माझे आता बीएससी ऍग्रीचे पाचवे सेमिस्टर नोव्हेंबर मध्ये संपलेले होते व नवीन सहावे सेमिस्टर सुरू होण्यास पंधरा- वीस दिवस बाकी होते त्यामुळे सुट्टीत जेवढी मदत घरच्यांना होईल ती कमीच या उद्देशाने मी माझा पूर्ण वेळ खांब्याचा शुक्रवारचा बाजार ,म्हैसगावचा मंगळवार, गुरुवारचा राहुरी व शनिवारचा संगमनेर असे एकूण चारही बाजार नानांसोबत भाजीपाला विक्रीला घेऊन जात असे व माझे दुकान मी स्वतंत्र मांडत असे कारण मी सहावीपासून आजूबाजूच्या म्हैसगाव, कोळेवाडी या खेड्यांमध्ये सायकलवर फिरवून भाजीपाला विकण्यात पारंगत झालो होतो आता तर मी पदवीचे शिक्षण घेत होतो त्यामुळे बाजारात स्वतंत्र दुकान थाटले यात काहीच नवल नव्हते . बरेचसे गावातील व मळ्यातील लोक यात नवल मानत होते व त्यामुळे मी आणखी प्रोत्साहित होऊन माझे काम नेमाने करत होतो व जमेल तसा हातभार कुटुंबाला लावावा हा माझा प्रांजळ उद्देश होता भाजीपाल्याचा बाजार संपला की नेमाने आपला सर्व हिशोब नानांकडे जमा करणे व मोकळ्या पाट्या एकात एक घालून त्यात काटा मापे टाकून वरून बारदानाने फिट बांधणे हे सोपस्कार केल्या नंतर वेळ असेलतर गावातील सोबत आलेल्या माणसांबरोबर गप्पागोष्टी करणे व दिवस मावळतीला गेला की गावचा रस्ता धरणे असा नित्यक्रम सुरू असे .ज्या दिवशी बाजार नसेल त्या दिवशी दुसऱ्या दिवशीच्या बाजारासाठी भाजीपाला काढणे क्रमप्राप्त असे .
आता चार-पाच दिवस उन्हाळ कांद्याची लागवड उद्यापासून सुरू होणार होती त्यामुळे बाजारात भाजीपाला विकण्यापेक्षा लागवडीचे काम महत्त्वाचे असल्याने सकाळपासून आम्ही सर्वजण कांद्याचे रोप उपटणे ,वावरात रोजाने असलेल्या बायांना रोपाचा पुरवठा करणे व लागवड झालेल्या कांद्याला पाणी देणे अशी कामे मी व दत्ता करत होतो. एकदा लागवड सुरू झाली की विहिरीची पाण्याची बारी कोणाचीही असो लागवड होऊन आंबवणी देईपर्यंत विहिरीचा ताबा लागवड धारकाचाच असे त्याप्रमाणे विहिरीत आमचे चुलते अण्णा व तात्या समंजसपणे विहिरीचे सर्व हक्क दत्ताकडे सुपूर्त करत असत. व त्यांची जेव्हा लागवड असेल तेव्हा आम्हाला जशी त्यांच्याकडून सवलत मिळाली त्याप्रमाणे त्याची परतफेड केली जात असे . एकदा लागवडी संपल्या की उन्हाळ कांदे निघेपर्यंत पाण्याच्या बारीवरून बरेच खटके उडालेले मला आजही आठवतात परंतु दुसरा दिवस उजाडला की पुन्हा खेटामेटी करावी लागत असल्याने व एकमेकांशिवाय पर्याय नसल्याने काल झालेले सर्व प्रकार प्रत्येक जण विसरला नसेल तरीही विसरून जाण्याचा भास आणून आपली पिके कशी चांगल्या पद्धतीने पिकविली जातील याकडे सर्वांचा कल होता.
पश्चिमेला डोंगर व त्याच्या पायथ्याशी पूर्वेकडून आमचे पाचटाचे सपार उत्तरेकडे तोंड करून समोरील कडुलिंबाच्या झाडाकडे सतत पाहत होते .सपराच्या उजव्या बाजूला भिंतीपासून फक्त दहा फुटावर राहुरी -साकुर असा जिल्हा मार्ग होता व रस्त्याच्या खाली सरळ टप्प्याटप्प्यावर जमिनीचे तीन तुकडे उतारावर विखुरलेले होते. डोंगराकडील घराच्या भिंतीपासून संपूर्ण डोंगराकडे वनविभागाची हद्द असल्याने डोंगरावर बऱ्यापैकी वनरक्षकांचा ताबा होता त्यामुळे झाडाझुडपांची संख्या ही चांगली होती .वनसंवर्धन प्रत्येक वर्षी लागवड करून केले जात होते .त्यामुळे गावातील कोणताही डोंगर बोडखा राहिलेला नव्हता. वन विभागाचे दिनेश भोयर , मुरली वर्पे व अण्णा भांडकोळी यांचा सर्वीकडे पहारा कडक होता.
सर्वात खालच्या 50 गुंठ्याच्या जाड काळ्या मातीच्या तुकड्यात व गोविंदा बाबाच्या वाट्याने केलेल्या 15 गुंठे पट्टीत असा एकूण सात ट्रक ऊस म्हणजेच 84 टन उस संगमनेर कारखान्याला गेला होता. नानांनी त्यांची पूर्ण ताकद उसाला लावलेली होती . गावातील व आजूबाजूची सर्व शेतकरी मंडळी नानांच्या या पीक उत्पादन पद्धतीचे जिकडे तिकडे नवल करत होती.उसाच्या पीक स्पर्धेत सहभाग नोंदवला असता तर नानांचा त्या स्पर्धेत पहिला क्रमांक पक्का होता. उसाचा फड अगदी जोरात होता त्याच्याच उत्पादनावर नानांनी हिम्मत करून कारखान्याकडे नवीन घरासाठी कर्जाची मागणी पण नोंदवलेली होती. कारखान्याने यावर्षी उत्पादक सभासदांसाठी नवीनच घर कर्ज देण्याची योजना आणली होती व आम्ही यातून नवीन बंगला बांधण्याचा विचार मनोमन पक्का केला होता व त्याप्रमाणे घरातील प्रत्येक जण कामाला लागलेला होता . दत्ता माझ्याहून दोन वर्षांनी लहान असूनही त्याच्यावर कामाचा जास्त भार होता आता तो दहावी उत्तीर्ण न झाल्याने घरीच 17 नंबरचा फॉर्म भरून घरचे काम करून परीक्षा देणार होता.जवळपास यापुढे भविष्यात शेतीची सर्व सूत्रे त्याच्याकडे नकळत येणार होती.
वरच्या वावरात गायांसाठी घास टाकलेला होता व आता आमची मधल्या वावरात कांद्याची लागवड सुरू होती. दुपारचा एक वाजला असेल मी लागवड केलेल्या कांद्यांना पाणी देत होतो दत्ता व नाना रोप उपटून लागवडीसाठी देत होते हक्काचे आज घरचे जुने भांडे व काम जरा उशिरा आवरले त्यामुळे आम्ही सर्वजण वावरात पुढे जाऊन कामाला भिडलो होतो. आता ती घरून सर्व कामे आवरून बायांना व आम्हाला पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन निघाली होती. वावराचे तुकडे जवळपास दहा पंधरा फूट टप्प्याखाली असल्याने बांध हळू उतरावा लागत असे तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा असल्याने ती जपूनच बांधावरून उतरत होती परंतु तिचा पाय कसा सरकला हे कळायच्या आतच ती हंड्यासहित अचानक जागच्या जागी पाय मुडपून पडली. क्षणार्धात तिला काय झाले हे कळले सुद्धा नाही. मात्र पाण्याचा हंडा एक थेंबही न सांडता तीने जीवापार जसाच्या तसा उभा ठेवला. आपला पाय मोडला आहे हे तिला कळून चुकले व डोळ्याला अंधाऱ्या येऊ लागल्या. अरे दत्ता – ये नेवर्ती असा आरोळीवजा आवाज माझ्या कानी पडला व नाना व आम्ही सर्व तिच्याकडे पळत गेलो गेल्यानंतर ताबडतोब हा सर्व प्रकार पाहिला तिचा पाय गुडघ्याच्या खाली पोटरी मध्ये व घोट्यामध्ये पूर्णपणे हाडाचा चुरा होऊन गेला होता ती आता रडायला लागली होती. आम्हाला काय करावे हे सुद्धा सुचत नव्हते मी त्याच हंड्यातील पाणी तिच्या तोंडावर शिंपडले उन्हाचा तडाका खूपच होता त्यामुळे तिला आणखी चक्कर आली होती. मी जसेच्या तसे तिला उचलून लहान मुलासारखे पाटकुळी धान्याच्या पोत्यासारखे उचलले व घरी आणले.
