![Fire_truck-2](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/12/Fire_truck-2-678x381.jpg)
‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीप्रमाणे सध्या नित्यनेमाने ठिकठिकाणी आगी लागत आहेत. त्यांमध्ये निवासी इमारतींपासून कारखान्यांपर्यंत सर्व प्रकारच्या इमारतींचा समावेश आहे. आगीमुळे प्रचंड वित्तहानी तर होतेच आहे; पण जीवितहानीही सुरू आहे. आगीनंतर बरीच चर्चा होते. सर्व प्रकारची माध्यमे विषय उचलून धरतात; पण हे सर्व तात्पुरते असते. चौकशी समिती नेमली जाते, शिफारशी केल्या जातात. पण त्या अमलात आणल्याचे क्वचितच आढळून येते. हा झाला प्रशासनाचा पवित्रा माध्यमे फक्त नवीन ब्रेकींग न्यूजच्या मागे असतात. त्यामुळे एक प्रश्न पूर्णपणे धसास लावायचा, मग दुसऱ्या प्रश्नाला हात घालायचा इतके साधे तत्त्वही माध्यमे पाळत नाहीत. याचबरोबर दुर्घटना कशी घडली, याचा तपशील देताना कुठे चुकले आहे, त्याची कारणे कोणती, त्यांवरील उपाय कोणते, सतर्कता कुठे बाळगायला हवी, यांबाबत माध्यमांकडून क्वचितच उपयुक्त आणि अचूक माहिती दिली जाते. लोकशिक्षण हे माध्यमांचे काम आहे याचा विसर पडला आहे का?
निवासी किंवा कार्यालयीन इमारतीत आग लागल्यास त्यामागील कारणांत विद्युत जोडणीतील बिघाड, त्यावर पडणारा जास्तीचा ताण, तात्पुरत्या स्वरूपाच्या गोष्टी वर्षानुवर्षे तशाच वापरणे, या कारणांचा समावेश असतो. आता विजेवर चालणारी उपकरणे मोठ्या प्रमाणात आपण वापरतोय. या प्रत्येक उपकरणाची विजेची गरज नेमकी असते. वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांच्या विजेच्या गरजेची बेरीज केली, तर आपल्याला एकूण गरज किती याचा नक्की आकडा समजतो. त्यानुसार, तितक्याच क्षमतेची जोडणी हवी आणि त्याकरिता लागणारी सक्षम वायर व इतर भाग हवेत. मोठ्या प्रमाणात वीज वापरणाऱ्या शीतकपाटे, वातानुकूलन यंत्रे, पाणी गरम करण्याची यंत्रणा इत्यादींची नव्याने गरज पडल्यास त्यानुसार वायरिंग बदलून घ्यायला हवे, तो खर्च करायला हवा. आपली सुरक्षितता महत्त्वाची, या विचाराला प्राधान्य द्यायला हवे.
याचप्रमाणे, सर्व जिने व व्हरांडे नेहमी मोकळे ठेवायला हवेत. तिथे सामान रचून जाणे-येणे अडचणीचे करायला नको. अशा आगीच्या प्रसंगी, हा निसटण्याचा मार्ग खुला असेल, तर अनेक जीव वाचतील. शिवाय मार्गात असलेले साहित्य ज्वालाग्रही असेल, तर आणखी अडचण होते. बहुमजली इमारतींमध्ये दर सातव्या मजल्यावर ठरावीक जागा रिकामी ठेवावी, असा नियम आहे. ती जागा कायमस्वरूपी रिकामीच हवी. अशा संकटसमयी त्याचा चांगला उपयोग होतो. या एकाच ठिकाणाहून माणसांची सुटका करायला अग्निशमन दलाला सोयीचे ठरते. इमारतीमध्ये बसवलेली अग्निशमन यंत्रणा ठरावीक कालावधीनंतर वापरून तपासून बघायला हवी, काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या पाहिजेत. याबरोबर, आपण सर्वांनी आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याचा सरावही केला पाहिजे. आपल्याला असलेला धोका लक्षात घेऊन आपण सतर्क असले पाहिजे आणि तेसुद्धा आपल्याकरिताच. तीन वर्षांपूर्वी मंत्रालयाला आग लागली होती. नुकताच तिथे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सराव ठेवला होता, त्या वेळी तिथली मंडळी कुरकुरत होती. या बाबतीत ‘हे वागणं बरं नव्हं’ इतकेच म्हणणे योग्य ठरेल. (या अंकातील ‘आगीशी झुंजताना’ हा लेख आपण वाचालच.) अग्निशमन दलाला आपण सहकार्य केले पाहिजे, ते सर्वांचे कर्तव्यच आहे. अशा प्रसंगी रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीत आगीच्या बंबाला प्राधान्य देणे, इमारतीच्या आवारातील मोटारी बाजूला काढून अग्निशमन दलाला जागा उपलब्ध करून देणे, आगीचा प्रकार बघून दलाचे जवान ज्या सूचना देतील त्याचे पालन करणे, या बाबी गरजेच्या आहेत. हे केल्यास आगीमुळे होणारे नुकसान आटोक्यात आणता येईल. आगीची प्रत्यक्ष झळ लागून होणाऱ्या जखमा आणि धुरामुळे श्वास कोंडून होणारा त्रास यांची तीव्रता एकसारखीच म्हणावी लागेल. कारण दोन्हींमुळे आपल्या जिवावर बेतू शकते. म्हणूनच धूर कोंडून राहू नये अशी काळजी घ्यायला पाहिजे. या धुरात कार्बन मोनॉक्साइड हा घातक वायू असतो याचे भान ठेवायला हवे. गॅसचा पुरवठा, तसेच या वेळी विजेचा पुरवठा बंद करणे गरजेचे आहे. अशी सजगता आपण बाळगली तर आगीला तोंड देणे शक्य होईल, त्याचबरोबर मनुष्यहानी टाळून वित्तहानी कमी होईल. एवढ्या सगळ्या आगींपासून हा धडा आपण शिकायला हवा, नाहीतर तीच गत व्हायची
आधुनिक फिनिक्स
जुलै महिन्याच्या ‘पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या जॉन नॅश यांच्यावरील डॉ. विवेक पाटकर यांनी लिहिलेल्या, ‘आधुनिक फिनिक्स’ या लेखाचे वाचकांकडून भरघोस स्वागत झाले आहे. यात सामान्य वाचकांपासून ते विविध विद्यापीठांतील/महाविद्यालयांतील विभाग प्रमुखांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. लेखांवरील प्रतिक्रियांची यादी मोठी असल्याने, ही इ-पत्रे जागेअभावी ‘पत्रिके’त छापणे शक्य झालेले नाही. या इ-पत्रांपैकी एक उल्लेखनीय इ-पत्र हे मुंबई विद्यापीठातून वाचनालय प्रमुख या पदावरून निवृत्त झालेल्या डॉ. प्रतिभा गोखले यांचे आहे. डॉ. विवेक पाटकर यांना डॉ. प्रतिभा गोखले यांनी लिहिलेल्या इंग्रजी इ-मेलमधील काही भागाचा मराठी स्वैर अनुवाद असा आहे: ‘आपण या महान (गणितज्ञाच्या) जीवनातील बहुतेक सर्व महत्त्वाच्या घटना थोडक्यात (व्यवस्थितपणे) मांडल्या आहेत… एक अद्वितीय गणितज्ञ… प्रदीर्घ मानसिक आजारानंतरचा त्याचा फिनिक्स पक्ष्यासारखा झालेला अनपेक्षित उदय… सगळंच काही मती गुंग करणारं आहे….
डॉ. विवेक पाटकरांच्या लेखाचे कौतुक करणाऱ्या इ-पत्रांपैकी आणखी दोन इ-पत्रे वेगळ्या अर्थी महत्त्वाची आहेत. ही इ-पत्रे प्रा. माणिक टेंबे (आचार्य – मराठे महाविद्यालय, मुंबई) आणि प्रा. अविनाश कोल्हे ( रुपारेल महाविद्यालय, मुंबई) यांच्याकडून आली आहेत. प्रा. माणिक टेंबे यांनी हा लेख आपल्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवला, तर प्रा. अविनाश कोल्हे यांनी हा लेख आपल्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेतला. दोन्ही प्राध्यापकांनी आपल्या या कृतीद्वारे जॉन नॅश यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना उत्तमरीत्या जवळून ओळख करून दिली आहे.
– स्पंदन
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply