राधा.. ठाकूर बलदेवसिंगची विधवा सून.. लग्न होउन अजून अंगाची हळदही उतरली नव्हती.. तोवर तिच्या संसारावरच वीज कोसळली.. त्या राक्षसाकडून तिच्या सासरची सारी लोक मारली गेली.. त्यात तिचं कुंकू देखील पुसले गेले.. जन्मभरांच वैराग्य गाठीशी घेउन जगणं नशीबी आलं होतं तिच्या.. पण अशा वैराण वाळवंटात एक सुखद वा-याची झुळूक आली.. जय च्या रुपाने..
ठाकूरने गब्बरला जेरबंद करण्यासाठी आणलेली दोन माणसे.. त्या दोघातला हा शांत, संमजस, प्रेमळ तरुण.. दोघांची नजरानजर झाली..नजरा झुकल्या.. अनाहुतपणे त्यांचे समोर येणे, बोलणे होत गेले.. ती गार वा-याची झुळूक कुठे तरी आतपर्यंत तिला स्पर्शून गेली.. हे चूक आहे, समाज मान्य नाही, हे ठाउक असूनही.. दोघे नकळतपणे एकमेकांकडे आकर्षिले गेले.. वाळवंटातली ही हिरवळ सुखद वाटून गेली.. रोज संध्याकाळी सुर्य मावळताना तो तिथे बसायचा.. त्या आउटहाउसच्या पाय-यांवर.. रोज सकाळी सुर्योदयाच्या वेळीही तो बसून असायचा.. आपल्या माउथ आॕर्गनवर तीच धून वाजवायचा.. त्याचवेळी राधा पहिल्या मजल्यावरच्या उभी असायची..
व्हरांड्यातले कंदील लावत असायची वा मालवत असायची.. जयच्या त्या धूनमधे एक अनाम वेदना होती..एक आर्त हाक होती..
ती हाक जणू राधासाठीच होती..तिचे काळीज विदीर्ण करायची.. पण समाजाच्या बंधनांना तोडून ती कशी जाणार..? पण..असेच होते सारे.. नजरेनेच केलेले प्रश्न..नजरेनेच दिलेली उत्तरे.. आणि ती काळजात आरपार जाणारी धून.. बस्स..एवढच त्या अबोल प्रेमाच्या नशीबी होतं.. कारण.. या कहाणीचा अंत आधीच ठरला होता.. जय शेवटी म्हणतो तसं.. ‘हे कहानी भी अधूरी रह गई….’
‘शोले’ मधली जय-राधाची अधूरी राहून गेलेली ही प्रेमकहाणी.. समस्त भारतीय फिल्म प्रेमींची जणू दुखती रग आहे.. जयच्या मृत्युचा इतका त्रास होत नाही हो.. पण ‘राधाला ही जन्मभराची शिक्षा का?’ हा प्रश्न मात्र घोर लावून जातो.. राधा आणि जयचे या अबोल प्रेमाचे प्रतीक म्हणजे ‘ती’ धून. पंचमदा साठी ती वाजवली हार्मोनीका स्पेशालीस्ट भानू गुप्तांनी. भानूदांनी ही धून आपल्या हार्मोनीकाने अजरामर केलीय.. कश्मीर ते कन्याकुमारी कुठेही आर.डी. बर्मन नाइट असेल किंवा हार्मोनीका/माउथ आॕर्गन महोत्सव असेल..
गेला बाजार ट्रेन मधे, मेट्रोमधे, बसेस मधे… तुम्हाला कुठेना कुठे ही धून वाजताना दिसेल.. कुठेही ऐका.. पहिली लकेर येताच दाद घेणारी धून आहे ही.. आमिताभनी अलिकडे एका मुलाखतीमधे सांगीतले होते.. जय ती हार्मोनीका वाजवताना राधा दिवे मालवत जाते तो सीन.. परफेक्ट शाॕट साठी रमेश सिप्पी आणि सिनेमॕटोग्राफर व्दारका व्दिवेचा यांनी तब्बल तीन वर्षे वाट पाहिली…
त्यांना जो नैसर्गिक प्रकाश हवा होता त्यासाठी.. एका सीनसाठी केलेली किती ही धडपड..? पण म्हणूनच पहाना.. एक अजरामर सीन बनून गेला..!! या हार्मोनीका धूनला शोलेची ‘लव्ह थीम’ म्हणून संबोधले जाते.. पण मला वाटते ही खरे तर एक ‘विरह थीम’ आहे..
जय आणि राधा च्या अबोल प्रेमाचे ते सारे कंदिल दिवे.. हळू हळू मालवत जाणारी.. अन.. शेवटी राधा आणि तिचा विरह, एवढेच मागे ठेउन जाणारी..
-सुनिल गोबुरे
Leave a Reply