त्यावेळी हाडाचे काही नुकसान झाले किंवा मोडतोड झाली तर सरळ आम्ही दरडगावच्या गोपाळ बाबा व त्यांचा मुलगा एकनाथ मामा यांच्याकडे धाव घेत असू आमचे कुटुंबाचा बारदाना मोठा असल्यामुळे तीस-पस्तीस माणसांमध्ये वर्षातून बऱ्याच वेळा मुर्गळा, लचका , शीर भरणे, वात येणे अशा बारीक सारीक तक्रारीमुळे आमचे आताही वेगळे निघाल्यानंतर दरडगावला काही न काही कामानिमित्त जाणे होत असे पण आज आक्काचा पाय मोडल्यामुळे सरळ एकनाथमामालाच मोटरसायकलवर नानांनी इकडे आणले, मामाने अंदाजपंचे पाय तपासून पाहिला बरीच मोडतोड झालेली आढळून आली पण हाडे बसवण्यात मामा पारंगत असल्याचा समज सर्वांचा होता त्यामुळे मामाने त्याच्या पद्धतीने हाडांची बांधणी केली व हालचाल न करण्याचा सल्ला दिला , पायावर आता उभे राहणे शक्यच नव्हते त्यामुळे संध्याकाळपासूनच आमचा भाकर -टुकड्याचा गंभीर प्रश्न उभा राहिला होता सर्वच्या सर्व गोष्टी जागेवरच कराव्या लागणार होत्या . आक्काच्या डोळ्यातून अजूनही पाणी येत होते परंतु आजूबाजूच्या घरातील सर्व महिला मंडळींनी अक्काला बराच धीर दिला.
घरामध्ये मी, नाना व दत्ता आशा त्रिकोणी कुटुंबाची अक्का मालकीण होती त्यामुळे झालेल्या प्रकार हा आमच्या सर्वांसाठी खूपच वेदना देणारा ठरला.आम्हाला त्यादिवशी काय करावे हे सुद्धा सुचत नव्हते.गावातील मोठी नंदा आक्की ऊस तोडीला गेलेली असल्याने आता मंगल अक्कीला बोलावल्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
पाच वाजून गेले होते इकडे कांद्याची लागवड परस्वाधीन सुरू होती . फोनची व्यवस्था नसल्याने मला सरळ जीप गाडीने म्हैसगाव -राहुरी -श्रीरामपूर -वाकडी असा प्रवास करणे क्रमप्राप्त होते त्याप्रमाणे मी म्हैसगावातून जसा जीपमध्ये बसलो तसा माझ्या अश्रूंचा बांध फुटला मी एकटाच गलबलून गेलो व जसजशी गाडी पुढे जाईल तस तशी माझ्या अक्काची मला दुपारच्या घटनेची आठवण येऊन मला उचंबळून येऊ लागले तसेच हुंदके देत देत मी वाकडी कडे जाऊ लागलो. गाडी जशी जशी पुढे जाईल तशी मी माझ्या भविष्यात काय होईल व त्याचा माझ्या सर्व कुटुंबीयांवर काय विपरीत परिणाम होईल या गर्तेत बुडून कासावीस होऊन मी कुठे चाललो आहे याचे देहभान विसरून गेलो होतो!!!
– निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी फुलंब्री ,
जि. छत्रपती संभाजीनगर.
9423180393
Leave a Reply