अधांतरी साकव कसा पार होई
कशाचाच कशास आधार नाही
मनी सक्त नाही त्याला कोण पाही
विचारे मना सर्व सोडुनी जाई!!
अर्थ–
प्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल. प्रवाह ओलांडून जाणं हे कधी कधी गरजेचं असतं तर कधी प्रवाहात उतरून प्रवाहा बरोबर जाणं योग्य असतं. अशा वेळी काय करावे? प्रत्येकाला प्रवाहाच्या बरोबर जाणे जमतेच किंवा रुचतेच असे नाही तेव्हा मनुष्य शोध घेतो साकवाचा पण त्यावरून जाणे किती कठीण असते हे त्यावर पाऊल ठेवल्या शिवाय कळत नाही.
कठीण प्रसंगी किंवा आयुष्यात जेव्हा संकटं येतात तेव्हा साथीला कोण असते? एक मित्र, एक सखा नक्की असतो माणसाबरोबर तो म्हणजे त्याचं स्वतःचं मन. त्याच्याशी सलाह करून ती परिस्थिती, ते संकट पार करणे शक्य असते पण माणूस अशा वेळी सहाय्य मिळवण्या ऐवजी असहाय्यचं कसे मिळते, मिळाले, माझ्या नशीबातच ही गोष्ट कशी नाही या गोष्टींना प्राधान्य देत समोर असलेले संकट अजून ओढून घेतो आणि मग मनाला आवर घालण्या ऐवजी माणसाला आवरणे फार कठीण होऊन बसते.
आयुष्यात बॅलन्स राखणे गरजेचे असते पण तो समतोल स्वतः राखणे गरजेचे असते पण पावलं नीट न टाकता अडखळणे हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे.
संकट कोणतंही येउदे त्या संकटातून बाहेर पडताना समोर बाजूला कोण असेल किंवा नसेल तरीही स्वतः मनाला भक्कमपणा प्राप्त करून त्याच्याशी मैत्री करून पुढे जाणं हेच खरं महत्वाचं असतं.
स्वतःच्या मनाला जितकं विचाराल तितकं ते गुरफटून राहतं, पण जर मनाला भक्कम बनवले तर गोष्टी, वेदना, दुःख त्यातून बाहेर काढणे आणि मनास उभारी आली की शरीर धडधाकट येणं हे क्रमप्राप्त आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply