा चालू ठेवली आहे. त्यांनी ‘ उषःकाल ‘ नावाचे आत्मचरित्रही लिहिले.
त्यांचे मुंबई येथे कर्करोगाने ९ मार्च २००० रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply