कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.
जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड ” नील ” होईल, असं नाही हां !
कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.
कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.
कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.
पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.
किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.
बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.
जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या “सिलॅबस” मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.11.2016
Leave a Reply