रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
Leave a Reply