तिखट झणझणीत असणाऱ्या, लालबुंद दिसणाऱ्या, कट तरंगणाऱ्या, रसभाज्या हे भारतीय आहाराचे वैशिष्ट्य आहे. अन्य पाश्चात्य देशात एवढे तिखट खाल्ले जात नाही.
भाजी खाल्ली की पाची बोटांना सचैल अभ्यंगस्नान झाल्याशिवाय एकही बोट बाहेर येणार नाही.
एवढे तिखट कसे काय चालते ? हीच प्रकृती आहे, प्रदेश विचार आहे, हेच आहाराचे रहस्य आहे. या तिखटाचे सर्व अॅण्टिडोटस् याच आहारात अन्यत्र असतात.
रस्सा असो वा मिसळ.
त्यावर तरंगणाऱ्या तर्रीचा तिखट तर्रेबाजपणा कमी करण्यासाठी आंबट लिंबू वापरले जाते. भेळेचा भडकपणा कमी होण्यासाठी त्यावर चिंचखजुराच्या पाण्याचा शिडकावा केला जातो. चटणीमधे कैरी किंवा साॅसमधे टोमॅटो असतोच. या आंबटपणामुळे तिखटपणा थोडासा का होईना कमी केला जातो.
जेवण झाल्यावर बोटांना लागलेले तेल काढण्यासाठीच जेवताना ताटात उरलेल्या लिंबाची फोड पिळून बोटांना चोळली जाते, ती यासाठीच ! प्रत्येक रस एकमेकांना खूप मदत करीत असतो.
तशी आंबट, गोड आणि खारट यांची छुपी युती असते. सामील होणार नाही, पण बाहेरून पाठींबा जाहीर केलेला असतो. तसंच कडू तिखट तुरट चवींची मैत्री जरा जास्तच आहे. एक गट जेव्हा सत्तेत चलती नाण्याच्या बाजुला असतो, तेव्हा बाकीचे तीन विरोधी पक्षात बोंबाबोंब करत बाके बडवायला बसलेले असतात. कुरघोडी करण्यात यांचा हात कोणीच धरू शकणार नाही.
तिखट झालेल्या रसभाजीमधला तिखट तोरा कमी करण्यासाठी काय करावे ?
रसभाजीमधे पाणी वाढवून तिखटपणा कमी होईल पण भाजीची मूळ चव पण बिघडून जाते, यासाठी आंबट चव मदतीला धावत येते. झणझणीत झुणक्यामधे देखील आमसोलाचे आंबट घातल्याखेरीज भाकरीलापण बरे वाटत नाही. तळलेल्या मिरच्यावर मीठ घालून लिंबू पिळून घेतले की.. व्वा, क्या बात है ! हे आपण व्यवहारात पण पहातो. मिरच्यांचा खर्डा मात्र काही वेळा या आंबटाशिवाय लांब जाऊन भांडून फटकून बसल्यासारखा असतो.
आंब्बट्ट म्हटले तरी दोन्ही डोळे एकदम बंद होतात.
आंबटगोड हा युती शब्द उच्चारला की फक्त एक डोळाच बंद होतो.
आणि तिखटात आंबट नाही घातले, तर मात्र दोन्ही डोळे हेऽ एऽवढे उघडतात.
तिखट लोणच्याची, कधी गोडाशी मैत्री होऊच शकत नाही. तिथे तिखट-आंबट युतीच कामी येते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
14.11.2016
Leave a Reply