माझे बाबा पोलीस अधिकारी असल्याने त्यांची बदली होईल त्या शहरात आम्हाला बिऱ्हाड घेऊन जावं लागायचं. तिसऱ्या ईयत्ते पर्यंत गावातल्या ज़िल्हा परिषद शाळेत शिक्षण आणि तशातच मला ऱ्हुमॅटिक हार्ट डिसीस जो प्रति एक हजार मुलांपैकी पाच ते सहा जणांना असतो असा आजार होता. थोडक्यात सांगायचे तर हृदयाला छिद्र होत, पण हा काही असाध्य रोग नव्हता. त्याच्यावर सलग पाच वर्ष दर एकवीस दिवस पेनिसिलीन या औषधाचे इंजेक्शन घेऊन मी पूर्णपणे बरा आणि धडधाकट होत गेलो. बाबांच्या बदलीमुळे गावातल्या ज़िल्हा परिषद शाळेतल्या तिसरी नंतर नाशिक जिल्ह्यात मनमाडला चौथी, मालेगावला पाचवी तिथून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबागला सहावीत दोन आठवडे काढल्यावर श्रीवर्धनच्या जिल्हा परिषद शाळेत सहावी पास झालो. श्रीवर्धनला सहावीत असताना शैक्षणिक वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदरच बाबांचे पीएसआय वरून इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन झाले आणि त्यांची बेलापूर ला कोकण भवन मध्ये सी आय डी डिपार्टमेंटला बदली झाली. पुढे अलिबागला पोस्टिंग होऊन माझे अकरावी बारावी सायन्सची दोन वर्ष अलिबागच्या जे एस एम कॉलेज मध्ये जाईपर्यंत, सातवी ते दहावी एकच शाळा नेरुळ नवी मुंबईतल्या सेंट झेवियर्स मराठी माध्यमातून मिळाली.
माझ्या बाबांना त्यांचे मित्र तसेच पोलीस स्टेशन मधील सगळेच लोकं बोलायचे की तुम्ही तुमच्या दोन्हीही मुलांना इंग्रजी माध्यमातून किंवा कॉन्व्हेंट मधून का नाही शिकवले कारण असं सांगणाऱ्या आणि सुचवणाऱ्या बहुतेक जणांची मुलं कॉन्व्हेंट किंवा इंग्लिश मिडीयम मध्येच असायची. बाबा त्यांना म्हणायचे मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलो, घरात आम्हाला इंग्रजी बोलता येत नाही मुलांना काय समजावणार. निदान मराठीतून त्यांच्या अभ्यासक्रमात काही अडलं तर सांगता तरी येईल. पण माझ्या बाबांनी किंवा आईने कधीही आमचा अभ्यास घेतला नाही की एवढेच मार्क मिळवा, नंबर आला पाहिजे की दिवस रात्र अभ्यास करा असा त्रागा केला नाही.
माझ्या आजारपणामुळे माझी खूप काळजी घेतोय असंही कधी जाणवू दिले नाही. मनमाडचा अपवाद वगळता शाळेसाठी कधी रिक्षा नव्हती लावली की सोडायला आले नव्हते. मनमाडला शाळाच एवढी लांब होती आणि महामार्गाच्या पलीकडे असल्याने तिथे बाबांचे वरिष्ठ अधिकारी ज्यांनी बाबांना मोठे भाऊ म्हणून मानले आणि आम्हाला काका म्हणून माया लावली असे पवार काका यांनी रिक्षाची सोय केली. एरवी सगळ्या शाळांत इतर मुलांसोबतच शाळेची पायी पायी स्वारी नाहीतर सायकलने वारी. शाळेचे वेळापत्रक असे होते की आम्ही रिक्षाने जायचो पण आई मधल्या सुट्टीत दुपारच्या जेवणाचा डबा घेऊन दोन किलोमीटर चालत यायची आणि तेवढच अंतर पुन्हा चालत जायची.
बाबा पोलीस अधिकारी असले तरी त्यांना रजा मिळाली की आम्ही सगळेच गावाला जायचो शेतीची कामं सुरु असली की आम्हाला त्यांच्यासोबत शेतात न्यायचे. आम्ही लहान असताना आमच्याकडे तीन तीन बैलजोड्या असायच्या, बाबा शेतात नांगर हाकलायचे आणि आम्ही नांगर जमिनीत खोलवर जावा म्हणून त्यावर वजन ठेवलेला दगड काढून त्याऐवजी स्वतःच बसायचो. जसजसे मोठे व्हायला लागलो तसतस शेतात नांगर आणि बैलगाडी पण हाकलायला लागलो. त्यामध्ये कसलाही कमीपणा किंवा आळस येत नव्हता. बाबा शेतात घेऊन जायचे त्यामुळे शेतीची नुसती आवड न राहता शेतीबद्दल एक आत्मीयता निर्माण झाली, पेरलं तर उगवते आणि मेहनत केल्यावर भरभराटी होते याची जाणीव निर्माण झाली. आज जेव्हा पंधरा वर्षांपूर्वी स्वतः लावलेल्या फणसाच्या झाडाला फणस लागतो, नारळाच्या झाडावरच्या शहाळ्यातले गटागटा पाणी पितो तेव्हा असा काही आनंद होतो की त्याचे वर्णन नाही करता येणार. आमच्या भातशेतीला आणि भाजीपाल्याच्या मळ्यावर कामासाठी नेहमी मजूर आणावे लागतात पण मजूर असूनही बांधावर उभं राहून हे करा ते करा सांगण्याऐवजी त्यांच्या सोबतच काम करण्याची सवय बाबांनी लहानपणापासून लावली.
स्वतःच्या गावातील एकत्र कुटुंब पद्धतीतील आमच्या घरातील वातावरण सोडून, मनमाड, मालेगाव, श्रीवर्धन, अलिबाग आणि नवी मुंबई आणि नंतर डिग्री करताना दादर मुंबईतील वातावरण, राहणीमान, गावातील आणि शहरातील संस्कृती,भाषा सगळ्याशी अडजस्टमेंट करावी लागली. किती मित्र बदलेले, किती शेजार पाजार बदलले आणि किती तरी घरं बदलली. प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन आणि वेगळे अनुभव. श्रीवर्धन मध्ये तर आमचे घर एका मुस्लिम घरमालकाचे होते तेसुद्धा भर मोहल्ल्यात पण तिथं असताना वर्ष कसे निघून गेले ते कळलेच नाही.शेतीची कामं असल्यावर आणि त्यातच मोठ्या काकांना कॅन्सर निघाल्याने आई आठ ते दहा दिवस गावाला जाऊन राहायची. बाबांना रजा नसायची आणि आम्हाला शाळेला सुट्टी नसायची त्यामुळे आई घरात नसताना जेवण बनवण्यापासून ते घरातली सगळी कामं बाबा आणि आम्ही दोघे करायचो.
जहाजावरील करियर बद्दल माहिती होईपर्यंत इंजिनियर म्हणून ठाण्याच्या पनामा ब्लेड कंपनीत प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये असल्याने ब्लेड बनवायला लागायचे. तिथं इंजिनियर म्हणून काम करण्याऐवजी कामगारांसोबतच मशीनवर प्रोडक्शन करायला लावत. कामगार आणि इंजिनियर किंवा मॅनेजमेंट यामध्ये कुठल्याही कंपनीत एक दरी असते पण मला त्याच्याने फरक नाही पडला, अनुभवी आणि कुशल कामगारांना दादा, भाऊ करता करता त्यांनी मशीनबद्दल एवढी माहिती दिली की त्यांच्या पेक्षा जास्त प्रोडक्शन माझ्याकडून व्हायला लागले मग आठ तासाच्या शिफ्ट मधील माझे काम तासभर अगोदरच संपू लागले. त्यावेळेस कामगार लोकं बोलायला लागले की अरे बाबा तू प्रोडक्शन रेट वाढवला तर मॅनेजमेंट आमच्या सगळ्यांच्या मागे प्रोडक्शन वाढवा म्हणून मागे लागतील. पण मला मॅनेजमेंट ने नवीन मशीन च्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट साठी दुसऱ्या प्लांट मध्ये पाठवले तिथं अजूनच चांगला अनुभव आला ज्यामध्ये छोटे छोटे बदल करून इम्प्रुव्हमेंट कशी करायची मशीन कडून जास्तीत जास्त आउटपुट घेताना मशीन कशी सुरक्षित राहील याकडे सुद्धा तेवढेच लक्ष द्यायचे. पण सहा माहिन्यात शिपिंग करियर बद्दल माहिती मिळाली आणि प्री सी ट्रेनिंगला अडमिशन कन्फर्म झाल्यावर पुढील दोन महिन्यात पनामा ब्लेड कंपनी सोडली. प्री सी ट्रेनिंग ला वर्षभर पहिल्यांदा हॉस्टेल मध्ये राहण्याची वेळ आली. संपूर्ण भारताच्या जवळपास प्रत्येक राज्यातून आलेल्या सगळ्या बॅचमेट सोबत असं काही जुळलं की एक वर्ष स्पोर्ट्स आणि दंगामस्ती आणि लेक्चर किंवा प्रॅक्टिकलना झोपा काढण्यातच भुर्रकन उडून गेले.
