आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. त्यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली. पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,”बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये.
पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे – ”येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.” यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली. माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं.
बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.”
काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ”आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.”
आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. ‘बालगंधर्व’सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक ‘जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply