पानाच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तिखट पदार्थात उसळ, रसभाजी आणि आमटी हे पदार्थ मुख्य असतात. कडधान्ये, भाज्या आणि डाळी या क्रमाने हे पदार्थ बनवले जातात.
उसळ आणि आमटी मधे वापरले जाणारे मसाले, हे जर शिजवताना घातले, तर त्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातील. पण जर फोडणीमधे मसाला घातला तर तो जळूनच जाईल.
फोडणीचे तेल हे गरम असते. त्यात प्रथम मोहोरी तडतवणे महत्वाचे असते. मोहोरीनंतर नंबर येतो हिंग किंवा मिरच्यांचा ! गरम तेलात हिंग फुलतो आणि शुद्ध होतो. हिंग वापरताना शक्यतो खडा हिंग आणावा. म्हणजे भेसळ कमी मिळते. आणून तो तूरडाळीमधे ठेवला तर डाळीला वास पण छान येतो आणि टिकते देखील.
सध्या पतंजलीचा हिंग चांगला आहे.
फोडणी करून झाली की त्यात
जी भिजवलेली कडधान्ये आहेत, ती घालावीत म्हणजे तेलाचा तडका आणि भडका कमी होतो नंतर हळद, उसळीचा मसाला, मिरचीपूड इ. घालावी, म्हणजे त्यातील औषधी गुण टिकून रहातील. नंतर थोडेसे परतून मग पाणी घालून शिजवावे.
यातील मसाले हे भूक निर्माण करतात, पचन घडवून आणतात किंवा वासाने सुद्धा पाचक स्राव वाढवतात. तिखट मिरची पूड नको असल्यास, आले, मिरी या मसाल्याचा वापर करावा.
पदार्थ शिजून झाला कि नंतर त्यात मीठ घालावे म्हणजे कमी पुरते. आणि उडून जात नाही.
युक्ती वापरून मसाल्याचा तीक्ष्ण उष्ण तिखट गुण कमी जास्त करावा. यासाठी प्रदेशानुसार नारळ किंवा शेंगदाणे कूट वापरावे.
कोणताही अन्नपदार्थ शिजवताना, त्यावर झाकण ठेवू नये, त्याला सूर्य, चंद्र, वारा, यापैकी कोणाचातरी स्पर्श व्हावा, असे विधान आहे. आणि पदार्थ शिजत असताना त्यातील काही घटक उडून जाणे देखील अपेक्षित असते. झाकण ठेवले तर आतील अन्नाला गरजेपेक्षा जास्त उष्णता लागते आणि जीवनसत्व नष्ट होण्याचीच शक्यता जास्त असते. झाकण ठेवून शिजवले असता, इंधन वाचेल पण पदार्थ अपेक्षेपेक्षा जास्ती लवकर शिजतो. आणि गडबड होते.
अपेक्षेपेक्षा जास्त लवकर वयात येणे धोकेदायकच असते ना !!!
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
13.11.2016
Leave a Reply