नवीन लेखन...

अहंकाराची फळे

विजयच्या आत्महत्येची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. एका उमद्या व्यक्तिमत्त्वाने अचानक सर्वांचा निरोप घ्यावा याला काय म्हणावं? स्वत:चं आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याइतकं असं कोणतं कारण असावं याबद्दल मला जिज्ञासा वाटू लागली. विजयच्या मृत्यूचं दु:ख काही प्रमाणात ओसरल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांकडून त्याच्या आत्महत्येशी संबंधित माहिती मिळविण्याचा मी प्रयत्न केला.

विजयचे वडील एक मोठे सरकारी अधिकारी. मोठ्या पदामुळे त्यांच्याभोवती सतत खुशमस्क-यांचा गराडा पडलेला असे व आपल्या बॉसचा अहंकार सतत कुरवाळण्याचं काम हे खुशमस्करे मोठ्या इमाने-इतबारे पार पाडायचे. अधिकारीपदाच्या खुर्चीमुळे साहेबांना कोणाकडूनही नकार ऐकण्याची सवयच राहिली नव्हती. घरातसुद्धा प्रत्येकाने आपल्याला सलाम करावा व आपलेच म्हणणे ऐकावे असे त्यांना वाटू लागले. विजयची आई महिला मंडळं, क्लब्ज व पार्ट्यांच्या विश्वात रमणारी स्त्री होती. तिला स्वत:च्या सौंदर्याचा अत्यंत गर्व होता व सभोवतालच्या सर्वांनी आपलं केवळ कौतुकच करावं अशी तिची अपेक्षा होती. कोणीही तिच्या मनाविरुद्ध वागलं तर तिच्या जिवाचा अत्यंत संताप होत असे. दोघेही जन्मदाते अहंकाराला कुरवाळण्यात इतके व्यग्र होते की विजयच्या आयुष्याकडे व समस्यांकडे लक्ष देण्यास त्यांना अजिबात फुरसत नव्हती. आपल्या भावना, विचार, समस्या समजावून घेणा-या व्यक्तीच्या शोधात निघालेला विजय अखेर एका मुलीच्या प्रेमात पडला. पण तिची मानवनिर्मित जात वेगळी होती. स्वत:च्या मुलाच्या भवितव्याचा विचार करण्यास कधीही फुरसत न मिळालेले त्याचे पालक त्याच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागताच प्रचंड बिथरले. आपल्या मुलाशी थेट चर्चा न करता इतरांच्या मदतीने त्यांनी प्रेमी युगुलावर लग्न न करण्यासाठी प्रचंड दबाव आणला व त्यांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्याचा प्रयत्न केला. अखेर अति अहंकाराने आंधळ्या झालेल्या पालकांच्या भावनाशून्य वागण्याची परिणती झाली विजयच्या अत्यंत दुर्दैवी आत्महत्येत !

असे आम्ही कसे? प्रत्येक घरातली मुलं त्यांच्या वयोमानानुसार वागत असतात. त्यांचं विश्व वेगळं, त्यांची स्वप्नं वेगळी, आकांक्षा वेगळ्या, धडपड वेगळी, आदर्श वेगळे. त्यांना अवघं जग जिंकायची इच्छा असते. पण त्याच वेळेस लहान वयातील अपरिपक्वतेमुळे व बरेचदा अति उत्साहामुळे अनेक चुका त्यांच्या हातून घडतात.पूर्ण विचार न करता उतावळेपणाने चुकीचे निर्णय घेणे, एकतर्फी प्रेम तसेच शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजण्याची घोडचूक ही सगळी सळसळत्या तारुण्याची लक्षणे आहेत. आपल्या मुलांशी सुसंवाद साधून, त्यांना पूर्ण विश्वासात घेऊन तारुण्यातील धोकादायक वळणांची जाणीव करून देण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हे पालकांच्या परिपक्वतेचे व त्यांना आपल्या अपत्यांप्रति असलेल्या जबाबदारीचे लक्षण आहे. आई-वडील जर चोवीस तास आपल्याच तो-यात वावरत असतील तर मुलांनी त्यांच्या भावना, व्यथा कोणाजवळ व्यक्त कराव्या? अशा वेळी होणा-या प्रचंड कोंडमा-याचा जर आत्महत्येसारखा दु:खद शेवट झाला तर त्याला जबाबदार कोण?

घराघरातील पालकांनी स्वत:चा अहंकार काबूत ठेवून व मुलांच्या अहंकाराला न डिवचता त्यांना योग्य वेळी सावध करणे हे कौशल्याचे काम आहे आणि शक्य तितक्या लवकर त्यांनी ते कौशल्य हस्तगत करणे ही काळाची गरज आहे !

श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

श्रीकांत पोहनकर
About श्रीकांत पोहनकर 40 Articles
श्रीकांत पोहनकर हे १९९८ पासून सतत सोळा वर्षे समाजातील विविध घटकांसाठी काम करणार्‍या टर्निंग पॉईंट, पोहनकर फाऊंडेशन, टर्निंग पॉईंट पब्लिकेशन्स व दिलासा या संस्थांचे नेतृत्त्व करत आहेत.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..