“अॅग्रेसिव्ह” नाटकाचा विषय बोल्ड असला तरीही त्यात समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशा प्रकारे नाटकाची हवा निर्माण करण्यात आली. जणू लैंगिक विषयावरचे एक गंभीर उद्देशपूर्ण नाटक. त्यामुळे हे नाटक मी आवर्जून बघितले. तुम्ही गालातल्या गालात हसत अर्थातच म्हणू शकता की गृहस्थ आबंटशौकीन आहे आणि हिट अॅन्ड हॉट नाटक बघण्यासाठी त्याने हा बहाणा शोधलेला आहे. म्हणा बापडे. सेक्स ही एक लेजीटिमेट अॅक्टिव्हिटी आहे, हे तर भाजपचे मंत्री हर्षवर्धन यांनीही मान्य केले आहे, तर आम्हाला काय कोणाची पर्वा?
तात्पुरते स्टेज उभारून कम्युनिटी नाटक सादर होते तेव्हा त्यात एक दृश्य हमखास असते, हिरो-हिरॉईन स्टेजच्या अगदी मध्यभागी हातात हात गुफूंन ते खाली वर झूलवत एका प्रेमगीतावर शूजचा टॉक टॉक आवाज करत एक अतिसमीप नृत्य सादर करतात. हा त्या नाटकांचा हाय पॉईंट असतो. या नाटकात हे नृत्य आरंभीच सादर होते तेव्हा वाटते हे एक सुखी जोडपे आहे. पण लगेच त्यांच्या लैंगिक संबंधात बिघाड आहे लक्षात येते. सुरवातीच्या संवादावरून वाटते शीघ्रपतन ही पतीची समस्या आहे. भोंदू वैद्यांच्या जाहिराती वाचून ही काय समस्या आहे ते वाचकांना माहीत असेल असे आम्ही गृहीत धरतो, त्यामुळे त्याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. नंतर पत्नी म्हणते, कपडे काढायला जितका वेळ घेतोस, त्यापेक्षा कमी वेळेत आक्रमकपणे दोन मिनिटात कार्यभाग आटोपतोस. त्यामुळे तिच्या मनाची व सुखाची पर्वा न करणे ही समस्या आहे असे वाटते. तसेच तो लॅपटॉपवर काही बघतो तेव्हा पत्नीला शिसारी येते, घृणा वाटते. लॅपटॉपवर जे काही पती बघत आहे ते बघताना तो ओठांचा विशिष्ट प्रकारे चंबू करतो त्यामुळे तो ओरल सेक्स या प्रकारातील पॉर्नोग्राफीक क्लीप बघत आहे असे वाटते. यानंतर तो पत्नीकडे अशा प्रकारच्या सेक्सची मागणी करत राहतो, ती नाही म्हणत राहते, चिडते आणि शेवटी बॅग घेऊन माहेरी जाते. अर्थात रंगमंचाचे पावित्र्य बिघडू नये म्हणून ओरल सेक्स हा शब्द कुठेही येणार नाही याची दक्षता नाटकाशी संबंधित सर्वांनी घेतलेली आहे.
पहिल्या अंकाचा पडदा पडत असतानाच कॉल गर्लची स्टाईलमध्ये एंट्री होते. दुसर्या अंकात ही कॉल गर्ल आणि पती यांचे बोलणे फक्त होत राहते. ती मुक्तपणे शिव्यांचा वापर करते. तो एकदा तिला रंडी म्हणतो, तर ती हा शब्द कसा आली याची व्युत्पत्ती सांगते. एक मुलगी सतत घरातून बाहेर भटकंती करायची, तर तिचा बाप तिला म्हणतो, काय गं रानडुकरासारखी तू कुठे फिरत असतेस? या रानडुकराचा अपभ्रंश होत होत ते रंडी झाले. इथे व्युत्पत्तीशास्त्राचा मुडदा पडताना बघणे आपल्याला सहन करावे लागते. नंतर तो कॉल गर्लला फर्माईश करतो, तू शॉवर घेऊन ये कारण तुला ओल्या केसात मला बघायचे आहे. ती मी आधीच आंघोळ करून आले आहे म्हणून टाळाटाळ करते तेव्हा तो बजावतो, मी वीस हजार रुपये मोजलेले आहेत, मी सांगतो ते तुला करावेच लागेल. आतापर्यंत ही कॉल गर्ल लालाभडक ट्राऊझर आणि शरीर फिट न होणारा काळा टॉप घालून असते, ते शॉवर घेतल्यावर साडी आणि उघडी पाठ दाखवणारी वेषभूषा परिधान करून येते. ओले केस असे स्लो गाणे होते. स्त्रीला असे ओल्या केसात बघणे ही कोणाची सेक्शुअल फॅंन्टसी नक्कीच असू शकते. पण त्यासाठी कॉल गर्लचे प्रयोजन काय ते कळत नाही. कारण ही मागणी तर त्याच्या सुसंस्कारी पत्नीनेसुध्दा सहजच पूर्ण केली असती. किंवा केस ओले केल्यावर तिला सर्दी होत असेल व त्यामुळे न्युमोनियाच्या भीतीने ती नकार देत असेल असे अनुमान आपण काढू शकतो. पण कॉल गर्ल व पती यांचे बोलणेच होत राहते, सेक्सबद्दल तो इतका उत्सूक किंवा हपापलेला वाटत नाही, तरीही ती उतावळेपण हा तुझा दोष आहे असे त्याच्या लैंगिक समस्येचे ती कॉल गर्ल निदान करते. ती निघून जाणार इतक्यात पत्नी माहे राहून तिथे परत येते. कॉल गर्लला बघून संतापते. मात्र आपले पात्नीव्रत्य (पातिव्रत्यच्या चालीवर – आमचेही व्युत्पत्तीशास्त्र) भंग झालेले नाही असा खूलासा तो करतो, त्यामुळे शेवट अर्थातच गोड होतो. पत्नी म्हणते तिच्या आई-वडिलांनी तिला समजावले, समजुतीने रहायला हवे, पतीचे ऐकायला हवे. ती आता तो म्हणेल त्या प्रकारच्या सेक्सला राजी आहे.
याशिवाय नाटकात एक चौथे पात्र आहे, त्यांचा वॉचमन कम नोकर जो नेपाळी आहे. पूर्वी हिंदी सिनेमात कॉमेडियन मेहमूद-जगदीप यांचा विनोदी प्रसंगांचा वेगळा ट्रॅक असायचा, तसा याचा वापर केलेला आहे. नाटककार कोणत्या जमान्यात आहे?
या नाटकात काही गंभीर चर्चा किंवा समाजाला मार्गदर्शन वगैरे नाही हे यावरून दिसेल. यात बोल्ड काय आहे? विशेषत: नाटक सुरू होण्यापूर्वीच सूचना दिली जाते, दुर्बिणीतून हे नाटक बघू नये. पण यात अंगप्रदर्शन नाही की आलिंगने, चुंबने नाहीत मग दुर्बिणीतून बघण्याची कोणाला का इच्छा होईल? एक स्त्री शिव्या देते, लैंगिक शब्दांचा बिनधास्त वापर करते हे बहुधा या रंगकर्मींना स्वत:लाच बोल्ड वाटत असावे. नाटक गंभीरपणे घ्यावे असे त्यांना वाटते, पण वैभव सातपुते या अभिनेत्याने पतीची भूमिका विनोदी शैलीत केलेली आहे. एकदा ते हस्तमैथुनाची कृती सुचकपणे पण तरीही पुरेशा स्पष्टपणे हाताने करतात आणि त्या कृतीवर बराच वेळ रेंगाळतात हे कोणाला बोल्ड वाटू शकेल. या नाटकाचा प्रोमो युट्युबवर टाकलेला आहे, त्यात म्हटलेले आहे, “स्त्रीपुरुषांच्या संबंधातून नवीन प्रजोत्पादन हे नैसर्गिक सूत्र लक्षात ठेऊन ह्यासाठी विवाहाची मर्यादा अनादीकाळापासून समाजाने घातली आहे. ” अरेरे, या रंगकर्मीची कीव करावी वाटते. सेक्स म्हणजे केवळ प्रजोत्पादनासाठी नाही ही प्राथमिक बाबही
त्यांना माहीत नाही का? प्रजोत्पादनासाठी विवाह आवश्यक नाही हे त्यांना माहीत ना का? विवाह केवळ प्रजोत्पादनासाठी नसतो हे त्यांना माहीत नाही का? आणि आता तर प्रजोत्पादनासाठी सेक्सही आवश्यक नाही हे त्यांना माहीत नाही का? लैंगिक समस्या सोडवण्यासाठी कॉल गर्लला वीस हजार रुपये (अधिक सर्व्हिस टॅक्स??) देण्याऐवजी ते सेक्स काऊन्सेलरकडे गेले असते तर एक हजार रुपयात काम झाले असते, हे तर त्यांना नक्कीच माहीत नसावे.
या नाटकाला हिट, हॉट व बोल्ड म्हणायचे का? हे हॉट व बोल्ड नाही तर माईल्ड व कोल्ड आहे आणि रिग्रेसिव्ह आहे. रिग्रेसिव्ह, कारण पतीशी पटत नाही म्हणून माहेरी परत आलेल्या मुलीला तिचे पालक त्याचे ऐक, त्याच्याशी जुळवून घे म्हणून परत पाठवतात. तिही लगेच पतीच्या आज्ञेत रहायचे व त्याला हवे त्या प्रकारचे लैंगिक सुख द्यायचे ठरवते.
मात्र हे नाटक नक्कीच हिट आहे कारण त्याला गर्दी असते. मध्यमवयीन, वयस्क जोडपी हे नाटक बघायला येतात, महिला येतात. ते हे नाटक एंजॉय करतात. याचा अर्थ अशी नाटके आता केवळ स्वीकारली जातात असे नाही तर लोकांना ती हवी आहेत. ती बघून त्यांना आनंद होतो. असे का झाले असावे? सिनेमात, टिव्हिवर स्त्री-पुरुषांची समीप दृश्ये दाखवली जातात. विशेषत: हिंदी टिव्हिवरील डान्स रिअलिटी शोमध्ये जोडप्यांची हॉट जवळीक दाखवली जाते. तेच त्यांना स्टेजवर लाईव्ह बघायचे असेल का? की आठवडाभर मिळमिळीत कौटुंबिक मालिका बघितल्यानंतर झणझणीत हॉट नाटक बघायचे असेल? की स्वत:च्या सेक्स लाईफमध्ये ताजेपणा आणण्यासाठी अशी नाटके ही त्यांची गरज आहे?
किंवा सेक्सी कॉमेडी खूप सुरवातीपासून लोकांना आवडतात पण पूर्वीच्या समाज मान्यतेच्या कल्पनांमुळे स्त्रियांनी ते बघणे शक्य नव्हते, आता शक्य झाले असे असावे. दादा कोंडकेंचे चित्रपट सातत्याने लोकप्रिय झाले यावरूनही हे लक्षात येईल. सुनिल गावस्करांनी याबाबतचा किस्सा दिलेला आहे, खेळाडूंच्या बसमध्ये दादा कोडकेंच्या चित्रपटाचा व्हिडिओ लावला जायचा तेव्हा खेळाडूंच्या पत्नी संकोच, लाज म्हणून त्याकडे लक्ष नाही दाखवत. शेवटी त्यातील मोकळ्याढाकळ्या विनोदामुळे संकोच सोडून त्याही हास्यकल्लोळात सामील होत. तेव्हा आता समाजाची गरज असेल तर दर्जेदार सेक्सी नाटके अवश्य यावीत. तोपर्यंत प्रपोजल नाटक बघा किंवा व्हाईट लिली आणि नाईट रायडर नाटक बघा. उत्तम नाटक बघितल्याचा आनंद मिळेल. सेक्सबाबत स्त्रीने कसे असर्टिव्ह असावे ते व्हाईट लिलीमुळे कळेल. योनीच्या मनीच्या गुजगोष्टी या नाटकाला स्त्रियांची गर्दी असते. ते जोडप्यांनी बघितले तर त्यातून काही साध्य होईल.
हे “अॅग्रेसिव्ह” नाटक बघायचेच असेल तर नाटक सुरू होण्यापूर्वी चहा ढोसा म्हणजे पहिल्या अंकात झोप येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागणार नाहीत. दुसर्या अंकापूर्वी तुम्ही तो स्वत:च तो घ्याल, त्यामुळे तो इशारा देण्याची आवश्यकता वाटत नाही.
(`कृषिवल’मध्ये प्रकाशित)
उदय कुलकर्णी
Leave a Reply