आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांचा जन्म २९ एप्रिल १९६८ रोजी झाला. भय्यूजी महाराज यांचे खरे नाव उदयसिंह देशमुख. राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांचा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मोठा अनुयायी वर्ग होता. भय्यूजी महाराज हे आध्यात्मिक गुरू असून त्यांची राजकारणामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये चांगली ओळख होती. चित्रपटक्षेत्र तसेच उद्योगक्षेत्रामध्ये देखील त्यांची बड्या मंडळींशी चांगली ओळख होती. या क्षेत्रातील अनेकजण त्यांचे भक्त होते, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सातत्याने त्यांच्याकडे येत असायचे. त्यांनी आश्रमांद्वारे आध्यात्मिक आणि समाजहिताची कामे मोठ्या प्रमाणात केली. त्यांनी स्वच्छतेच्या क्षेत्रातही मोठे कार्य केले. उत्तर प्रदेशातही त्यांच्या कार्याने झेप घेतली होती. तत्कालीन मंत्री अनिल देशमुख, तसेच मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आणि भय्यूजी महाराज यांची ओळख झाली, त्यानंतर त्यांचा महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांमधील वावरही वाढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची ओळख होती.
२०१६ मध्ये भय्यूजी महाराज यांनी सार्वजनिक जीवनातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांचा इंदूर येथे आश्रम असून, त्याच्या महाराष्ट्रातील अन्य शहरांतही शाखा आहेत. गेली सुमारे १७ वर्षे त्यांचे आणि महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील नेत्यांशी जवळीक होती. चित्रपटापासून अनेकविध क्षेत्रांतील मंडळ त्यांच्याकडे आपल्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी सल्लामसलत, मार्गदर्शनासाठी यायची.
लोकपालाच्या मुद्द्यावर ऑगस्ट २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत बेमुदत उपोषण आरंभले होते. तेव्हा हजारे केंद्र सरकारशी चर्चेला तयार नव्हते. त्या वेळी विलासराव देशमुख यांनी भय्यूजी महाराज यांना मध्यस्थाची भूमिका निभावण्याची विनंती केली. त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. तत्कालीन कायदामंत्री सलमान खुर्शिद, दिल्लीचे खासदार संदीप दीक्षित यांच्या मदतीने त्या वेळी लोकपाल विधेयकाचा मसुदा बनवण्यात आला होता.
भय्यूजी महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply