कार्यक्रम संपला होता. बक्षीसे मिळालेली मुले आनंदात होती. सगळ्यांना काही ना काही मिळालं होतं. ज्यांना बक्षीसे मिळाली होती ती मुले कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या पायावर डोकं ठेवायला जात होती. ते नम्रपणे मुलांना नकार देत होते. सांगत होते, माझ्यापायावर डोकं नका ठेवू, यश तुमचं तुम्ही मिळवलयं. तुम्हाला आशीर्वाद देण्याचा अधिकार मला नाही. पायावर डोकं ठेवायचंच असेल तर आई-वडीलांच्या आणि देवाच्या चरणांवर डोकं ठेवा, तो अधिकार त्यांचा आहे. माझा नाही.’ अतिशय नम्रतेने त्यांनी मुलांना नाकारलं होतं. मात्र अधिकाराचं महत्व देखील तितक्याच उत्कटेने आणि प्रभावीपणे स्पष्ट केलं होतं. कार्यक्रमानंतर पांगापांग झाली, मात्र अधिकाराचा विषय तसाच घोळत राहिला… मनात..
अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत. व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे. तिला अंत नाही. अधिकाराच्या संदर्भात इतक्या सगळ्या गोष्टी आपल्या अवती भोवती असतानाही नेमक्या अधिकारांची जाणीव मात्र आपल्याला नसते. मुलभूत अधिकार आपले काय आहेत, हे देखील फारसे कुणाला माहित नसते असेच म्हणावे लागते.
आदीवासी पाड्यांमध्ये जेव्हा फिरण्याचा प्रसंग अनेकवेळा येत असतो कामाच्या निमित्ताने, तेव्हा अधिकारांच्या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव होते. दूरवर डोंगरात पाड्यांवर राहणाऱ्या आदीवासी जमातीला तिचे अधिकार काय आहेत..? त्यांचा वापर कसा करावा हे फारसे माहित नसल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यांचे अधिकार समजावून देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचा त्यावर विश्वास बसत नाही. शहरी भागातील नागरिकांची यापेक्षा वेगळी अवस्था दिसत नाही. अधिकार दिलेत पण त्याचा वापर कसा करावा हे कळत नसल्याने अधिकारांचा वापर होत नाही. कॉलनीतील समस्येबाबत तक्रार करायची असते, तो आपला अधिकार आहे, पण किती जण तशी तक्रार करतात… अगदीच एखादी व्यक्ती अशी तक्रार करायला पुढे येते. हे प्राथमिक स्वरुपाचे उदाहरण आहे. या सारखी असंख्य उदाहरणं समोर येत असतात. त्या उदाहरणांत अधिकारांचा वापर करायचा असतो हे देखील फारसे कुणाच्या लक्षात येत नाही.
जेव्हा आपल्याकडील एखादी व्यक्ती परदेशात जाते, तेव्हा तेथील नियम सहजपणे पाळते. कचरा रस्त्यावर फेकू नये, मोठ्या आवाजात बोलू नये, रस्त्यावर थुंकू नये या सारखे नियम अंगवळणी पडल्या सारखे पाळले जातात. मात्र तीच व्यक्ती जेव्हा भारतात परतते, विमानतळाच्या बाहेर पडल्याबरोरच त्याच्या वागण्यात बदल झालेला स्पष्टपणे जाणवतो. असे का व्हावे? स्वच्छते संबंधीचा अधिकार फक्त परदेशातच वापरायचा, भारतात नाही. देशाचा मतदार म्हणून देशाच्या हिताच्या संबंधाच्या गोष्टी जाणून घेण्याचा अधिकार मला घटनेनेच दिला आहे, त्याचा वापर आपण किती वेळा करतो. सामान्य नागरिक म्हणून लोकप्रतिनिधींना किती वेळा प्रश्न विचारतो? या साऱ्या गोष्टींत काही सन्माननिय अपवाद असतीलही.
तरी देखील असे वाटते की प्रत्येकाला त्याच्या अधिकाराची जाणीव होवो आणि त्याच्या कडून त्यांची प्रभावी अमंलबजावणी देखील होवो…
— दिनेश दीक्षित
Leave a Reply