नवीन लेखन...

अॅडव्होकेटांची बासुंदी

अ‍ॅडव्होकेट कानविंदेंनी बासुंदीची रिकामी बरणी खडखडवली आणि ते आत गेले. दुसरी भरलेली बरणी घेऊन ओट्यावर आले.

आजुबाजूची घरं पाडली गेलेली होती आणि ओट्यापर्यंत कसाबसा यायचा चिंचोळा मार्ग होता. पण तरीही पुण्याचे चोखंदळ रसिक किंवा फॅडिस्ट म्हणा हवं तर,रांग करून बासुंदी खरेदी करत होते. खवल्याखवल्यांची रवाळ बासुंदी ‘प्रत्येकी 1 लिटरपेक्षा जास्त मिळणार नाही ’अशी पुठ्ठयावर काँप्युटर प्रिंट चिकटवून पाटी लावलेली; आणि दाराच्या दुसर्‍या बाजूला प्रिंटआउट दुसर्‍या पुठ्ठयावर चिकटवलेली आणि खाली बारीक अक्षरात ‘100रु. लिटर. वेळ ‘संध्याकाळी 6 ते 8’असं लिहिलेलं. अ‍ॅडव्होकेट कानविंदेंनी प्रॅक्टिस बंदकरून वीस वर्ष झालेली; आणि आता हा धंदा सुरू केलेला. प्रॅक्टिस पेक्षा खूप जास्त पैसे मिळायला लागले.

मिलॉर्ड! माझं असं म्हणणं आहे की, रोज तीस लिटर बासुंदी तीस जणांना विकून मी चाळीस गुणिले 50 असे 2000 रुपये, आणि महिन्याला 2000 गुणिले तीस असा 60000 रुपयांचा नफा कमावतो; तर त्यात कोर्टाचा अपमान कसा होतो? कंटेंप्ट ऑफ द कोर्ट? ही तर माझ्या मामाची देणगी.  माझ्या वडिलांच्या कचाट्यातून सुटून माझ्या आईनं मला मामाकडे दिलं, आणि त्याच्या बरोबर लग्नात फिरत फिरत मी स्वैंपाक करायला शिकलो. बासुंदी करायला शिकलो; पण मामाला मला अ‍ॅडव्होकेट बनवायचं होतं. मिलॉर्ड, सुधीरमामा म्हणायचा, सगळ्यांत वाईट काय माहितीय? गरीब म्हणून जन्माला येणं, ते देखील भारतात, आणि गरीब असताना भारतात पोलिसांच्या तावडीत सापडणं, मिलॉर्ड! मिलॉर्ड, मला हे तेव्हाच कळलं कसं नाही, की इन्स्पेक्टर धायगुडेंशी तुमचं आधीच संधान आहे म्हणून? मिलॉर्ड – साला हरामखोर रमण, तू माझा रुममेट, लॉ कॉलेज होस्टेलचा, तू कसला मिलॉर्ड? प्रत्येक परीक्षेत दोनदा आपटी खाऊन कसाबसा बॅरिस्टर झालास; अन माझ्या पुढे उभाराहतो होऽयरे भडव्या! मिलॉर्ड म्हणे मिलॉर्ड!

“अहो, द्याकी असे काय पाहताय?”

अ‍ॅडव्होकेट कानविंदे दचकून भानावर आले.  त्यांनी शेवटच्या चरवीतली बासुंदी निपटून काढून समोर उभ्या असलेल्या तरुणीच्या बरणीत ओतली.

***

झोकांड्या खात गणेश ऊर्फ बाळू वीसची नोट हातात विजयपताकेसारखी नाचवत, टळटळीत उन्हात बाहेर पडला, आणि रमा कोपर्‍यात कण्हत पडलेल्या नितीन कडे गेली. भिंतीतून बाहेर आलेल्या खांबाची कड लागून त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूनं रक्त येत होतं. मग मात्र रमाला राहवलं नाही. ती स्फुंदून-स्फुंदून रडत राहिली, आणि नितीन स्वतःच्या वेदना विसरून तिचे डोळे पुसत राहिला.

गेली दोन वर्ष ती हे सगळं सहन करत होती. आज नाही उद्या – कधी तरी गणेश ताळ्यावर येईल. दोन वर्षापूर्वीचा गणेश आपल्याला परत मिळेल, या आशेवर ती सगळं सहन करत होती. पण आज अगदी कडेलोट झालेला होता. गणेशचा सुशिक्षित लोकांविषयीचा तिरस्कार तिला माहीत होता. पण नितीनतर त्याचा स्वतःचा मुलगाच होता नं?

आणि मग तिला गणेशची जळजळीत नजर आठवली, त्याचा दारुच्या नशेत बरळणारा स्वर आठवला; आणि कानांत उकळतं तेल ओतल्यासारखं ते वाक्य तिच्या मेंदूचा स्फोट करून पुन्हा एकदा आरपार गेलं. स्वतःच्या असहायतेची तिला किळस आली. तिच्या मनात एक ठिणगी पडली आणि वणवा भडकला. एकाएकी ती अश्रू पुसून उभी राहिली. मार खाल्ल्या मुळे दुखणार्‍या अंगाकडे दुर्लक्ष करून तिनं भराभर आवरा आवर सुरू केली. एक जुना, जीर्ण पंचा फाडून त्याची दुहेरी-तिहेरी पट्टी करून, जखमेत हळद भरून नितीनची जखम त्या पट्टीनं घट्ट बांधली. पत्र्याची गुलाबी फुलं रंगवलेली पेटी खाली काढून त्यात आपलं तुटपुंजं सामान ती भरायला लागली.

“नितीन, आता आपण इथं राहायचं नाही. आपण सुधीर मामाकडे जाऊ. तो तुला शिकवेल, कळलं? नाहीतर तुझा बाप तुला मारूनच टाकेल!”

“होऽ! छानच! मला सुधीरमामाकडेच राह्यचं! तू पण! आपण दोघंहीजाऊ.” नितीन खूष होऊन म्हणाला. त्यानं आपली वह्या-पुस्तकं, दोन चार कपडे आणून पेटीत टाकले.

तेवढ्यात दार पुन्हा खाऽड्कन उघडलं. झोकांड्या खात गणेश आत आला. पेटी बंद करून कडी सुतळीनं बांधणार्‍या रमाकडे डोळे विस्फारून पाहात राहिला. मग एकाएकी कोपर्‍यात गेला आणि तिथली जाड लोखंडी कांब – जी त्यानं एका बांधकामाच्या साईटवरून चोरून आणली होती अन जी तो किलोनं विकणार होता – हातात घेऊन ती उगारून तो रमाच्या अंगावर धावून आला.

“स्सालीऽऽ! मला सोडून जाते?? हरर्रामजादीऽ!”

पण नितीन धावून पुढे गेला. त्यानं आपल्या डोक्यानं गणेशच्या पोटात धडक दिली. गणेश हेलपाटला. त्याच्या हातातली कांब रमानं हिसकावून घेतली आणि एक तडाखा गणेशच्या डोक्यावर मारला. गणेश हेलपाटत खाली पडला. रक्त आलेलं नव्हतं. पण जमिनीवरच बरळत, वळवळ करत गणेश पडून होता. त्याला तसाच टाकून रमानं नितीनचा दंड धरला आणि पेटी घेऊन वेगानं ती एस.टी. स्टँडकडे निघाली.

***

औरंगाबादला सुधीरमामा स्वयंपाकी होVm. कामाक्षी हॉटेलात संध्याकाळी चार तास आणि अशोक हॉटेल मधे सकाळी चार तास, असा तो काम करायचा. मकबर्‍याजवळ एक खोली घेऊन राहात होता. संध्याकाळी पोचलेली रमा रात्री जरा उशीर होईपर्यंत मुद्दाम स्टँडवरच थांबली आणि मग सुधीर मामाच्या खोलीवर गेली. तिला आईवडील नव्हते. ही सुधीरमामाची खोली, हेच तिचं माहेर होतं. सुधीर चक्रावला. आधी चिडला. मग शांत झाला.

“जाऊ नकोस आता तू परत!” तो म्हणाला, आणि रमाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले. तिनं नितीनकडे पाहिलं. किती हुबेहूब आपला चेहरा घेतलाय यानं! थोडा देखील बापासारखा दिसत नाही! पूर्ण आईवर गेलाय! म्हणूनच जेव्हा गणेश म्हणाला होता “कशावरून माझा मुलगा? तू कुठंतरी शेण कशावरून नाही खाल्लंस? बोऽल!”

तेंव्हा रमाचा तोल गेला होता. तिच्या मनात वणवा पेटला होता. आणि त्या वणव्यात जळणारं घर मागे सोडून ती आता सुधीरकडे आली होती! आणि सुधीरदेखील आपल्याला हाकलून देईल की काय ही भीती खोटी ठरवून सुधीरनं तिला पूर्णपणे आधार दिलेला होता. सुधीरचं आडनाव, म्हणजेच रमाचं माहेरचं आडनाव होतं कानविंदे! अन सासरचं मोरे!

अ‍ॅडव्होकेट कानविंदेंनी दार लावून घेतलं; आणि बरण्या बांधून आतमधे नेल्या. चारही बरण्या नळ सोडून स्वच्छ धुतल्या. ही देखील सुधीरमामानं लावलेली सवय. बरणीत एक कण देखील आधीच्या बासुंदीचा रहायला नको. कारण दुधाचे पदार्थ कधी नासतील सांगवत नाही. चारही बरण्या कट्टयावर पालथ्या करून ठेवल्या, आणि मग ते आपल्या झोपायच्या खोलीत भिंतीवर लावलेल्या आरशापुढे उभे राहिले. बनियन काढून केसाळ ढेरीवर त्यांनी चार पाच थापट्या मारल्या. दात विचकून स्वतःच्याच प्रतिबिंबाला त्यांनी हसून दाखवलं आणि मग शिसवी लाकडाच्या जुनाट पण भारदस्त कपाटातून हँगरवरचा सिल्कचा कुर्ता आणि खाली घडी करून ठेवलेल्या चळतीतला इस्त्रीचा पायजमा काढून, ते कपडे चढवून, खिशात पाकीट, रुमाल ठेवून ते गजोधरभय्याच्या बंगल्यावर त्यांच्या संध्याकाळच्या मैफलीसाठी निघाले.

बंगल्यावर सगळे जमलेलेच होते. अजून गप्पाच चालल्या होत्या. आज जिलेबीचा बेत असावा. आतून साजूक तुपाचा जिलब्या तळल्याचा भन्नाट वास येत होता. एवढ्यात तुकाराम चिलीम झटकत, वर तोंड करून झुरके मारत पेटवत पेटवतच दारातून बाहेर आला, अन एक भरगच्च कश मारून त्यानं चिलमीवर दाबलेली नारळाच्या काथ्याची गुंडी बोटांनी झटकून खाली टाकली – ती ठिणग्यांच्या मोहोळानं जमिनीवर पडली – आणि मस्त रसरशीत पेटलेली चिलीम त्यानं गजोधरभय्याच्या हातात दिली. प्रशस्त वेताच्या खुर्चीत एक गुडघा वर करून बसलेल्या गोर्‍यापान, गोटीबंद, तालमीत तयार शरीराच्या गजोधरनं ती चिलीम घेतली आणि एक नितळ झुरका असा मारला की चिलमीवर निळी ज्योत क्षणभर जिवंत झाली. ती चिलीम त्यानं आपल्या उजवीकडच्या वेताच्या खुर्चीत बसलेल्या मलकानीकडे दिली. मलकानी चुकुरचुकुर करून चिलीम ओढायचा अट्टाहास करत असतानाच गजोधरनं धुराचा एक बारका ढग सोडला, गपकन, परत अर्धा अधिक आत घेऊन छातीतच जिरवला आणि जिलेबीच्या वासात गांजाचा गोड वास मिसळला गेला. मलकानीनं चिलीम अ‍ॅडव्होकेट कानविंदेंकडे दिली. कानविंदेंनी वेताच्या खुर्चीत ऐसपैस पसरत झुरका मारला आणि चिलीम उजवीकडच्या सायंटिस्टकडे दिली. सायंटिस्टनं ती वरूनखालून निरखली. छापी सोडून पिळली. दोन बारीक थेंब पाणी काढलं. छापी पुन्हा गुंडाळून एकसायंटिफिक लांब झुरका घेतला, आणि ती शेजारच्या दैववादी ऊर्फ जी.ए. ऊर्फ अलमख्तूब कडे दिली. जी.ए. नंतर ती नेते हंबीररावगंभीर यांच्याकडे दिली. त्यांनी ती तत्त्वज्ञ चार्वाककडे दिली, आणि तत्त्वज्ञ चार्वाकनं वेताच्या खुर्चीतून पुढेझुकून ती जमिनीवर उकिडव्या बसलेल्या तुकारामच्या स्वाधीन केली. तुकारामनं शेवटचा लालबुंद झुरकामारुन तशीच ती तळहातावर आपटून रिकामी केली, आणि तो भिंतीला टेकून गुडघे उंचावून बसला आणि आधी छापीनं खडा साफ करून मग गाठ बांधलेली सुतळी चिलमीतनं ओवून तिचं एक टोक पायाच्या अंगठ्यात अडकवून दुसरं टोक दातात धरून त्या ताणलेल्या सुतळीवर ओवलेली चिलीम वर खाली करत हातानं दाबून गरागरा फिरवत साफ करायला लागला. जिलेबीचा अजून एक घाणा पाकात पडल्याचा वास आला, आणि नवीन जिलब्या शुद्ध तुपात पडल्याचा आवाज मंदपणे येत राहिला. “आता मोठी भर. चार राऊंड तरी चालली पाहिजे.”

गजोधरभय्या म्हणाले. तुकारामनं ‘व्हय ’म्हटलं आणि तो साफ केलेली चिलीम घेऊन आत गेला. गेली चार वर्ष गजोधरभय्या, अ‍ॅडव्होकेट, मलकानी, सायंटिस्ट, जी.ए., हंबीरराव, चार्वाक आणि तुकाराम आणि हो, जनार्दन स्वयंपाकी, यांचा हा क्लब बिनबोभाट चाललेला होता. संध्याकाळी सहा-सातला सगळे एकत्र जमायचे आणि मग 12-1 कसे वाजायचे कळायचंच नाही. सगळे पक्के गांजेकस, अन गजोधरचा तर धंदाच होता तो. वडिलांबरोबर यूपीतून आलेल्या गजोधरनं पान दुकान चालवता चालवता गांजाच्या पुड्या विकायला सुरूवात केली आणि ते चांगले गडगंज झाले, अन आज आता गजोधरची पुण्यात दहा पान दुकानं अन हा एक मस्त बंगला! गजोधर पन्नाशीचा. बायको वारलेली. दोन्ही मुलं अमेरिकेत इंजिनियर. गजोधर स्वतःपण जाऊन आला; पण त्याला तिथे काही करमलं नाही.

अजूनही त्याचा गांजाचा धंदा मस्त चाललेला होता. सगळे पोलीस बांधील आणि गजोधर स्वतः तर गांजाचा धंदा करणं म्हणजे शंकराची भक्तीच समजायचा! बंभोले! अमेरिकेतल्या इंजिनियर मुलांशी संबंध तसा नाहीच. गजोधरनं स्वतःच तोडून टाकलेला.

तुकाराम दणकट, लांबलचक मोठी चिलीम पेटवत आला तेव्हा बुद्धिवादी फाटकातून आत आला. हा मैफलीतला नवीन भिडू दोन महिन्यांपासूनचा. मैफलीतला एकेक म्हणजे गाळीव रत्न! बुद्धिवादीची चमक अजून सगळ्यांना कळायची होती. तसा सगळ्यांना तो सपक,  गुळमटच वाटलेला. हंबीररावांच्या ओळखीचा म्हणून एकदा आलेला अन सामील झालेला.

गजोधरभय्या सोडला तर सगळे उच्च विद्याविभूषित – अ‍ॅडव्होकेट -एल.एल.बी., मलकानीसी.ए., सायंटिस्टएम.एस्सी., जी.ए. इंग्लिश अन फ्रेंचचे एम.ए., हंबीरराव एम.ए.बी.एड., चावार्क फिलॉसॉफिचा एम.ए., अन बुद्धिवादी तर्कशास्त्राचा माजी प्राध्यापक. पण मैफलीचा खरा सूत्रसंचालक गजोधर! मिठ्ठास वाणीनं सगळ्यांशी बोलून मैफिलीला रंग आणणारा, खराखुरा बनारसी पानवाला!

अन गांजाच्या व्यसनानं सर्वांना एकत्र बांधलेलं!

बम्भोले!

“काय मग बुद्धिवादी”हंबीरराव म्हणाले – तसं बुद्धिवादीचं नाव कीर्तनी. “काढा शंभर रुपये! हरला की नाही तुम्ही मागच्या आठवड्यातली पैज?”

“हो, हरलो खरा! हे घ्या शंभर रुपये!” बुद्धिवादी उर्फ कीर्तनींनी शंभरची नोट हंबीररावांना दिली आणि ते बाजूला रिकाम्या असलेल्या दोन तीन वेताच्या खुर्च्या पैकी एक घेऊन वर्तुळात बसले.

नवीन चिलीम फिरायला लागली.  “कसली पैज होती?”

“गेले दोन दिवस टीव्हीवर सतत दाखवली जात होती ती बातमी कालच्या आजच्या कुठल्याही पेपरात नसणार असं मी म्हणत होतो.” हंबीरराव म्हणाले.

“आणि मला खात्री होती की निदान इंडियन एक्स्प्रेसमधे तरी ती बातमी असेल म्हणून.” बुद्धिवादी म्हणाले.

“कोणती बातमी?”

“ती गाझियाबादची बातमी. एका मुलीला किडनॅप करून दोन दिवसांनी तिच्या घरापाशी बेशुद्ध अवस्थेत फेकून दिलं होतं, आणि त्या आधी एक दिवस ती गायब असल्यानं तिची चौकशी करायला तिचा एक चुलत भाऊ गेला होता, तर त्यालाच एका पोलिसानं भर रस्त्यात बेशुद्ध होई पर्यंत बडवून काढलं. सारखं वेगवेगळ्या चॅनेल्सवर दाखवत होते पहा!”

