सर्व प्रकारची लवणे ही सर्वसाधारणपणे, दोषांना पातळ करणारी, पचायला हलकी, सूक्ष्म स्त्रोतसापर्यंत जाणारी, वाताचा नाश करणारी, पाचक, उष्ण, तीक्ष्ण गुणाची, रूची वाढवणारी आणि कफ पित्त वाढवणारी असतात.
सैंधव मीठ हे डोंगराळ मीठ आहे.
सर्व मीठामधे श्रेष्ठ आहे.
किंचीत गोडसर असून वृष्य गुणाचे म्हणजे धातुंचे पोषण करणारे असते.
ह्रद्य म्हणजे मनाला आनंद देणारे आणि ह्रदयाला हितकारक असते.
पचायला हलके असून किंचित उष्ण, दाह निर्माण करणारे आहे.
तिन्ही दोषांना संतुलीत ठेवायला मदत करणारे असते.
पण भूक वाढवणारे आणि विशेष करून डोळ्यांना हितकर आहे.
प्रत्येक घरात असावेच असे हे सैंधव उपवासाचे मीठ म्हणून पण प्रसिद्ध आहे.
जिथे मीठ कमी पडते आहे, पण खारटपणा हवाच आहे, तिथे सैंधवच वापरावे. बाजारात सैंधव किंवा शेंदेलोण नावाने विकत मिळते.
संचळ किंवा पादेलोण हे आपल्या विशिष्ट वासाने प्रसिद्ध आहे. चांगली ढेकर येत नसेल तर हे संचळ मीठ वापरावे.
पचायला हलके, ह्रदय आणि मनाला हितकर, विशिष्ट वास असलेले, अवष्टंभ नाशक म्हणजे पचनातील किंवा मलविसर्जनातील अडथळे दूर करणारे आहे. पचन पूर्ण झाल्यावर ते तिखट गुणांनी काम करते. भूक वाढवणारे, चव वाढण्यासाठी वापरले जाणारे आहे. भेळ पाणीपुरी या पदार्थांना याच संचळामुळे रूची प्राप्त होते. घरात बडिशेप, जिरे आणि ओवा समभाग घेऊन त्यात चव पाहून थोडेसे सैंधव आणि संचळ घालून ठेवले तर उत्तम पाचक चूर्ण तयार होते. जेवणानंतर कधीतरी चघळून खायला हरकत नाही.
बीड लवण बाजारात याच नावाने मिळते.
वरून आणि खालून दोन्ही मार्गाने वाताची आणि कफाची शुद्धी करण्यासाठी बीड लवण वापरतात. भूक वाढवणारे असून, जाडी कमी करणारे म्हणूनही प्रसिद्ध आहे.
मलाचा आणि वाताचा अवरोध दूर करणारे असल्याने फुगलेले पोट आणि त्यामुळे होणारी पोटदुखी कमी करणारे आहे.
वरील तिन्ही प्रकारची लवण आपण घरात वापरावीत असा आग्रह वैद्य मंडळी करत असतात.
समुद्रात तयार होणारे मीठ हे सहज उपलब्ध होणारे, पचायला इतर लवणापेक्षा जरा जड, आणि पचन पूर्ण झाल्यावर मधुर गुणाचे होत असल्यामुळे कफाला थोडे वाढवणारे आहे.
समुद्रातून मिळणारे खडे मीठ आणून ते शुद्ध करण्यासाठी नीट पाखडून घ्यावे म्हणजे सुका कचरा निघून जातो. नंतर पाण्यात विरघळून गाळून घेतले असता, वाळू आणि मातीतले दोष जातात. मीठ विरघळून घेतलेले पाणी पुनः उकळले किंवा उन्हात वाळवले कि शुद्ध मीठ परत मिळते. मिक्सरमधून काढले की बारीक होते. ही सर्व प्रकारची मीठे एकत्र करून सुद्धा आपण वापरू शकतो.
औद्भिद नावाचे एक खनिज मीठ आहे, पण ते गुणांनी तेवढे चांगले नाही. पटकन पातळ होणारे, किंचीत कडवट, तिखट असून तीक्ष्ण गुणाचे असते.
शोधली की सापडतील,
मागितली की मिळतील.
चांगल्या आरोग्यासाठी हे करावंच लागेल.
खाल्ल्या मीठाला जागावंच लागेल.
इंग्रजांनी त्यांचे मीठ भारतात आणून तेच विकत घेण्याचा कायदाही केला होता. आजही जवळपास तसेच आहे, स्वस्त, साधे, काळसर दिसणारे, खडे मीठ खायच्या बाजारातून गायब झाले आहे. पण, मच्छीमारी उद्योगामधे आणि झाडांना खत म्हणून विकत मिळते.
मूठभर मीठ उचलून मनात क्रांतीच्या ज्वाला पेटवल्या गेल्या होत्या, स्वदेशी भावना मनात रूजवल्या होत्या.
पुनः एकदा आपले मीठ आपल्यासाठी वापरूया,
देशाचे आणि देहाचे आरोग्य वाढवूया.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
08.11.2016
Leave a Reply