सव्वाशे जणांच्या बॅच मध्ये बहुतेक बॅचमेट इंग्रजी माध्यमातून शिकलेले होते पण माझ्यासारखे मराठी माध्यमातून शिकलेले होते आणि इंग्लिश बोलता येत नाही असे दहा बारा जण होतेच. इंग्रजी बोलता येत नाही शाळेत आणि कॉलेज मधील ऍव्हरेज मार्क्स आणि डिग्रीला मिळालेला एक वर्षाचा ड्रॉप आणि आठही सेमिस्टरना लागलेल्या केट्या यामुळे जिथं काम करावं लागेल तिथं अडजस्टमेंट करावीच लागणार होती.
सुदैवाने बरेचसे वरिष्ठ अधिकारी चांगलेच मिळाले. फक्त एका जहाजावर जुनियर रँक मध्ये असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रास दिला, त्रास म्हणजे त्यांच्या सोयीसाठी आम्हा जुनियर अधिकाऱ्यांना कधीही ड्युटी लावायला लागले महत्वाचे काम असल्यावर काही चुकी झाल्यास स्वतः हजर न राहता त्याची जवाबदारी आमची राहील असे सांगायला लागले. दिवसातून आठ तासा ऐवजी बारा तास वॉचची ड्युटी पण करायची आणि कामांची जवाबदारी पण घ्यायची या गोष्टींचा अतिरेक झाला आणि त्यांना सरळ सांगितले असं करणे शक्य तर नाहीच, त्याहीपेक्षा योग्य सुद्धा नाही. कंपनीला जे कळवायचे ते रिपोर्ट बनवून कळवा आणि पाहिजे तर मला घरी पाठवा. पण नंतर त्यांनाच मला अडजस्ट करण्याची वेळ आली कारण माझ्यासाठी स्वतःला अडजस्ट करा नाहीतर मलाच घरी पाठवा असं सांगितल्यावर ते ठिकाणावर आले. सेकंड इंजिनियर दुपारी चार ते आठ आणि पहाटे चार ते आठ वॉच करायला तयार झाला. आमची सुद्धा दिवसातून आठ ऐवजी बारा तास वॉच कारण्यापासून सुटका झाली.
प्रत्येक वेळी आपणच अडजस्टमेन्ट करायची नसते हे सिद्ध करणारा हा अनुभव असा होता की ज्यामुळे कारण नसताना कोणाचा त्रास किंवा जॉब हरासमेन्ट होत असेल तर वेळ जायच्या अगोदरच ते टाळता येऊ शकते याचे चांगले उदाहरण देऊन गेला.
आईने अनंत सामंत यांनी लिहलेली एम टी आयवा मारु ही कादंबरी प्री सी ट्रेनिंग कोर्स सुरु व्हायच्या पहिले वाचायला सांगितली होती त्यामध्ये असलेले जहाजाचे वर्णन आणि काम करणाऱ्या लोकांची असलेली मानसिकता याचा थोडासा अंदाज आला होता. परंतु प्रत्यक्ष जहाजावर काम केलेला कोणी नातेवाईक नव्हता की माहिती सांगणारं देखील कोणी नव्हतं. गेटवे ऑफ इंडिया जवळ नांगर टाकून उभी असणारी मोठं मोठी जहाजे मांडव्याला भाऊच्या धक्क्यावरून रेवस मार्गे लाँचने मामाकडे जाताना लहानपणापासून बघितलेली एवढेच काय ते जहाजांबद्दलचे कुतूहल होते. 2008 मध्ये काम करण्यासाठी पहिल्यांदा प्रत्यक्ष जहाजावर पाऊल ठेवले त्याअगोदर वर्षभरापूर्वी भारतीय नौदलाच्या जहाजांवर ट्रेनिंगच्या निमित्ताने पाठवले जायचे पण तिथं काहीच शिकता आले नाही ट्रेनिंग चा भाग म्हणून जायचं आणि वेळ काढून परत यायचं.
पण जहाजावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी सुरुवात झाली आणि आयुष्यातल्या स्वतःच्याच अडजस्टमेंटला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. खराब हवामानात जहाज उंचच उंच लाटांमुळे हेलकावयाला लागले की पोटात भीतीचा गोळा यायचा पण तो तेवढ्यापुरताच, वादळ वारा शांत झाला की जहाज पुन्हा वादळापूर्वीच्या गतीने अथांग समुद्राला चिरत पुढे निघायचे. विविध धर्म, जाती आणि राज्यातल्या लोकांसोबत अड्जस्ट होता होता दुसऱ्या देशातल्या लोकांसह सुद्धा अडजस्ट व्हायला कोणतीच अडचण आली नाही. अडजस्टमेंट म्हणजे तडजोड किंवा माघार असा अर्थ न घेता येईल त्या परिस्थितीशी जुळवून आणि सांभाळून घेणे असा घेतल्याने आज समाधान लाभतंय.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply