तिखटाशिवाय जेवणाला आणि भांडणाशिवाय संसाराला लज्जत येत नाही, अशा गुणाची ही तिखट चव.
हायहुई करत, नाकाडोळ्यातून पाणी येईपर्यंत खाण्याचा मोह सोडविता येत नाही, जीभेचे आणि नाकाचे टोक लालबुंद करणारी, ही तिखट चव.
अन्नमार्गाच्या पहिल्या टोकापासून शेवटच्या टोकापर्यत प्रत्यक्षात परिणाम दाखवणारी ही तिखट चव !
कफाचा एक नंबरचा शत्रू. कफ म्हणजे आम, विकृत चिकटपणा, बुळबुळीतपणा, सूज, जाडी, स्थिरता, जडपणा, घट्टपणा. शत्रू म्हणजे विकृत कफाचे हे सर्व गुण क्षणार्धात नाहीसे करणारा, हा तिखट गुण.
कफामुळे जिथे जिथे शरीरात हे अवगुण दिसतात, तिथे तिथे त्याच्या उलट काम करणारा हा तिखट गुण.
गळ्याचे आजार, पितांब येणे, सर्व त्वचारोग, अंगाला येणारी सूज, सांध्यांना येणारी सूज, ह्रदयात येणारी सूज, पोटात साठून राहिलेला आम यांना हलवून टाकणारी, पोटावर साठलेली फाजील चरबी या सर्वांना नष्ट करणारी ही तिखट चव.
स्वभावाने उष्ण, तीक्ष्ण, भूक वाढवणारी, रूची देणारी, अन्नमार्गाचे संपूर्ण शोधन करणारी, बंधनांचा नाश करणारी, अल्प प्रमाणात वाढलेल्या आमाचे शोषण करून घेणारी ही तिखट चव !
प्रमाणापेक्षा जास्त वापरली गेली तर तहान, चक्कर येणे, कंठशोष होणे, शिरा आकुंचन पावणे, कंप सुटणे, पोटात दुखणे, वेदना निर्माण होणे, ही लक्षणे निर्माण होतात.
पातेल्याला असलेला चिकटपणा काढण्यासाठी, जोर लावून, खरडून खरडून, तळापासून उपाय केला तर कसे पातेल्याला चरे पडतील, तसे होईल.
म्हणजे काहीवेळा तसे करणे देखील, सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखे आवश्यकपण असते.
पाचशे हजारांच्या नोटा साठवून साठवून त्याचे रूपांतर जेव्हा विकृत आमामध्ये होते, तेव्हा त्याचा साठा हलवण्यासाठी काहीतरी जालीम तिखट निर्णय घेण्यासारखे आहे. मुळापासून सुपडा साफ. मग नाकातोंडातून पाणी येणारच !
मीठी चाय खिलानेवाला तिखा जो ठहरा. जैसे चाय मे अद्रक.
एक चायवाला भी इस विकृत आम को हटा सकता है !
पण आयुर्वेद मतानुसार
निःसुखत्वम सुखायच.
आता तिखट वाटेल, थोडा त्रास होईल, पण अंतिमतः सर्वांनाच सुख देणारे असेल अशी ही तिखट चव !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.11.2016
Leave a Reply