“होऽ!” चार्वाक म्हणाला, “मागे पाटण्याला 2000 रुपये महिना पगारावर कित्येक वर्ष काम करणार्‍या शिक्षकांनी पगार वाढवावा म्हणून मोर्चा काढला होता, तेव्हा पोलिसांनी शिक्षकांना घेराव घालून, पकडून भयंकर बडवून काढलं होतं. ती बातमी पण पेपरात कधी आलीच नाही!”

“म्हणजेच,” हंबीरराव म्हणाले, “मी जे म्हणतोय ते खरंय नं! इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांच्या मधे एक मोठ्ठी दरी निर्माण होतेय. प्रिंट मीडियात आजकाल काही विशेष बातम्याच नसतात!”

“हो! प्रिंट मीडिया सगळा सरकारनं विकत घेतल्यासारखा वाटतोय!”

“हॅऽ! प्रिंट मीडिया. आता विकत घेण्याच्याही लायकीचा राहिला नाहीय!”

“अल्मख्तूबमख्तूब! जे लिहिलंय ते लिहिलंय! तसंच अल छप्तूब छप्तूबअसलं पाहिजे! नाही का,  जी.ए.?  हॉहॉहॉ… म्हणजे जे छापलंय ते छापलंय!”

“तुम्हाला खोटं वाटतंय…” जी.ए. चिलीम पुढे देत जड आवाजात म्हणाला, “पण आता या चिलमीतून धुराचा जो आकार अवकाशाच्या ज्या बिंदूमधून आताच्याक्षणी असा असा पसरणार आहे हे सगळं आधीच ठरलेलं होतं! प्रत्येक पानाची हवेनं होणारी हालचाल. प्रत्येक अणू-परमाणूची प्रत्येक क्षणाची स्थिती, सगळं काही पूर्वनियोजित! मी आत्ता बोलतोय हे देखील!”

“कठीण आहे! विश्‍वास नाही बसत!” बुद्धिवादी म्हणाला.

“पण असू दे नं!” अ‍ॅडव्होकेट म्हणाले, “त्यानं आपल्या जगण्यात काय फरक पडतो? पण आधीच्या आपल्या विषयावर या! तुम्हाला आठवतंय, तीन वर्षापूर्वी मी काय म्हटलं होतं?”

“क्याऽकहाऽथा? अ‍ॅडव्होकेटजी? तीन साल पहेलेकाऽ याद थोडाही रहेगा?”

“आठवत नाही? जोरात लघवी लागलेली असताना ती दाबायचा प्रयत्न करत असल्यासारखा या पायावरून त्या पायावर वजन टाकत, ऑक्सफर्डचा निळा झगा घालून सगळं जग ऐकत असताना बोललेला, तो ज्या देशाचा पंतप्रधान आहे, त्याच देशावर भुंकत टीव्हीवर बोललेला तो म्हातारा तुम्हाला आठवत नाही?”

सगळे खदाखदा हसले.

“पण त्याच्या म्हणण्यात चुकीचं काय होतं?” मलकानी म्हणाला.

सगळ्यांना तीन वर्षापूर्वी रंगलेला तो वादविवाद आठवत होता. सोनिया गांधी नुकतीच निवडून आलेली होती, आणि तिनं मनमोहनसिंगला पंतप्रधान बनवलं होतं. त्याला सुद्धा दोनेक महिने झाल्यानंतर मनमोहन ऑक्सफर्डला कुठल्यातरी फंक्शनला गेला होता आणि तिथे त्यानं “व्हेन रुलिंग इंडिया, ब्रिटिश गव्हर्नन्स वॉज जस्ट अँड व्हेरी गुड.” म्हणजे “भारतावर राज्य करताना ब्रिटिश कारभार हा चांगला आणि न्याय्य होता”अशा अर्थाचं काहीतरी भाषण केलं होतं.  आणि नेमकं ते टीव्हीवर पाहून अ‍ॅडव्होकेट कसले चिडले होते!

बुद्धिवादी म्हणाला, “काय बोलताय तुम्ही? कसला वादविवाद झाला होता?”

“ते खरं असो किंवा खोटं!” अ‍ॅडव्होकेट चिडून म्हणाले, “भारताच्या पंतप्रधानानं ब्रिटिशांची गुलामगिरीच चांगली होती, सध्याच्या परिस्थिती पेक्षा, असं म्हणणं बरोबर आहे का? मग कशाला झक्मारायला स्वातंत्र्य मिळवलं?”

“पण स्वातंत्र्य ‘मिळवलं ’हे कुणी सांगितलं?” बुद्धिवादी म्हणाला, सगळे त्याच्याकडे पाहायला लागले. बुद्धिवादी म्हणाला, “स्वातंत्र्य‘ मिळालं’ ते कसं तर ब्रिटिशांनी भारतातली सगळी संपत्ती लुटली, आणि लूटमार करायला काही उरलं नाही, अन लूटमार करणं जरा खर्चिक व्हायला लागलं तेव्हा ते निघून गेले.”

जरा शांतता पसरली आणि मलकानी चुकुर्रचुकुर्र करून चिलमीचा झुरका मारत राहिला. “हो नं! साऊथ आफ्रिकेत देखील ब्रिटिशांनी हेच केलं! दक्षिण आफ्रिकेला लुटून ते निघून गेले. तुम्हाला काय वाटलं, ते नेल्सन मंडेलाला किंवा महात्मा गांधीना किंवा- हाःहाःहाः! -पंडित नेहरूंना घाबरून परत गेले? तसं तुम्हांला वाटत असलं तर फारच बालिश आणि मूर्ख आहात तुम्ही!” बुद्धिवादी म्हणाला.

“तेच म्हणतोय मी!” अ‍ॅडव्होकेट खूष होऊन म्हणाले, “ब्रिटिशांची तुलना करायची तर चंगीझखान आणि त्याच्या टोळीशी करायची! तर आपले मनमोहनसिंग त्यांना प्रशस्तिपत्र देतायत!”

“हो का?” मलकानी म्हणाला, “सतीची प्रथा कुणी बंद केली? सर्व्हे ऑॅफ इंडिया कुणी स्थापन केला? इरिगेशन डिपार्टमेंट, पी.डब्ल्यू.डी., भारतीय रेल्वे, विमानतळ, धरणं, कालवे, हे सगळं कुणी केलं? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या इंन्फ्रास्ट्रक्चरमधे तुम्ही गेल्या साठ वर्षात पाच टक्क्यांची सुद्धा भर घालू शकला नाही, ते इन्फ्रास्ट्रक्चर कुणी निर्माण केलं?”

“ते तसं निर्माण व्हायचं अनादी काळापासून ठरलेलं होतं, म्हणून झालं!” जी. ए. ठामपणे म्हणाला.

“जी.ए., जी.ए.!” अ‍ॅडव्होकेट म्हणाले,

“तुम्ही तुमचा दैववाद आता ठेवा जरा बाजूला. आणि मलकानी, उगाच कायतरी स्टॅटिस्टिकल थापा मारू नका! उलट भारताची जी प्रचंड प्रगती झालीय. ती गेल्या साठ वर्षातच झालीय! ब्रिटिशांनी इरिगेशन डिपार्टमेंट उभारलं; पण शंभरवर्ष त्या पाण्यावर पिकवलेलं ते धान्य इंग्लंडलाच पाठवलं ना! भारताची सगळी समृद्धी लुटून नेणं, यासाठी अगदी कमीतकमी आवश्यक, अगदी बेअर नेसेसिटी – ते सगळं त्यांनी केलं; पण कारकून निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था त्यांनीच तयार केली. इंजिनिअरिंग, मेडिसिन, आयआयटीज्, सायन्स इन्स्टिट्यूट्स, स्पेस रीसर्च, हे सगळं ते गेल्यानंतर झालंय! आणि कंप्यूटर्स! पण माझा मुद्दा तो नाही, माझा मुद्दा हा आहे, की मनमोहननं ब्रिटिश गव्हर्नन्सची स्तुती केली. ते टीव्हीवर पाहतानाच माझ्या काळजाचा ठोका चुकला! आणि त्यानंतर काही दिवसांतच भारतात ‘ब्रिटिश गव्हर्नन्स ’दिसायला लागल. गुरगावला ‘होंडा’ कंपनीच्या कामगारांनी संप केला होता, त्यांना पोलिसांनी घेराव घालून खाली जबरदस्तीनं बसवून, बसलेल्या कामगारांवर जबरदस्त लाठीमार केला. अ‍ॅनॅलिसिस करानं तुम्ही! त्यानंतरच्या सगळ्या बातम्यांमधे कुठेही अश्रुधूर किंवा वॉटर कॅनन्स यांचा उल्लेखच नाही! टीव्हीवरच्या कुठल्याही दृश्यांत अश्रुधुराची नळकांडी फोडलेली दिसतच नाहीत. दिसतं काय तर लाठीमार किंवा गोळीबार! अगदी ब्रिटिश गव्हर्नन्स! ब्रिटिशांचा उत्कृष्ट राज्यकारभार! खरं तर लोकशाहीमधे अगदी साध्या मागण्यांसाठी लोकांना रस्त्यावर यावं लागणं हीच शरमेची बाब आहे! योग्य पगार, वीज, पाणी हे आपोआप मिळायला पाहिजे; पण त्यासाठी अजून देखील सरकार विरुद्ध जनता असंच सुरू! म्हणजे ब्रिटिश गव्हर्नन्स फार चांगला होता, कुणासाठी? राज्यकर्त्यांसाठी! जनतेसाठी? जनतेसाठी ती गुलामगिरी होती आणि अजूनही आहे! आणि जणू केंद्र आणि राज्य सरकारं, यांनी पोलिसांना गुप्त आदेशच दिलेले दिसतात, की अश्रुधूर वापरला तर खबरदार! पाण्याच्या तोफा वापरल्या तर खबरदार! लाठीमार नाहीतर गोळीबार! त्या वेळी ब्रिटिशांविरुद्ध लढून लोक हुतात्मे झाले. आता ब्रिटिश गव्हर्नन्स विरुद्ध लढून होतायत! बिच्चारे भारतीय! आणि बिच्चारे भारतीय पोलीस सुद्धा! जसं भुकेलं, अर्धपोटी ठेवून, सतत दाबात, पिचत ठेवून कुत्र्यांना पिसाळवून ठेवून लोकांवर सोडावं, तसं या ब्रिटिश गव्हर्नन्स मधे पोलिसांना लोकांवर सोडतायत! सुधीरमामा बरोबर म्हणायचा, भारतात गरीब म्हणून जन्माला येऊ नये, अन आलं तर पोलिसांच्या तावडीत सापडू नये! ब्रिटिशांच्या गव्हर्नन्स खाली नंदीग्रामला झालं! मग फरक उरला कुठे?” अडव्होकेट जोरात ओरडले. चार्वाक म्हणाला, “कुठेच नाही! हे जगच असं आहे! क्रूरता दिवसेंदिवस वाढतच जाणार!”

