कडू चवीचे जेवणातील पदार्थ म्हणजे ओल्या हळदीचे लोणचे, बांबूच्या कोंबाची भाजी, कारल्याची भाजी, मेथीचे पराठे, शेवग्याच्या पाल्याची भाजी. याचा अर्थ हे पदार्थ मधुमेहाचे शत्रू आहेत का ? हो. नक्कीच. फक्त प्रमाण लक्षात ठेवावे. पानाच्या डाव्या बाजूला !
मधुमेहाचा शत्रू म्हणजे कडू चव असे का म्हटले जाते ? मधुमेहात शरीराला चिकटण्याचा गुणधर्म वाढतो. मग तो, क्लेद असेल नाहीतर मेद असेल, रस धातू असेल नाहीतर स्तन्य असेल. हे दोष विशेष शरीरातील स्रोतसांना चिकटून राहिले तरच दुष्टी निर्माण होते.
कडू चवीच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमध्ये खर म्हणजे खरखरीतपणा, दोन पेशींना एकमेकांपासून वेगळे करण्याचा गुण, याला शास्त्रकार विशद असे म्हणतात. आणि रूक्ष म्हणजे कोरडेपणा हे महत्वाचे गुण असतात.
मधुमेहामधे नेमके यांच्या विरूद्ध गुण शरीरात वाढलेले असतात, त्यामुळे गुणविपरीत औषध म्हणून कडू चवीची औषधे मधुमेहावर छान गुण दाखवतात.
मधुमेहाशिवाय वाढलेली ढेरी कमी करणे, किंवा शरीराचा कोणताही भाग फाजीलपणे वाढणे, गळ्याच्या गाठी वाढणे, गर्भाशयात फायब्राॅईडची गाठ वाढणे,शरीरात आत बाहेर कुठेही अमर्याद स्वरूपात वाढणारी कर्करोगाची गाठ, डोळ्यांचे आजार, सांध्यांना येणारी सूज, रक्तातील चिकटपणा वाढल्यामुळे रिपोर्टमधे दिसणारे कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड, वगैरे पॅथालाॅजिकलल आजारदेखील या कडू चवीने कमी होतात. आमामुळे पोट गप्प होणे, बरेच दिवसांच्या बऱ्या न होणाऱ्या जखमा, ती अगदी साधी सर्दी देखील कडू चवीने कमी करता येते.
तापावर हटकून उपयोगी पडते ती कडू चव ! म्हणून तापाची कारणे शोधता न आल्यास, कडू चवीची औषधे वापरली की ताप जातो. जसे महासुदर्शन काढा.
औषध कोणतेही असूदेत, ताप उतरला पाहिजे. एवढेच रूग्णाला अपेक्षित असते. मग ते कडू चवीचे महासुदर्शन चूर्ण असू देत नाहीतर, कडू चवीची पॅरासिटेमोलची कडू जार गोळी. कडू म्हणजे ताप उतरवणारे हे साधे सोपे समीकरण आहे.
पुस्तकात लिहिलं नसलं तरी या कडू चवीचा अतिरेकी परिणाम म्हणून वात आणि पित्त हे वाढतेच, हे आपण व्यवहारात बघतोच! हातच्या ( दिसणाऱ्या) वातपित्ताला ग्रंथाधार कशाला ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.11.2016
Leave a Reply