आहारामधे बदल झाला, चवीमधे बदल होत गेला, परिणाम बदलले.
बदल हा होतच असतो. आपण त्याला नाकारू शकत नाही. आमच्या आधीच्या पिढीने हा बदल अनुभवला नव्हता का ?
होता. म्हणजे आता जे ऐशी नव्वदीत आहेत, त्यांनी त्यांच्या लहानपणी चटपटीत नाश्ता खाल्लाच नव्हता. पण त्यांच्या पिढीने महाराष्ट्रामधेच उत्तप्पा, डोसा, इडल्या, पनीर मख्खनवाला, तंदुरी रोटी, उपीट, खाल्लेच ना.
म्हणजे ही पिढी बदलाला समोरी गेली. आता जी पन्नाशीला आलेली पिढी आहे, त्यांच्या बदललेल्या आहारात पिझ्झा, बर्गर, थाय फूड, साॅस हे पदार्थ आले आहेत.
हे बदल होणारच आहेत. यालाच आपल्याला सामोरे जायचे आहे. आता ज्यांचे वय पंचवीस आहे, ते पन्नाशीच्या टप्प्यावर आले की, त्यांनासुद्धा आणखी एका बदलाला सामोरे जावे लागेल. ग्लोबलायझेशनच्या काळात, आहारात नवीन काॅम्बीनेशन्स तयार होणार आहेत. ती मान्य करताना त्यातील संभाव्य धोके लक्षात घेतले की झाले.
आता चटणीची जागा ‘साॅसने’ घेतली आहे. आंब्याच्या पाकाची जागा ‘जॅमने’ घेतली आहे. आईची जागा ‘बाईने’ घेतली आहे.
साॅस, जेली, जॅम,चीझ, मायोनीज, पिझ्झा, बर्गर हे पदार्थ, बाईच्या ऐवजी आईने करायला सुरुवात केली तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. यासाठी या बदलाला आई बाबांनी सामोरे जायची, मानसिकता ठेवली पाहिजे.
साॅस करताना जे टोमॅटो वापरले जातात, ते नीट पिकलेले बघून घ्यावेत, नीट धुवावेत, नीट शिजवावेत, शिजवताना त्यात योग्य ते स्टॅण्डर्ड मसाले घालावेत, कृत्रिम रसायनाऐवजी नैसर्गिक स्वाद असलेले मसाले घातले तर नुकसान नक्कीच होणार नाही. बाईने केलेल्या साॅसमधे काय काय घातले जाते, ते आपण वाचतो आहोतच. प्रिझर्वेटीव्ह घातले की, टिकणारच, मग त्यातील टोमॅटो कितीही किडके आणि सडलेले असतील तरीही !
जेली जॅम करताना त्यात जिलेटीन मिसळले जाते, जे अॅनिमल सोर्सपासून बनवले जाते. त्यातील छापील घटकपदार्थांची यादी “कोडवर्ड” मधे असते. त्यावर प्रत्यक्ष नाव छापण्यामधे धोका असतो, त्यासाठी ही पळवाट असते.
कृत्रिम रंग हा आणखीन एक धोका. ते रंग प्रमाणित केलेले वापरले नसतील तर धोका आणखीनच वाढतो. आताच्या संशोधनानुसार हे कृत्रिम रंग कॅन्सरचा धोका वाढवतात.
त्याऐवजी नैसर्गिक रंग वापरले तर चव आणि वास आणि आरोग्य नक्की सुधारेल. म्हणून हे पदार्थ घरी करायची कृती शिकून घ्यावी. शिकायचं. पण कुठे कसं आणि कोणाकडून ?
मोबाईल कसा वापरावा. हे घरातीलच पंचवीशीची पिढी ज्येष्ठ नागरीकांना शिकवते आहे. तसेच, या नवीन पदार्थांची चव त्यांना कशी हवी आहे तशी बनवून देण्यासाठी सुद्धा त्या पिढीचीच मदत घ्यायला हवी. ते पदार्थ स्वतः खाऊन बघितले पाहिजेत. तरच त्यातील दोष लक्षात येतील.
पानावरील डाव्या बाजूचे पदार्थ बदलत आहेत. जे पदार्थ बदलले आहेत, तेच जास्ती गडबड करतात, म्हणून पानावरील डाव्या बाजूला होणाऱ्या बदलावर सावधपणे लक्ष ठेवले पाहिजे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
04.11.2016
Leave a Reply