“पण भारत तर शंभरवर्ष, नाही एकशेसाठ वर्ष मागे गेलाय. ब्रिटिशांच्या काळात गेलाय. अ‍ॅडव्होकेट, दिवसेंदिवस घटना अशा घडतायत की मला तरी पटतंय तुमचं म्हणणं!” हंबीरराव म्हणाले.

चिलीम संपली. सर्वजण गुंग झालेले.

“अरे छड्यार बाते ये सब!”

गजोधरभय्या म्हणाले.

“तुकाराम, जलेबी लाव!”

तुकाराम वाटच पाहात होता. आत जाऊन तो मोठी परात घेऊन आला. परातीत हिरव्या पानांचे द्रोण, अन द्रोणां मधे गरमागरम जिलेब्या. शुद्ध तुपात तळलेल्या, अगदी स्फटिकीकरण केलेल्या, हाडांचा चुरा न वापरता तयार केलेल्या खडीसारखेच्या पाकात सोडलेल्या, आणि भरपूर केशरानं माखलेल्या, किंचित वेलदोडा, किंचित कापूर, किंचित केवडा यांचा सुगंध असलेल्या गरमगरम जिलेब्या. लहानलहान आकाराच्या. धम्मककेशरी. हिरव्या पिस्ताचा चुरा किंचित वर भुरकलेल्या जिलेब्या.

प्रत्येकाच्या सर्वांगाची एक जीभ झाली. सर्व संवेदना चवीत एकवटलेल्या, आणि गांजाच्या नशेत वेळ थांबल्यासारखाच झाला. ताऽरऽताऽर नशा झाली. आधीचं गंभीर प्रकरण सगळे विसरले. मग किंचित गुलाबाचा वास असलेलं थंडगार पाणी आलं. आत्मे ओले चिंब झाले. तृप्ती पूर्ण अस्तित्वात खोल खोल मुरूनगेली. जणू या क्षणापर्यंत पोचण्यासाठीच या विश्‍वाची निर्मिती झाली होती. आणि मग पुन्हा एकदा तुकारामनं चिलीम भरून पेटवून आणली तेव्हा पहिला निळ्या जिवंत ज्योतीचा झुरका लावून गजोधरभय्यानं गाणं छेडलं:

अरे! हमको गयी तरसायके मायके

हमरी ये गोरी चकोरी !

सर्वांनी कोरस धरला:

अरे, कहाँ गयी?

अरे, कब गयी?

चिलीम फिरत राहिली. गजोधरचं गाणं पुढे जात राहिलं. गाण्याची सुरुवात नेहमी साधारणपणे सारखी असायची. पण दरवेळी एखादी नवीन शंकर-पार्वतीवर आधारित गोष्ट तो गाण्यात गुंफायचा. त्या गोष्टी देखील सर्वांना तशा माहीत असायच्या, पण त्या अशा एकमेकांत मिसळायच्या अन नशेत अशा भिनायच्या की दर वेळी नव्या वाटायच्या. शिवाय तीच गोष्ट पुन्हा रिपीट होईपर्यंत विसरून गेलेली असायची! निदान शंभर-दीडशे गोष्टींचा खजिनाच होता तो!

:अरे हमको तरसायके गयीरे मायके

हमरी ये गोरी चकोरी!

शिवजीने आँख खोली,

नहीथी साथमें

उमादेवीजी गोरी!

तो शिवजी कहे,

हमको तरसायके गयीरे मायके हमरीये गोरी चकोरी!

गयी पारबती सखी की लगनमें!

आयी देवियाँ बाकी भी गगनमें!

लछ्मीजी आयी लदी हुई गहने।

इंद्राणीने भी हीरे मोती पहने!

मेनका – उर्वर्शी-रंभा ये सारी!

लदी हुई थी गहनों से भारी!

पारबती बेचारी

बिना एक गेहेना!

सबका मजाक उसे

पडा तब सहना!

सभी देवीयाँ लगी उसे हँसने!

टोन की भाषा लगी देखो कसने!

अरे! हम पे गरमायके

गुस्से में आयके

आयी ये गोरी चकोरी!

शिवजी कहे –

हमपें गुस्सा खायके,

जिया भरमायके,

पारबती आ गयी मोरी!

पारबतीने शिवको उकसाया!

भोले को देखो उसने सताया!

लगन में क्या हुवा बताया|

शिवजीने जानी सब माया।

शिवजीने अपनी जटासे

एक बाल लंबा हटाके

पारबतीको दिया ओर बोला उसे,

कुबेर के पास ले जायके।

इसके वजनके

हीरे, मोती, गहने, लाये

वो कुबेर से उठायेके।

हैऽ! हमको सतायके

खुदको रुलायके,

गहने लेने चली गयी गोरी।

कुबेरजी ने तराजू उठाया

स्वर्गका खजाना खुलवाया

कृष्ण विवरसा, काले नागसा,

शिवजीका केश रखा एक पल्डेमें

केशका पल्डा हिलाही नही।

दूसरा पल्डा नीचे झुका नही।

स्वर्गका खजाना पड गया अधूरा।

शिवजी के बालका वजन ना हो पूरा।

कुबेरजीने सारी देवियों को बुलवाया।

उनके सभी गहनों को उतरवाया।

फिर भी हिलेना पल्डा शिवजीका।

देवियाँ सब जान गयी महिमा उमाजीका।

सब पैर पडने लगी,

“देवी पारबती हो गयी गलती

तुम तो सबसे धनवती

तुम इतनी रुपवती

हम सभीको तो

खरीद लेगा तेरा पती!”

माया देख स्वर्ग की

पारबती जान गयी।

शिवजीका केश लेके

उसकी कीमत मान गयी।

रोती देवियों को छोड,

अपने भोलेके पास गयी।

अरे! जगको हिलायके

अपना धन बढायके

घर आयी देखो मेरी गोरी!

शिवजी कहे,

हमेंही भरमाय के

गयी थी मायके

आ गयी पारबती मोरी।

अरे,

हमको सतायके

गयी थी रे मायके

आ गयी घर मेरी गोरी।

चिलीम फिरत राहिली.

जिलेबीचा आणखी एक राऊंड झाला. मग पानं आली. खास ताजी बनारस पानं! आणि मग चार्वाकनं आपली लायब्ररी आणली! चार्वाक नेहमी खूप नवीन नवीन पुस्तकं वाचायचा. अगदी मैफलीतल्या लोकांना वाचायला लावायचा! दैववादीला ‘जी.ए. ’हे नाव त्यानंच दिलं होतं. आणि जी.ए. च्या‘ काजळमाया’, रमलखुणा ’वगैरे पुस्ताकंच्यारसग्रहणात आणि त्या कथांचे प्लॉट गजोधरभय्याला सांगण्यात कित्येक मैफली रंगल्या होत्या. “‘अ‍ॅडव्होकेट,”’चावार्क म्हणाला, “ओरहान पामुक म्हणून इराणी लेखक आहे, त्याची कादंबरी ‘माय नेम इज रेड ’आणलीय तुझ्यासाठी. फारच मस्त आहे! अर्थात इंग्रजी अनुवाद आहे. ओरिजिनल इराणी कादंबरीचा!”

“ओहोऽ!” अ‍ॅडव्होकेट म्हणाला. पुस्तकांची अदलाबदल झाली. आणि चार्वाकनं आपली लायब्ररी बंद केल्यावर सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला.

मैफल संपली तेव्हा बारा वाजून गेले. होते. अ‍ॅडव्होकेट ‘माय नेम इज रेड ’ची प्रत हातात घेऊन तरंगत घरी आले. आपल्या पाडलेल्या वाड्यातल्या शिल्लक खोल्यांमधल्या आपल्या घरी आले. चिंचोळ्या मार्गानं ओट्यावर चढून आपल्या घरात शिरले. दार आतून लावून घेतलं. झोपायच्या खोलीत जाऊन भारदस्त; पण जुनाट शिसवी कपाट उघडलं, पण मग एक जबरदस्त जांभई देऊन झुलत भिंतीपर्यंत जाऊन दिवा घालवला आणि कपडे न बदलता पलंगावर तसेच पडून गाढ झोपून गेले.

***

अ‍ॅडव्होकेट नितीन कानविंदे सकाळी दहा वाजता उठले तेव्हा राघू गवळी नेहमीसारखा 10-10 लिटरचे 4 कॅन ठेवून गेला होता. या 40 लिटरची आता 30 लिटर बासुंदी बनणार होती. न्हाणीत जाऊन तोंडबिंड धुवून, प्रातर्विधी करून अ‍ॅडव्होकेटांनी कॅन आत घेतले. मोठ्ठया हॉटेलटाइप बर्नरच्या शेगडीवर खाली जमिनीवर एकपंधरा लिटरची कढई पालथी घालून ठेवलेली होती,  आणि त्याच गॅस सिलिंडरच्या नळीला एक ‘टी’ लावून तिथून रबरी नळीचा एक फाटा कट्टयावरच्या छोट्या, सिंगल बर्नरच्या गॅसशेगडीला जोडलेला होता. अ‍ॅडव्होकेटांनी कढई सरळ केली. एका स्वच्छ फडक्यानं पुसून घेतली. कट्टयाखालच्या कपाटातलं सामान काढलं. चहा केला. घेतला. आणि ते बासुंदी बनवायला लागले. एक कॅन बासुंदी एका वेळी कढईत बनायची. एवढ्यात चंद्रा आली. चंद्रा आठवड्यातून दोनदा यायची. घट्ट नऊवारी लुगडं. तोकडं. पोटर्‍या गोर्‍यागोर्‍या. गोल चेहरा, गालावर खळी आणि हनुवटीवर तीन हिरवे ठिपके. बारीक कंबर, टंच स्तन, कडक मुजोर, माना वर करून टवकारून पाहणारे. लुगडं असं नेसलेलं की मांड्या अन कासोटा यांचा आकार अगदी स्पष्ट दिसला पाहिजे. नितळ गोर्‍या पोटावर रेखीव बेंबी. होनाजी बाळाच्या लावणीतल्या सारखं रुप! आल्याबरोबर तिनं दार आतून लावून घेतलं, अन झाडूला हातलावायच्या आधी नेहमीप्रमाणे विठ्ठलाच्या मूर्तीसारखे कमरेवरहात ठेवून विचारलं, “काय मग, आडवाकोट! हायका आज? का नुस्तं काम करू?”

अ‍ॅडव्होकेटांनी बासुंदी भरल्या बरणीचं झाकण घट्ट लावलं, गॅस फटकन बंद केला, अन तिच्या दोन्ही कोपरांना धरून तिला मागे वाकवलीच, अन तिला गप्कन अंगाशी उचलून घेत ओठावर ओठ चापले अन खालच्या ओठावर बारीक दात मारून धरला. ती हवेत पाय हलवत अरे अरे म्हणत त्यांच्या छातीवर मुटके मारताना तशीच नेली अन पलंगावर झोपवली.

अ‍ॅडव्होकेट आज तिचे कपडे पूर्ण सोलून तिला नागवी करून भिडायला लागले तेव्हा चंद्रा म्हणाली,

“आज लई रंगात आलाय् आडवाकोट!”

नाही तर नऊवारीसारखं गुंतागुंतीचं प्रकरण! पण अ‍ॅडव्होकेट थांबले नाहीत. तिच्या शरीरावरची सगळी गोंदणं बघायला तिला उलथीपालथी केल्यावरच त्याचं समाधान झालं. मग भारदस्त शिसवी कपाटाचं जुनाट ड्रॉवर आवाज न करता लोण्यासारखं उघडलं, अन साधन घेऊन अ‍ॅडव्होकेट पुन्हा पलंगावर आले.

बारा-तेरा मिनिटांत सगळं संपलं तेव्हा वरचा सीलिंग फॅन सुरू असूनही दोघंही घामाघूम झालेली. मग चंद्रा नऊ वारी कशी नेसते ते अ‍ॅडव्होकेटांनी नीट मन लावून पडल्या पडल्या पाहिलं, आणि मग चंद्रा कामाला लागली. तसे अ‍ॅडव्होकेट अंघोळीला गेले.

दुपारी मुरलीधर खाणावळीत जेवण करून आल्यावर अर्धातास झोप चघळल्यावर आणखी दोन कॅन्स भरून बासुंदी झाली. लांब दांड्याच्या मोठ्या झार्‍यानं प्रचंड कढईत ढवळत ढवळत पांढर फेक दूध हळूहळू तपकिरी, खवलेदार बासुंदीत बदलून अ‍ॅडव्होकेटांनी पुन्हा अंगावर पाणी घेतलं आणि पायजमा बंडी घालून त्यांनी पहिली बरणी आणि लिटरचं माप घेऊन दार उघडून ती ओट्यावर ठेवली तेव्हा बरोबर पुठ्ठयावर चिकटवलेल्या काँप्युटर प्रिंटवर लिहिल्याप्रमाणे सहावाजले होते! तीस जणांची लाइन आधीच तयार! लोक इतके शिस्तबद्ध की तीस मोजून एकतिसावा कधीथांबायवा नाही. उद्या घेऊ, म्हणून परत जायचा. पण प्रिंटवर सहा ते आठ लिहिलेलं, तरी सात वीसलाच सगळी बासुंदी संपली! एवढाच काय तो फरक! नाहीतर सगळं अल्मख्तूबमख्तूब!

जे लिहिलंय, लिहिलंय!

सिल्कचा कुर्ता घालून आरशा समोर उभ्या असलेल्या अ‍ॅडव्होकेटांना प्रश्‍न पडला, आपलं हे आयुष्य खरं, की गजोधरच्या मैफलीतलं आयुष्य खरं? कोण आहोत आपण? आणि आपलं आधीचं आयुष्य? आयुष्याची ही गोड, मधुर, रवाळ बासुंदी करण्याआधीचं आयुष्य? काय नेमकं खरं आहे? हा पडणारा वाडा खरा? का इथे उंच उभी रहायला सुरुवात झालीय ती चौकोनी काड्यापेट्यांसारख्या फ्लॅट्सची टोलेजंग इमारत खरी?

त्यांनी प्रतिबिंबाला हसून दाखवलं, आणि ते गजोधर भय्याकडे निघाले.

***

नितीन मोरेचं सुधीर मामानं औरंगाबादच्या शाळेत नितीन कानविंदे म्हणून नाव घातलं. बरोबर चार दिवस चांगले गेले. नितीन नवीन शाळेवर खूष होता. पण पाचव्या दिवशी पुण्याहून पोलीस आले. रमाला अटक करून घेऊन गेले. आरोप होता गणेशचा खून.

सुधीर खचला. एका महिला संघटनेनं मदत केली. रमा बर्‍याच घरी माहीत होती. एका ठिकाणी ती काम करायची तिथल्या ताई एका संस्थेच्या अध्यक्षा होत्या. एका महिला संघटनेनं मदत केली. रमा बर्‍याच घरी माहीत होती. एका ठिकाणी ती काम करायचीति थल्या ताई एका संस्थेच्या अध्यक्षा होत्या. पण काही उपयोग झाला नाही. नितीननं सुद्धा साक्ष दिली – हा खून नव्हता – उलट एका खुन्या पासून स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न होता – सेल्फडिफेन्स – गणेश जिवंत असताना त्याच्या कडे ढुंकून न पाहणार्‍या त्याच्या भाऊबंदांना त्याचा एकाएकी पुळका आला. अगदी लहान वयात नितीनला कोर्टात साक्ष द्यायला अनेकदा जावं लागलं. कोर्ट म्हटल्यावर त्याचा थरकाप व्हायचा. जे विसरायला पाहिजे तेच पुन्हा पुन्हा समोर येत राहिलं. गणेशाच्या भाऊबंदांनी तर रमाला फाशी देणं हा प्रतिष्ठेचाच प्रश्‍न करून ठेवला.

पण मधेच रमाच्या आत्महत्त्येची बातमी आली. जेल मधे तिनं आत्महत्त्या केली. सुधीरमामाला खरं काय ते कळलं. जेलमधे दोघांनी रमावर बलात्कार केला होता. पुन्हा पुन्हा. त्यातल्या एकाला विरोध करताना त्यानंच रमाचा गळा दाबला. ती मेली. पण कागदोपत्री आत्महत्त्या. कुणीच काही करू शकलं नाही. सुधीर बिचारा गरीब. त्या महिला संघटनेनं प्रकरण लावून धरलं. पण किती दिवस? त्या संघटनेची इतर कामं तर होतीच नं! हजारो लिटर सांडपाण्याच्या टाकीला खाली सुईनं एक छिद्र पाडावं, अशा प्रकारे भारताच्या न्यायालयां मधे तुंबलेली प्रकरणं एका एका थेंबानं ठिबकून निकालात काढली जात होती. उशिरा मिळालेला न्याय म्हणजे नाकारलेला न्याय! जस्टीस डीलेड इज जस्टीस डिनाईड.

पंचतारांकित उपाहारगृहांमधे, कार्यशाळांमधे, परिषदांमधे न्यायदानाविषयी उच्चस्तरीय वादविवाद! दारू-खाणं-मौज-मजा! आणि ठिबकणार्‍या टाकीची उंची वाढतच चाललीय. जस्टीस जास्त जास्तच डीलेड – न्यायाला आणखीनच उशीर – दहावर्ष, पंधरावर्ष… जो गुन्हा केलाय, केलाय नव्हे, ज्या गुन्ह्याचा आरोप आहे, त्या गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त शिक्षा तीन वर्ष! आणि त्यासाठी आरोपी कारागृहात दहा वर्षं! अंडरट्रायल! फिल्म्स निघतायत, आंतरराष्ट्रीय महोत्सवात बक्षीसं मिळतायत! द अंडरट्रायल्स! पण ठिबकणार्‍या टाकीची उंची आता आणखी वाढतेय. हजारो लिटर सांडपाणी आता लाखो लिटर होतंय! पण सुधीरमामा साधा भोळा होता. आपण गरीब, आपल्याला चांगला वकील मिळाला नाही, आता नितीनला वकील करायचं! त्याच्या मनानं घेतलं. नितीन हुशार होता. शिकला कायदा, झाला वकील. पण ते शिकता शिकता नैराश्य त्याच्या रक्तात भिनत गेलं. आणि वकील झाल्या नंतर कोर्टात गेलं की त्याच्या लहानपणच्या आठवणी उफाळून यायच्या. त्याचा थरकाप व्हायचा. आणि नाहीतरी अशी कोणती केस कोण चालवायचा? नुसत्याअ‍ॅफेडेव्हिट, अन प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन, घटस्फोटाच्या नोटिशी, अन वारसाहक्काच्या नोटिशी, मृत्युपत्र अन सर्चरिपोर्ट – साठ-सत्तर टक्के वकिलांचा निर्वाह तर या सगळ्यांवरच चालायचा.

आणि मग ती केस आली. इन्स्पेक्टर धायगुडेंच्या दारुड्या भावाला त्याच्याच बायकोनं डोक्यात लोखंडी कांब मारली, आणि त्यात तो मेला. तिरीमिरीनं नितीननं, अ‍ॅडव्होकेट कानविंदेंनी ती केस घेतली. ती कांब तिनं नवर्‍याच्या हातून हिसकावून घेतली होती. नवरा तिला ठार करणार होता, तिनं आत्मसंरक्षण केलं. सेल्फ डिफेन्स. तिचा बचाव अ‍ॅडव्होकेटांनी जीव तोडून सुरू केला. पेपरात अ‍ॅडव्होकेटांचं नाव यायला लागलं. महिला संघटना तात्पुरत्या जाग्या झाल्या. इन्स्पेक्टर धायगुडेंनी अ‍ॅडव्होकेटांना धमक्या दिल्या – आणि मग काय चक्र फिरली कोण जाणे – केस दोन वर्षं चालून ती धायगुडेच्या भावाची बायको निर्दोष सुटते की काय असं वाटत होतं, एवढ्यात केस दुसर्‍या कोर्टात ट्रान्सफर झाली – आणि तिथला जज्ज, तिथला न्यायाधीश होता रमण खन्ना! लॉ कॉलेज मधला नितीनचा कट्टर दुश्मन!

अ‍ॅडव्होकेटांनी चालताचालता विचार झटकले. सुधीरमामा लग्नाच्या मौसमात मे-जून मधे हॉटेलमधून सुट्टी घेऊन लग्नाचा स्वैपाक करायला मराठवाड्यात गावोगाव फिरायचा. हॉटेल मधे बदली आचारी देऊन जायचा. बर्‍यापैकी पैसा कमवायचा. नितीन शाळेत असताना मामाबरोबर गावोगाव फिरायचा. त्याला ते जीवन खूप आवडायचं. स्वैंपाक ही कलाच त्याला छान वाटायची. मराठवाड्यात सुधीरचा लग्नाचा स्वैंपाक फेमस होता.

“काय बेत काय?”

“कानविंद्याची बासुंदी!”

“वा, वा! मग तर यायलाच पायजेल!”

लग्नाची आमंत्रण देताना असा संवाद वारंवार व्हायचा.

पण मग शाळा संपली आणि नितीन पुण्याला लॉ कॉलेजात गेला आणि वकिलीचा प्रवास करतकरत धायगुडेकेसच्या कड्यावरून बासुंदीत पडला! नितीन वकील झाल्यावर दोनच वर्षांनी सुधीरमामा एका अ‍ॅक्सिडेंटमधे गेला. लग्नाच्या टेंपोचा अ‍ॅक्सिडेंट, देगलूर जवळ झालेला.

अ‍ॅडव्होकेट मग इन्स्पेक्टर धायगुडेच्या केसनंतर निराश झाले. रमण खन्नानं त्याची सनदच रद्द करण्याचा प्रयत्न केला; पण करू शकला नाही. धायगुडेंच्या भावाच्या बायकोला जन्मठेप झाली. ही न्यायदानाची काय व्यवस्था होती? ही ठिबक-न्यायदान-योजना कुणी तयार केलेली होती?

अर्थातच ब्रिटिशांनी!

आणि सरकार कुठल्याही पक्षाचं असो, सगळ्यांना हीच व्यवस्था सोयीची होती! भराभरा न्यायालयांची संख्या वाढवून, चांगल्या लॉच्या विद्यार्थ्यांना नोकर्‍या देऊन, पगार वाढवून भ्रष्टाचाराचा मोह नाहीसा करून न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची – पोलिसी राज्यात सुधारण करण्याची कुठल्याच सरकारची इच्छा नव्हती. मग ते सरकार काँग्रेसचं असो, भाजपाचं, बहुजनसमाजाचं, राष्ट्रवादीचं किंवा कम्युनिस्टांचं, किंवा आजकाल असतं तसं कडबोळं सरकार! सगळ्या सरकारांना जनतेची गुलामी आणि राज्यकर्त्यांची मग्रुरी हेच खूप सोईस्कर होतं.

हा ब्रिटिश गव्हर्नन्स होता. पंतप्रधानांनी उत्कृष्टतेचं प्रमाणपत्र दिलेला ब्रिटिश राज्यकारभार.

अ‍ॅडव्होकेटांनी पुन्हा विचार झटकले. त्यांना मैफिलीतलं जी.ए.चं म्हणणं आठवलं,

“एखाद्या घडून गेलेल्या घटनेला प्रत्यवाय नाही. ती घटना योग्य की अयोग्य, न्याय्य की अन्याय्य हे गौण नाही का? ती घटना घडली, म्हणजेच ती घडायलाच हवी होती ना! ती एकदा घडल्यानंतर तुम्ही काय करू शकता? काहीच नाही! यालाच मी दैववाद म्हणतो. मी असं म्हणत नाही की निष्क्रिय बना. ते शक्यच नाही नं! आपण जिवंत आहोत. पण जगात सगळा अन्यायच चालला आहे – जगात चांगलं काहीच नाही – असा माझा दैववाद नाही. तुम्ही मला जी.ए. म्हणता, जी.ए.च्या कथांमधे फक्त ‘कसाब ’नव्हता; तर ‘कैरी ’पण होती. तसाच जगात न्याय नाही? काय हो अ‍ॅडव्होकेट? तुमच्या मामानं भारत सगळ्यांत अन्याय्य देश – विशेषतः गरिबांसाठी – हे तुमच्या मनावर बिंबवलं. पण खरं आहे हे? जगात अमेरिका काय इराकशी न्यायानं वागली. सद्दामला दिलेली फाशी योग्य होती? का हे फक्त पेट्रोलच्या बॅरेलचं राजकारण होतं? अमेरिकेत काय अन्याय होतच नाही का? आणि समजा सद्दामला दिलेली फाशी अयोग्य होती; पण ती घटना घडली नं? मग ती योग्यच नव्हती का? योग्य-अयोग्य जाऊ द्या, ती घडायलाच हवी होती नं? ती घटना घडून गेल्यावर, ज्या विषयी आता कुणीही काहीही करू शकत नाही, त्या विषयी षंढपणानं बोंब मारण्यात काय हंशील आहे? हां, तुम्ही म्हणालात की हे पहा, हे होतंय हे योग्य होत नाहीय. हे मी थांबवून दाखवतो, तर मग ठीक आहे; पण तरीही तुम्ही ते थांबवून दाखवणं हे देखील घडायचं होतं म्हणूनच घडलं नं?”

“म्हणूनच आम्ही तुला जी.ए. म्हणतो, कळलं का?” चार्वाक म्हणाला होता.

“हो; पणजी.ए.ची कुठलीही पुस्तकं वाचण्याआधीच मी मैफलीत माझा हा दैववाद सांगितलाय! अन तो कन्स्ट्रक्टिव्ह दैववाद आहे! काय म्हणतात बरं आजकाल? हां – सकारात्मक! सकारात्मक दैववाद!”

अ‍ॅडव्होकेट स्वतःशीच हसले. ते गजोधर भय्याच्या बंगल्यावर पोचले होते!

आज चर्चा खाण्यापिण्याचीच सुरू झाली. जनार्दन स्वैंपाकी देखील चिलीम ओढायला मैफलीत येऊन बसला होता. गजोधर, अ‍ॅडव्होकेट, चार्वाक, अन मलकानी, आणि तुकाराम आणि जनार्दन. बाकीचे लोक अजून यायचे होते. चार्वाक म्हणाला, “काय हो, अ‍ॅडव्होकेट, तुमचा सुधीरमामा सयाजीराव गायकवाडांकडेही होता म्हणे!”

“नाही, त्याचे वडील आणि त्याआधी त्याचे आजोबा, त्या राजघराण्यात पिढीजात स्वैंपाकी होते, महाराज होते. तो आठ-दहा वर्षांचा असल्यापासून तिथे वडिलांना मदत करायचा.”

“मग त्यानं तुम्हाला काही राजेशाही पाकक्रिया सांगितल्या असतील नं?”

“हां! सांगा की!” जनार्दन स्वैपाकी म्हणाला.

“नखुल्यांची खीर! सयाजी रावांना नखुल्यांची खीर फार आवडायची!”

“ओहो!”

“त्या साठी काय करायचं,तर चार जणी खास त्याच्या साठीच होत्या. त्या सयाजीरावांच्या खास मर्जीतल्या, अन खूप सुंदर होत्या .त्या आपली नखं वाढवायच्या अन व्यवस्थित, स्वच्छ ठेवायच्या. नखुल्यांची खीर करताना कणीक घट्ट भिजवून, तांदळाचं पीठ घट्ट भिजवून कणकेच्या अनतांदळाच्या पिठाच्या नखुल्या पाडायच्या. म्हणजे या चारजणी उजव्या हाताची नखं स्वच्छ धुवून त्या नखांमधे घट्ट भिजवलेलं पीठ दाबून नखुल्या पाडायच्या. बारीक-बारीक! टूथ पिक सारख्या बारीक काड्यांनी नखांमध्ये अडकलेलं पीठ वेगळं केलं की त्या झाल्या नखुल्या! अशा त्या चार जणी त्या भिजलेल्या कणकेवर नखं मारायच्या, अन काडीनं नखुल्या काढून परातीत टाकायच्या. अशा त्या पाच-सहा तास बसल्याकी मग पुरेशा नखुल्या तयार व्हायच्या. अर्ध्या तादंळाच्या, अर्ध्या गव्हाच्या. मग काही नखुल्या नुसत्या खरपूस भाजून घ्यायच्या. काही तुपात खरपूस तळून घ्यायच्या – म्हणजे डीप फ्राय – कुरकुरीत सोनेरी-लाल होईपर्यंत. काही दुधात केशर घालून त्यात उकळून शिजवून घ्यायच्या. काही व्हाइट वाइन मधे उकळून शिजवायच्या. काही रेडवाइन मधे उकळून शिजवायच्या. मग सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे शिजवलेल्या नखुल्या एकत्र करून घट्ट, दाट केशरी दुधात त्याची खीर करायची. वाढताना खीर वाढून त्यावर तुपात तळलेल्या कुरकुरीत नखुल्या टाकायच्या. गार्निश करायला, वा! काय अप्रतिम चवींचा संगम अनुभवता येतो ही खीर खाताना! तोंडात वेगवेगळ्या स्वादांचा लपंडावच चालतो!”

“करायची! मैफलीत एकदा ही खी रकरायची,” गजोधरभय्या म्हणाला. गजोधर पुण्यातच वाढलेला, त्यामुळे अस्खलित मराठी बोलायचा.

“जनार्दन,  नखं वाढवायला लाग!” चार्वाक म्हणाला.

“हॅः!” मलकानी म्हणाला, “याची नखं चालणार नाहीत! त्यासाठी बायकी नखंच पाहिजेत. ती देखील सौदर्यवतींची!”

सगळे हसले. अ‍ॅडव्होकेटांनी चंद्राची नखं आठवायचा प्रयत्न केला.

“बोलावूया चंद्राला एक दिवस!” गजोधर भय्या म्हणाला, “काय अ‍ॅडव्होकेट? चालेल नं? फक्त नखुल्या पाडायसाठी!” अ‍ॅडव्होकेट हसले.

“ती तयार असेल तर! अन तेच मी आठवायचा प्रयत्न करत होतो, तिची नखं कशी आहेत म्हणून!”

“मग आठवली का नखं? की दुसरंच काहीतरी आठवलं?” चावार्क म्हणाला.

“आज पूर्ण जेवण पाहिजे,” मलकानी म्हणाला, “मैफलीनंतर, नुसता एक गोड पदार्थ नको!”

“चालेल!” गजोधर म्हणाला, “जनार्दन, कर काहीतरी चांगला स्वैंपाक.”

“आमरस-पुरी करतो!” जनार्दन म्हणाला, “आणि मसालेभात, भजी वगैरे.”

“वा-वा!” मलकानी खूष झाला.

“चालेल!” गजोधरम्हणाला.

जनार्दन आत गेला अन थोड्या वेळात खमंग वासांना सुरूवात झाली. सगळे जमले हळूहळू. चिलमी सुरू झाल्या. मधेच एक गांजाच्या भज्यांचा राऊंड झाला. भुका कडाडून उठल्या. मैफल मस्त रंगली. दोघेजण गजोधर कडेच झोपले. अ‍ॅडव्होकेट डुलतडुलत घरी आले तर दीड वाजून गेला होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी दहा वाजता खारकर बिल्डरनं अ‍ॅडव्होकेटाचं दार वाजवलं.

“ओहो!” अ‍ॅडव्होकेट त्याला आत घेत म्हणाले.

“आता आणखी थांबता नाही येणार, अ‍ॅडव्होकेट साहेब,” खारकर म्हणाला, “उद्यापासून आता तुमच्या खोल्या पाडाव्या लागणार. तरी एक आठवडा थांबून मी बाकीचं सगळं पूर्ण केलं.”

“ठीक आहे. मी सामान हलवतो आजच.”

“तुम्ही पाहिला का तो फ्लॅट? फक्त दीड महिना तुम्हाला राहावं लागेल तिथे. फार तर दोन महिने! की लगेच इथल्या स्कीमचा तुमच्या मालकीचाच फ्लॅट देतो की तुम्हाला!”

“ठीक आहे. मी करतो आज सगळं.”  खारकर बिल्डरनं वाडा विकत घेतला होता आणि तो तिथे स्कीम करत होता. अ‍ॅडव्होकेट वाड्यात भाड्यानं रहायचे. बाकी सगळ्या भाडेकरूंना देखील खारकरनं पर्यायी जागा दिल्या होत्या. बर्‍याच जणांनी थोडे जास्त पैसे भरून खारकरच्या इतर स्कीम्सचे मोठे फ्लॅट्स घेतले होते; पण अ‍ॅडव्होकेटांना खारकर वाड्याच्या जागी होणार्‍या स्कीम मधे एकबेडरुमचा फ्लॅट, तो ही तळमजल्यावरचाच देणार होता. पण त्यासाठी अ‍ॅडव्होकेटांना दोनेक महिने तरी दुसर्‍या एका फ्लॅटमधे जाऊन रहायचं होतं. आजूबाजूला देखील चर्चा होती – अ‍ॅडव्होकेटांची बासुंदी बंद होणार? गेली वीस वर्ष एक दिवस ही खाडा न पडता चालत आलेली परंपरा – अ‍ॅडव्होकेटांची बासुंदी – आता बंद होणार?

खारकर गेल्यावर अ‍ॅडव्होकेट सुन्न होऊन बसले. गेला महिनाभर बासुंदी घोटताना त्यांच्या मनात विचार यायचे – मधेमधे त्यांना वाटायचं – बास झालं आता! खूप कमावलं! बँकेत जबरदस्त बॅलन्स होता; पण वीस वर्षाचा जीवनक्रम एकदम बंद करून आता नवीन जीवन सुरू करायचं? अर्थात नवीन काहीतरी सुरू करायचंच असंही काही नाही. भरपूर पैसा साठलेला. गजोधर बरोबर, चार्वाकला बरोबर घेऊन जगप्रवास करायची एक योजना देखील होती. युरोप-अमेरिका-चीन-जपान-मलेशिया-सगळीकडे फिरून यायचं!

अ‍ॅडव्होकेटांनी भराभरा सगळं उरकलं, आणि कोपर्‍यावर जाऊन गजोधरला फोन केला. अ‍ॅडव्होकेटांनी स्वतःचं फोन कनेक्शन वकिली सोडून बासुंदी सुरू केली तेव्हा परत करून टाकलं होतं; सरंडर केलं होतं, ते नंतर घेतलं नव्हतं. रमण खन्ना – इन्स्पेक्टर धायगुडे – त्या केस नंतर देखील असाच बदल झाला होता. वकिली सोडून देऊन अ‍ॅडव्होकेट चार दिवस सुन्न बसले होते. मग त्यांच्या डोक्यात मराठवाड्यात लग्नांच्या जेवणावळीत बर्‍यापैकी माहीत असलेली कानविंद्यांची बासुंदी चमकून गेली. तशी बासुंदी करून विकली तर?

नक्कीच पुण्यात फेमस होईल!

चितळेंच्या बाकरवडी सारखी!

किंवा कयानीच्या श्रूजबेरी बिस्किटांसारखी!

आणि अशा तर्‍हेनं ‘अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदी’चा उदय झाला होता. सुरुवातीला ओट्यावर फक्त‘ येथे उत्कृष्ट बासुंदी मिळले ’अशी पाटी लावून अ‍ॅडव्होकेट बसायला लागले. सुरुवातीला पाचेक लिटर फक्त करायचे! पण मग आठवड्याभरातच बासुंदीची कीर्ती पसरायला लागली. आणि महिनाभरातच रोज तीस लिटर बासुंदी बनवून विकणं सुरू झालं. ऑर्डर्स तर खूप यायच्या. जर मनात आलं असतं तर अ‍ॅडव्होकेटांनी इतर उत्पादनं देखील सुरू केली असती. ते स्वीटमार्ट काढू शकले असते; पण त्यांना तशी इच्छाच नव्हती. त्यांनी पुणेरी तर्‍हेवाईकपणा पांघरूण फक्त तीस लिटर – ती देखील प्रत्येकाला एक लिटर – अशी विकणंच पसंत केलं आणि पुणेरी लोकांना हा तर्‍हेवाईकपणा भावला. “अ‍ॅडव्होकेटांची बासुंदी’” फेमस झाली.

आणि आता अ‍ॅडव्होकेटांच्या बासुंदीचा असा अस्त होणार होता. कारण अ‍ॅडव्होकेटांनी भराभर सगळं उरकलं, अन ठरवलं, आता दोन महिन्यांच्या गॅपनंतर पुन्हा धंदा सुरू नाही करायचा! बास! रोजच्या मैफली, तिथल्या चर्चा, आधीचं जीवन, सुधीर मामाचं तत्त्वज्ञान, मूळची तीक्ष्णबुद्धी, शाळेतली हुषारी, आईची आठवण, सध्याच्या व्यवस्थेविषयी आधी असलेली चीड, आणि मग या विश्‍वाचा जसं आहे तशा स्वरूपात केलेला स्वीकार, स्वतःच्या गरजा, चंद्रा, तिचा स्वतःच्या आयुष्यात गुंतलेला भाग, मानव म्हणून अस्तित्वात असण्याचा तिढा, बळी तो कान पिळी या उत्क्रांतीच्या तत्त्वानुसार -तर्कबुद्धीनं- सतत वाढतच जाईल असं जीवनातलं क्रौर्य, अस्तित्वात असण्याची असहायता, सगळं काही अनुभवून अ‍ॅडव्होकेट आता स्थितप्रज्ञ होऊ पाहात होते. संपूर्ण विश्‍वाच्या अस्तित्वाचं क्षणभंगुरत्व त्यांच्या सखोलपणे लक्षात आलं होतं. त्यांना मनाच्या अथांग डोहाच्या न सापडणार्‍या तळापर्यंत जाणवलं होतं. अनुभवाला आलं होतं. ते ज्ञानी झाले होते!

म्हणून त्यांनी ठरवलं, आता बस्स! गजोधरनं टेंपो पाठवला. टेंपो बरोबर जनार्दनपण आला होता. पंधरा लिटरची कढई, हॉटेल साईझची गॅसरिंगवाली शेगडी, गॅस, साधी शेगडी, चरव्या, साखरेचे डबे, इतर डबे-डुबे, गुळाच्या ढेपी, सगळं टेंपोत लादलं अन जनार्दन बरोबर गजोधरच्या बंगल्यावर पाठवून दिलं. खारकर बिल्डरनं दिलेली चावी घेऊन अ‍ॅडव्होकेट रिक्षा करून शहराच्या दुसर्‍या भागात असलेल्या नव्याकोर्‍या बांधलेल्या‘ शिवरंजनी ’सह. गृह. संस्था मर्यादित च्या ए-14 सदनिकेत दाखल झाले. शांतपणे. मनात कसलीही तक्रार न ठेवला.

***

गजोधरभय्याच्या बंगल्यावर आजच्या मैफलीला संध्याकाळी सातवाजताच सगळे आवर्जून हजर झाले होते. आज अ‍ॅडव्होकेट स्वतः बासुंदी बनवणार होते अन जनार्दनला शिकवणार होते. बंगल्याच्या मागच्या अंगणात मोठ्ठया गॅस शेगडीवर पंधरा लिटरची कढई ठेवली होती. कढई रिकामीच तापत होती.

“हे बघ, जनार्दन,” अ‍ॅडव्होकेट म्हणाले, “कढई साधारण दहा मिनिटं तापली, की मग अर्धा किलो गूळ त्यात टाकायचा.”

अ‍ॅडव्होकेटांनी गूळ टाकला.

“मग हा मोठ्ठा सराता घेऊन तो वितळत असताना भराभर पसरायचा.”

अ‍ॅडव्होकेटांनी गूळ पसरवला. त्याचा कढईवर मस्त लाल थर होऊन खमंग वास पसरला.

“आता हे दहा लिटर दुधाचं कॅन…..” अ‍ॅडव्होकेटांनी कॅन घेऊन ते ओतलं,”… हळूहळू कढईत ओतायचं, पण, दूध फ्रीजमधलं थंड नको. ते गवळ्याकडून आजकाल थंडगार येत असतं, ते रुमटेंपरेचरला येऊ द्यायचं. मग ते उकळू द्यायचं. गुळाबरोबर. उकळी फुटली  की मग… हे ड्राइड यीस्ट….”

“म्हणजे खमीर! पिझ्झा मधे घालतात ते!” जनार्दन म्हणाला.

“करेक्ट! हे दोन मोठे चमचे घेऊन वाटीभर कोमट पाण्यात विरघळवायचं. मग गॅस बंद करायचा. उकळणारं दूध थंड होऊ द्यायचं. अरे हो, नाही… नाही… जास्तीचं दूधराहिलं. ही दहालिटरची दुसरी बरणी, यातलं एक-तृतीयांश पुन्हा कढईत टाकायचं. गुळाचं दूध अन बिन गुळाचं दूध मिसळल्यावर पुन्हा उकळी आणायची. अन मग दूध दहा मिनिटं थंड करायचं. अगदी घड्याळ लावून.  मग त्यात ही पाच किलो साखर टाकून विरघळवायची. मग हे वाटी भर पाण्यात विरघळलेलं यीस्ट हळूहळू टाकून ढवळत रहायचं. पाच मिनिटं थांबलं की यीस्ट पसरत जातं. त्याची दूधभर जाळी होते. मग गॅस सुरू करून पुन्हा एक उकळी आणायची. अन लगेच गॅस बंद करायचा.”

अ‍ॅडव्होकेटांनी यीस्ट टाकून घड्याळाकडे पाहिलं. सर्वजण कढई भोवती जमलेले. पाच मिनिटांत सगळ्यांच्या डोळ्यांसमोर दूधरंगबदलत घट्टसर होत गेलं. पुन्हा गॅससुरू झाल्यावर बारीक रव्यासारखं कणीदार दूध झालं आणि उकळी फुटताच अ‍ॅडव्होकेटांच्या त्या फेमस बासुंदीत दाट तपकिरी रंगाचे रवाळ कण, बारीक खवल्या खवल्यांसारखे दिसले. घट्ट मलईदार खवल्याखवल्यांची रवाळ बासुंदी! अ‍ॅडव्होकेटांची बासुंदी! त्यांनी ती गुप्त पाककृती आताजनार्दनच्या हाती दिली होती! मैफलीतल्या इतरजणांनी ती पाहिली होती. मग चारोळी, पिस्ते वगैरे बाकी सोपस्कारांची गरजच नव्हती.

मैफल मस्त रंगली. बासुंदी पिऊन सगळे तृप्त झाले. चिलमीवर चिलमीझाल्या. पानं खाऊन नशा ताऽरताऽर झाली.

मैफल संपल्यावर अ‍ॅडव्होकेट निघाले. आपल्या नवीन तात्पुरत्या फ्लॅटवर चालतच जाऊ म्हणून निघाले. आता आयुष्य मुक्त झालं होतं. आता आयुष्य निरुद्देश झालं होतं.

अ‍ॅडव्होकेटांनी वर पाहिलं. अंतराळाच्या कढईत वितळलेल्या काळोखाचा थर दिला होता, अन पौर्णिमा असल्यानं त्यात चंद्रप्रकाशाचं दूध ओतलं जात होतं. चांदण्यांचे रवाळ कण टिमटिम करून उकळत होते, अन अस्तित्वाची मस्त घट्ट रवाळ, चविष्ट बासुंदी बनत होती!

— अनिरुद्ध बनहट्टी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..